अंबानींच्या घराबाहेर स्फोटकासह सापडलेल्या स्कॉर्पिओ मालकाचा मृतदेह आढळल्याने खळबळ

0
80
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटकांसह आढळलेल्या स्कॉर्पिओ कारचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह ठाण्यातील मुंब्रा येथील रेतीबंदर खाडीत आढळून आल्यामुळे खळबळ उडाली असून यावरून आता आरोपप्रत्यारोपही सुरू झाले आहेत.

 गेल्या महिन्यात मुकेश अंबानी यांच्या कंबाल हिल परिसरातील अँटिलिया या अलिशान बंगल्याजवळ स्फोटके असलेली स्कॉर्पिओ आढळली होती. या घटनेचा तपास सुरू आहे. या स्कॉर्पिओचे मालक मनसुख हिरेन असल्याचे तपासात उघड झाले होते. हिरेन हे गुरूवारी रात्रीपासून बेपत्ता होते. याबाबत त्यांच्या कुटुंबीयांनी तक्रारही दिली होती. आज शुक्रवारी मुंब्रा येथील रेतीबंदर खाडीत त्यांचा मृतदेह आढळून आला. हिरेन यांनी खाडीत उडी मारून आत्महत्या केली, असे ठाणे पोलिसांनी सांगितले.

हातपाय बांधून आत्महत्या कशी?: मनसुख हिरेन यांचा मृतदेह आढळून आल्यानंतर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत गंभीर आरोप केले आहेत. मनसुख हिरेन यांनी आपल्या जबाबात गाडी घरगुती वापरासाठी विकत घेतल्याचे म्हटले आहे.गाडीचे स्टिअरिंग जॅम झाल्याचेही त्यांनी सांगितले आहे. मग क्रॉफर्ड मार्केटला जाऊन ते कोणाला भेटले हा महत्वाचा प्रश्न आहे. घटनास्थळी सर्वात आधी पोहोचणारे सचिन वाझे यांना ओळखत होते का? इतके योगायोग कसे काय? मी मृतदेह पाहिलेला असून हातपाय बांधलेले आहेत. हात मागे बांधून आत्महत्या करता येत नाही, असे फडणवीस म्हणाले.

 अर्णबवर कारवाई केली म्हणून वाझेंवर तुमचा राग का?: गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही फडणवीसांच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिले. ही गाडी मनसुख हिरेन यांच्या मालकीची नव्हती. इंटिरिअरसाठी ती त्यांच्याकडे देण्यात आली होती. मात्र बिल थकवल्याने गाडी ताब्यात ठेवण्यात आली होती. हिरेन यांचे हातपाय बांधण्यात आलेले नव्हते. मुंबई, महाराष्ट्र पोलिस तपास करण्यास सक्षम आहेत. त्यांच्यावर तरी विश्वास ठेवा असे सांगतानाच अर्णब गोस्वामीवर कारवाई केली म्हणून तुमचा सचिन वाझेंवर राग आहे का? असा सवालही देशमुख यांनी केला.

 वाझे म्हणाले, त्यांना आरोप करू द्याः दरम्यान, पोलिस अधिकारी सचिन वाझे यांनीही फडणवीसांच्या आरोपांवर प्रतिक्रिया दिली. तुमचे आणि हिरेन यांचे बोलणे झाले होते का? असे विचारले असता तुम्ही त्यांनाच विचारा. याबाबत मला काहीच माहीत नाही. त्यांना आरोप करू द्या. माझ्या आधी तेथे अनेक यंत्रणा होत्या. गावेदवीचे वरिष्ठ पोलिस अधिकारी, वाहतूक पोलिस अधीक्षक, डीसीपी झोन-२ आणि बीडीडीएस पोहोचले होते. त्यानंतर क्राइम ब्रँचचे युनिट पोहोचले. त्यात मी होतो, असे वाझे म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा