‘माजी शिक्षणमंत्री विनोद तावडेंच्या दिल्लीतील प्रचारसभेला अफाट गर्दी’, नेटकऱ्यांकडून खिल्ली

0
1304
भाजप नेते विनोद तावडे यांच्या दिल्लीत प्रचारसभेचे छायाचित्र.

मुंबईः राज्याचे माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे हे सध्या दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजप उमदेवारांचा प्रचार करण्यासाठी दिल्लीत गेले आहेत. दिल्लीमध्ये त्यांनी घेतलेल्या प्रचारसभेची छायाचित्रेत त्यांनीच ट्विटरवर शेअर केली असून या सभेला असलेली मोजक्याच लोकांची उपस्थिती हा टीकेचा विषय बनली आहे. दिल्ली विधानसभा प्रचारासाठी महाराष्ट्रातून स्टारप्रचारक म्हणून गेलेल्या विनोद तावडे यांच्या सभेला जमलेला प्रचंड जनसमुदाय, पाय ठेवायलाही जागा नाही, विराट जनसभा, अशी खिल्ली सोशल मीडियावर नेटकऱ्यांकडून उडवली जाऊ लागली आहे.

 दिल्ली विधानसभा निवडणुकीचा प्रचार टिपेला पोहोचला आहे. या निवडणुकीत भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपने तिकिट नाकारलेले माजी शिक्षणमंत्री विनोद तावडेही गेले आहेत. मात्र त्यांच्या प्रचारसभांना बोटावर मोजण्याइतकीच गर्दी आहे. त्यामुळे नेटकऱ्यांनी तावडेंना लक्ष्य केले आहे. विनोद तावडे महाराष्ट्राचे स्टार प्रचारक दिल्लीमध्ये विराट जनसमुदायाला संबोधित करताना… बघून अंगावर जणू काटे आले… ना भूतो ना भविष्यती अशीच ही विराटसभा म्हणावी लागेल, अशी खोचक टीकाही केली जात आहे.

दरम्यान दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही विनोद तावडे यांच्यावर टीका केली आहे. विनोद तावडे हे महाराष्ट्राचे माजी शिक्षणमंत्री आहेत. त्यांनी 1300 सरकारी शाळा बंद केल्या आहेत. आता ते दिल्लीमध्ये भाजपचा प्रचार करण्यासाठी आले आहेत.  आपण प्रचंड परिश्रम करून सरकारी शाळा चांगल्या केल्या आहेत. त्यांना आपल्या शाळा दाखवा, छोले भटुरे खाऊ घाला आणि दिल्लीचे दर्शन घडवा. ते आपले पाहुणे आहेत, असे केजरीवाल यांनी ट्विट करून म्हटले आहे. 

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा