सोशल मीडियावर सावधानः एक लाख महिलांची तयार केली आक्षेपार्ह छायाचित्रे!

0
234
प्रातिनिधिक छायाचित्र.

नवी दिल्लीः तुम्ही जर सोशल मीडियावर आपली छायाचित्रे पोस्ट करत असाल तर सावध व्हा. तुमच्या परस्पर तुमच्या चांगल्या छायाचित्रांचा वापर करून सॉफ्टवेअरव्दारे बनावट आणि आक्षेपार्ह छायाचित्रे तयार केली जाऊ शकतात. अशाच एका सॉफ्टवेअरव्दारे १ लाखाहून अधिक महिलांची आक्षेपार्ह छायाचित्रे बनवण्यात आली आहेत. या महिलांनी व्हॉट्सअपसारखे ऍप आणि टेलिग्रामच्या बॉटवर छायाचित्रे अपलोड केली होती.

अनेकांना सोशल मीडियावर आपली छायाचित्रे पोस्ट करण्याची मोठी हौस असते. परंतु ही हौसच महागात पडू शकते. तुमच्या न कळत तुमच्या चांगल्या छायाचित्रांचा वापर करून डीपफेक तंत्रज्ञानाच्या साह्याने अश्लील आणि आक्षेपार्ह छायाचित्रे तयार केली जाऊ शकतात आणि ती व्हायरल केली जाऊ शकतात, हे  आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि ऑनलाइन घोटाळ्यांबाबत संशोधन करणाऱ्या सेन्सिटीने केलेल्या संशोधनातून उघड झाले आहे. जगभरातील एक लाखाहून अधिक महिला या तंत्रज्ञानाच्या बळी ठरल्या आहेत.

बॉट हे एक प्रकारचे आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच रोबोटसारखे सॉफ्टवेअर ऍप्लिकेशन आहे. बॉटवर टाकण्यात आलेल्या या छायाचित्रांचा वापर करून कुणी तरी संगणकाव्दारे आक्षेपार्ह छायाचित्रे तयार केली आहेत. मंगळवारी संशोधकांनी हा दावा केला आहे. मूळ छायाचित्रांचा वापर करून तयार केलेल्या बनावट किंवा आक्षेपार्ह छायाचित्रांना डीपफेक म्हटले जाते.

सेन्सिटीने प्रकाशित केलेल्या अहवालात हा दावा करण्यात आला आहे. ही डीपफेक छायाचित्रे टेलिग्राम या मेसेजिंग ऍपवर बॉटच्या इकोसिस्टिमव्दारे तयार करण्यात आली होती, असे या अहवालात म्हटले आहे.

 सेन्सिटीच्या अहवालानुसार, या बॉटचा वापर करणाऱ्यांनी सोशल मीडियावरील ओळखींच्या महिलांची आक्षेपार्ह छायाचित्रे तयार केली आणि अन्य टेलिग्राम चॅनेल्सवर ती शेअर केली. संशोधकांनी तपासलेल्या टेलिग्राम चॅनेलवरील १ लाख १० हजार ८० महिलांना लक्ष्य करून आक्षेपार्ह छायाचित्रे तयार करण्यात आली आहेत. त्यातील ७० टक्के महिला रशिया आणि पूर्व युरोपातील अन्य देशांतील आहेत. आक्षेपार्ह छायाचित्रे तयार करण्यात आलेल्यांमध्ये काही अल्पवयीन मुलींचाही समावेश आहे. त्या बॉटला रशियाची सोशल मीडिया वेबसाईट व्हीकेवर मोठ्या प्रमाणावर जाहिरातीही मिळाल्या आहेत.

 डीपफेकचा वापर मुख्यतः राजकारण आणि निवडणुकीसाठी केला जातो. मात्र या तंत्रज्ञानाचा वापर सामाजिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या लोकांना लक्ष्य करण्यासाठी केला जाऊ शकतो, अशी तज्ज्ञांना चिंता आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा