गणेशोत्सवावर नवीन निर्बंध लागणार का?, उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले…

0
143
संग्रहित छायाचित्र.

पुणेः आगामी गणेशोत्सवात नवीन निर्बंध लावले जाणार नाहीत, परंतु पहिल्या दिवशीची गर्दी पाहून निर्बंध लावायचे की नाहीत, याबाबतचा निर्णय घेण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.

पुण्यात पत्रकारांशी बोलताना अजित पवार यांनी ही माहिती दिली. यंदाचा गणेशोत्सव नागरिकांनी साधेपणानेच साजरा करावा. घरगुती गणेशोत्सव साजरा करण्यास परवानगी आहे. मात्र सार्वजनिक ठिकाणी गणेशोत्सव कसा साजरा करायचा, याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेणार आहेत. त्या निर्णयाची अंमलबजावणी राज्यातील सर्व गणेशभक्तांनी करावी, असेही अजित पवार म्हणाले.

 राज्यातील मंदिरे सर्वसामान्यांसाठी खुली करण्यासाठी विरोधी पक्षांकडून आंदोलने केली जात आहेत. राज्य सरकारचीही तिच भूमिका आहे. मात्र केंद्र सरकारने सण आणि उत्सवाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध लावण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे मंदिरे उघडू शकत नाही. केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने काय सूचना दिल्या आहेत, हे भाजपने आंदोलन करताना पहावे, असा टोलाही अजित पवार यांनी मंदिरे उघडण्यासाठी आंदोलन करणाऱ्या भाजपला हाणला.

उपमुख्यमंत्री पवार यांनी  पुण्याच्या सेंट्रल बिल्डिंग येथील महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेच्या कार्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर, सहकार आयुक्त अनिल कवडे, साखर आयुक्त शेखर गायकवाड आणि सहकार व पणन विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.

महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सहकार परिषदेच्या कार्यालयास सदिच्छा भेट देऊन अनास्कर यांना शुभेच्छा दिल्या. तसेच सहकार चळवळ सक्षम करण्यासाठी सहकार कायद्यामध्ये जे जे बदल आवश्यक आहेत त्याची शिफारस परिषदेने तात्काळ करावी, सहकार परिषदेच्या राज्य सरकारकडून काय अपेक्षा आहेत त्याही सादर करण्याच्या सूचना श्री. पवार यांनी यावेळी दिल्या.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा