मोठी घोषणाः कोविशिल्ड, कोव्हॅक्सीन लसींच्या आपत्कालीन वापरास डीसीजीआयची मंजुरी

0
47
संग्रहित छायाचित्र.

नवी दिल्लीः ऑक्सफर्ड- सीरमच्या कोविशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सीन या कोरोनावरील दोन्ही लसींच्या आपत्कालीन वापरास डीसीजीआयने मंजुरी दिली आहे. डीसीजीआय म्हणजेच औषध महानियंत्रकांच्या या समंतीमुळे लसीकरण मोहिमेला गती मिळणार आहे.

कोरोना लसीकरणाची देशभरात जोरदार तयारी करण्यात आली आहे. लसीकरण मोहिमेच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून कालच देशातील सर्व राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांत कोरोना लसीकरणाचा ड्राय रन पार पडला. भारत सरकारच्या तज्ज्ञ गटाने कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सीन या दोन लसींच्या आपत्कालीन वापरास मंजुरी देण्याची शिफारस केल्यानंतर डीसीजीआयने या दोन्ही लसींच्या आपत्कालीन वापरास मंजुरी दिल्याची माहिती आज पत्रकार परिषदेत दिली.

कोरोनाच्या लसींबाबत विविध वक्तव्ये केली जात आहेत. भाजपच्या कोरोना लसीवर आम्ही विश्वास कसा ठेवायचा, असे समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी म्हटले होते. त्यानंतर समाजवादी पक्षाचेच नेते आशुतोष सिन्हा यांनी कोरोना लस घेतल्यामुळे नपुंसकत्व येते, असे वादग्रस्त विधान केले आहे. त्यावर डीसीजीआयचे व्ही.जी. सोमाणी म्हणाले की, आम्ही अशा कोणत्याही लसीला संमती देणार नाही, जी नपुंसकत्व आणते. या दोन्ही लसी शंभर टक्के सुरक्षित आहेत. लस घेतल्याने नपुंसकत्व येते, असे म्हणणे साफ चुकीचे आहे. अशा मुर्खपणाच्या वक्तव्यांकडे लक्ष देऊ नये, असे सोमाणी म्हणाले.

मतदान प्रक्रियेसारखी बूथवर मिळणार लसः  कोरोना लसीकरणाची प्रक्रिया मतदान प्रक्रियेसारखीच असेल. देशभरात १२५ जिल्ह्यांतील २८६ ठिकाणी लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासाठी ९६ हजार लोकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली. निवडणुकीच्या मतदानासाठी ज्या प्रमाणे बूथची व्यवस्था केली जाते, तशीच व्यवस्था कोरोना लसीकरणासाठी करण्यात आली आहे, असे हर्षवर्धन म्हणाले. संपूर्ण देशात मोफत लस देणार, असे वक्तव्य त्यांनी आधी काल केले होते. नंतर मात्र हर्षवर्धन यांनी यूटर्न घेत पहिल्या टप्प्यात प्राधान्य देण्यात आलेला गटालाच फक्त मोफत लस मिळणार असल्याचे ते म्हणाले.

क्लिनिकल ट्रायलसाठी २३ हजार स्वयंसेवकांची भरतीः भारत बायोटेकने आपल्या कोव्हॅक्सीन लसीच्या क्लिनिकल ट्रायलसाठी २३ हजार स्वयंसेवकांची भरती करण्याची घोषणा केली आहे. देशातील विविध ठिकाणी हे क्लिनिकल ट्रायल घेतले जाणार आहेत. २६ हजार स्वयंसेवकांच्या उद्दिष्टाने भारत बायोटेकने नोव्हेंबरच्या मध्यापासून क्लिनिकल ट्रायल सुरू केले आहेत. कोरोनाच्या अभ्यासाठी हा अत्यंत महत्वाचा टप्पा असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा