मुंबई: उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता १२ वीची लेखी परीक्षा २३ एप्रिल तर माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच इयत्ता १० वीची लेखी परीक्षा २९ एप्रिलपासून सुरु होणार असल्याची घोषणा शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी केली. मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.
इयत्ता १२ वीची प्रात्यक्षिक परीक्षा १ एप्रिल ते २२ एप्रिलदरम्यान होईल तर लेखी परीक्षा २३ एप्रिल ते २९ मे या कालावधीत घेण्यात येईल. या परीक्षेचा निकाल अंदाजे जुलैच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर करण्यात येईल, असे प्रा. गायकवाड म्हणाल्या.
इयत्ता दहावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा ९ एप्रिल ते २८ एप्रिल या दरम्यान होतील तर लेखी परीक्षा २९ एप्रिल ते ३१ मे या कालावधीत घेण्यात येतील. या परीक्षेचा निकाल ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर करण्यात येईल, असेही गायकवाड म्हणाल्या. कोरनाच्या संदर्भात केंद्र व राज्य सरकार तसेच आरोग्य विभागाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या अधीन राहून परीक्षा आयोजित करण्यास मान्यता देण्यात येत आहे.
शाळांमध्ये ७६ टक्के उपस्थितीः राज्यात इयत्ता ९ वी ते इयत्ता १२ वीच्या शाळांत दिवसेंदिवस विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढत असून १८ जानेवारी रोजी २१ लाख ६६ हजार ५६ विद्यार्थी शाळांमध्ये येत आहेत व २१ हजार २८७ शाळा सुरू आहेत. यात एका दिवशी केवळ पन्नास टक्के उपस्थिती ठेऊन शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. सुमारे ७६.८% विद्यार्थी शाळांमध्ये येत आहेत, अशी माहिती प्रा. गायकवाड यांनी यावेळी दिली.