वाळूजच्या व्यावसायिकाचे फेसबुक हॅक करून सायबर भामट्याने मित्रांकडे केली पैशांची मागणी

0
51

औरंगाबादः वाळूज महानगरातील एका व्यावसायिकाचे फेसबुक खाते हॅक करुन परप्रांतीय भामट्याने त्यांचा फोटो वापरुन फेसबुक मित्रांकडे पैशांची मागणी केली. हा प्रकार लक्षात येताच व्यवसायिकाने लगेचच फेसबुक खात्याचा पासवर्ड बदलून मॅसेंजर ब्लॉक केले. त्यामुळे होणारी फसवणूक टळली. दरम्यान, याप्रकरणी व्यावसायिकाने सायबर पोलिस ठाणे गाठत तक्रार दिली आहे.

वाळूज सिडको महानगरातील व्यावसायिक अशोक मधुकर शेळके यांच्या मधू उद्योग व शिव पॉलिमर या प्लास्टिक, रबर मोल्डिंगच्या कंपन्या आहेत. त्यांचे फेसबुक खाते मंगळवारी परप्रांतीय भामट्याने हॅक केले. त्यानंतर शेळके यांच्या फेसबुकवरील मित्र व नातेवाईक अशा २१४ जणांशी या भामट्याने मॅसेंजरव्दारे चॅटिंग केली. तत्पूर्वी त्याने शेळके यांचाच फोटो व आयडी वापरला. शेळके यांच्या मित्र व नातेवाइकांशी मॅसेंजरव्दारे संपर्क साधताना भामट्याने मी खूप आर्थिक अडचणीत आहे. मला दहा ते तीस हजारांची मदत हवी आहे. त्यामुळे फोनपे, गुगलपे आधारे रक्कम पाठविण्यात यावी अशी मागणी केली.

या हॅकरने त्यावर चुकीचा फोनपे क्रमांक टाकला होता. मात्र, हा प्रकार शेळके यांना माहिती नव्हता. ज्यावेळी त्यांच्या मित्र व नातेवाईकांनी संपर्क साधून हा काय प्रकार आहे अशी विचारणा केली. त्यावेळी आपले फेसबुक खाते हॅक झाल्याचे शेळके यांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ फेसबुक खात्याचा पासवर्ड बदलून सर्व मेसेंजर ब्लॉक केले. यामुळे शेळके यांच्यासह त्यांचे मित्र व नातेवाईकांची फसवणूक टळली. पण पुन्हा असा प्रकार घडू नये याची दक्षता घेऊन शेळके यांनी पोलिस आयुक्तालयातील सायबर पोलिस ठाण्याकडे तक्रारी अर्ज सादर केला आहे.

पासवर्ड वेगळा ठेवाः बाहेरच्या राज्यातील भामटे अशा प्रकारची फसवणूक करत आहेत. फेसबुक वापरणारे शक्यतो आपले युजरनेम अथवा मोबाइल क्रमांक पासवर्ड म्हणून ठेवतात. त्यामुळे फेसबुक हॅक करणे भामट्यांना सोपे जाते. फेसबुक हॅक केल्यानंतर वापरकर्त्याच्या नावाचा गैरवापर करुन त्याआधारे भामटे अनेकांना लुटतात. म्हणून फेसबुक वापरकर्त्यांनी शक्यतो पासवर्ड वेगळा ठेवायला हवा अशी माहिती सायबर पोलिसांनी दिली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा