दिल्लीत ‘शहा’हीन बाग, पुन्हा आप सरकार! केजरीवालांच्या ‘झाडू’मुळे भाजपचा ‘कचरा’

0
98

नवी दिल्लीः दिल्लीत शाहीनबागवाले जिंकणार की राष्ट्रभक्ती जिंकणार, असा सवाल करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना दिल्लीच्या मतदारांनी चांगलाच झटका दिला आहे. मतांच्या ध्रुवीकरणासाठी भाजपने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दहशतवादी ठरवण्यापर्यंत मजल गाठूनही दिल्लीकरांनी आम आदमी पार्टीच्या(आप) पारड्यात भरघोस बहुमत टाकले. दिल्ली विधानसभेच्या 70 जागांपैकी 62 जागांवर आपने आघाडी मिळवून राजधानी दिल्लीतील आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यावेळच्या निवडणुकीत भाजपच्या कामगिरीत थोडीशी सुधारणा झाली असली तरी दिल्लीच्या तख्तावर केजरीवालांच्या ‘झाडू’मुळे भाजपचा पुरता ‘कचरा’ झाला आहे. तर काँग्रेसला या निवडणुकीत भोपळाही फोडता आला नाही.

2015 च्या निवडणुकीत आपला 67 जागा, भाजपला 3 जागा मिळाल्या होत्या. यंदा भाजपने 8 जागांवर आघाडी घेतली आहे. दिल्लीमध्ये अरविंद केजरीवालांनी असा झाडू चालवला की ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची करून मैदानात उतरलेल्या मोदी-शहा जोडीला दिल्लीतील सत्तेच्या आशाच सोडून द्याव्या लागल्या आहेत. आपचे बिनीचे शिलेदार अरविंद केजरीवाल, सोमनाथ भारती, आतिषी, अमानतुल्लाह खान आणि उपमुख्यमंत्री मनीष शिसोदिया विजयी झाले आहेत. या निवडणुकीचे वैशिष्ट्ये असे की, दिल्लीतील मतदारांनी इतर कोणत्याही मुद्यांपेक्षा स्थानिक मुद्यांना प्राधान्य दिले आहे. राष्ट्रभक्ती, राष्ट्रवाद अशा भावनिक मुद्यांना त्यांनी अजिबात थारा दिलेला नाही. मध्य प्रदेश, राजस्थान आणि पंजाब विधानसभेच्या निवडणुकीतही हाच पॅटर्न दिसून आला होता. निवडणुकीत विजय होताच अरविंद केजरीवाल यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला आहे.

 हा भारतमातेचा विजय- केजरीवालः दिल्लीवासियांनी आपल्या मुलाला एवढे प्रेम दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार. आज दिल्लीकरांनी एक नव्या राजकारणाला जन्म दिला आहे. विकास कामाचे राजकारण. हा भारतमातेचा विजय आहे, अशी प्रतिक्रिया दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी विजयानंतर दिली आहे.

 भाजपच्या पराभवाची मालिका थांबणार नाही- शरद पवारः  दिल्ली हे शहर देशातील इतर शहरांपेक्षा वेगळे असून तेथे अनेक राज्यातील लोक राहतात. त्यामुळे दिल्लीच्या निवडणुकीचा निकाल त्या राज्यापुरता मर्यादित नाही. देशभरात बदलाचे वातावरण आहे. दिल्लीत सुरू झालेली भाजपच्या पराभवाची मालिका आता थांबणार नाही. दिल्लीच्या निकालाचे मला अजिबात आश्‍चर्य वाटले नाही. भाजपचा पराभव होणारच होता, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा