देशात सर्वाधिक गुन्हे उत्तर प्रदेशात, महाराष्ट्र देशात आठव्या क्रमाकांवर!

0
55
प्रातिनिधिक छायाचित्र.

मुंबईः देशाचा गुन्हे दर वाढत असताना उत्तर प्रदेश हा सर्वाधिक गुन्ह्यांची नोंद असलेले पहिल्या क्रमाकांचे राज्य ठरले आहे. उत्तर प्रदेशापाठोपाठ केरळ, तेलंगाणा, मध्यप्रदेश, हरियाणा, राजस्थान या राज्यांतही गुन्ह्यांचे प्रमाण वाढले असून महाराष्ट्र हे आठव्या क्रमांकावर आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

महाराष्ट्राचा गुन्हे दर मात्र २०१८-१९ च्या तुलनेत आहे तोच राहिला आहे. संपूर्ण देशात २०१९ मध्ये ३२.२५ लाख गुन्हे नोंदविले आहेत. त्यामध्ये महाराष्ट्राचा गुन्हेदर २७८.४ असून महाराष्ट्र राज्य ८ व्या क्रमांकावर (प्रतिलाख लोकसंख्येनुसार) आहे. यात मध्यप्रदेश, हरियाणा, केरळ, राजस्थान, तेलंगाणा यांचा दर जास्त आहे, तर उत्तरप्रदेश हे राज्य भा.दं.वि.च्या गुन्ह्यांमध्ये प्रथम क्रमांकावर आहे. आर्म्स अ‍ॅक्ट अंतर्गत अवैध हत्यार बाळगण्याच्या प्रकरणात महाराष्ट्राचा ९ वा क्रमांक आहे. यात महाराष्ट्रात केवळ ९१० गुन्ह्यांची नोंद आहे. तर उत्तरप्रदेश २५,५२४, मध्यप्रदेश ३८४७, बिहार २९७६, राजस्थान २०९५ अशी गुन्हे नोंद आहे. एकूणच ही आकडेवारी पाहता महाराष्ट्र राज्य गुन्हेगारी रोखण्यामध्ये निश्चितच यशस्वी झाले आहे, असे देशमुख म्हणाले.

गुन्हेगारांना शिक्षा होण्याचा दर वाढलाः राज्याचा गुन्हेगारांना शिक्षा होण्याचा दर हा वाढला असून २०१८ मध्ये जो ४१.४१ होता तो २०१९ मध्ये ४९ टक्के झाला आहे. यामध्ये महाराष्ट्र राज्याचा क्रमांक ११ वा आहे. यात कर्नाटक ३६.६, मध्यप्रदेश ४७.००, गुजरात ४५.६, तेलंगाणा ४२.५ टक्के असा दर आहे, असे देशमुख यांनी सांगितले. सन २०१९ मध्ये देशात हिंसाचाराच्या एकूण ४.१७ लाख गुन्ह्यांची नोंद झाली. तर राज्यात २०१९ मध्ये हिंसाचाराचा गुन्हे दर केवळ ३६ होता आणि राज्य ११ व्या क्रमांकावर होते. सन २०१९ मध्ये देशाचा खूनासंदर्भातील गुन्हे दर २.२ असा होता. त्यात महाराष्ट्राचा गुन्हे दर केवळ १.७ असून महाराष्ट्र राज्य हे २५ व्या क्रमांकावर होते. तर खुनाचा प्रयत्न संदर्भातील गुन्ह्यांबाबत महाराष्ट्राचा १७ वा क्रमांक आहे.

राजस्थानात सर्वाधिक महिलांवर अत्याचारः इतर राज्यांच्या तुलनेत प्रती लक्ष महिला लोकसंख्येमागे महाराष्ट्र राज्य १३व्या क्रमांकावर आहे. सन २०१९ मध्ये बलात्काराचे  राजस्थानमध्ये ५९९७, उत्तरप्रदेश ३०६५, मध्यप्रदेश २४८५ आणि महाराष्ट्रामध्ये २२९९ असे गुन्हे नोंदवले आहेत. या २२९९ गुन्हेगारांपैकी २२७४ गुन्हेगार हे परिचित, नातेवाईक, मित्र, शेजारी असे ओळखीचे आहेत तर केवळ २५ गुन्हेगार अनोळखी आहेत. त्यामध्ये महाराष्ट्राचा गुन्हेदर ३.०९ असून महाराष्ट्र २२व्या क्रमांकावर आहे. इतर राज्यांचा गुन्हे दर केरळ ११.६, हिमाचल प्रदेश १०, हरियाणा १०.९, झारखंड ७.७, मध्यप्रदेश ६.२ असा आहे, अशी माहिती देशमुख यांनी दिली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा