दिल्लीकरांनी भाजपला पुन्हा नाकारले, एक्झिट पोलमध्ये पुन्हा स्पष्ट बहुमताचे केजरीवाल सरकार!

0
419
संग्रहित छायाचित्र.

नवी दिल्लीः सर्व लमाजम्यानिशी दिल्‍ली विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या भाजपला दिल्लीतील मतदारांनी पुन्हा जोर का झटका देत झिडकारून लावले. आज झालेल्या मतदानानंतर घोषित झालेल्या सर्वच एक्झिट पोलमध्ये दिल्लीत पुन्हा पूर्ण बहुमतासह ‘फिर एक बार केजरीवाल सरकार’चा कौल पहायला मिळतो आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्ली विधानसभेची निवडणूक  प्रतिष्ठेची करून ती जिंकण्यासाठी जंग जंग पछाडले होते. मात्र तरीही दिल्लीच्या मतदारांनी भाजपला पुन्हा नाकारले असून त्यांना अपेक्षित जागाही मिळताना दिसत नाहीत. त्यामुळे हा सीएए आणि एनआरसीविरोधातील कौल असल्याचे मानले जाऊ लागले आहे.

 दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी आज मतदान घेण्यात आले. 55 टक्क्यांहून अधिक मतदान झाल्यामुळे मतदारांचा कौल नेमका कोणाच्या बाजूने जाणार याबाबत कमालीची उत्सुकता लागलेली होती. मात्र सर्वच वृत्तवाहिन्यांच्या एक्झिटपोलमध्ये दिल्लीकरांनी आम आदमी पार्टीला (आप) पुन्हा घसघशीत बहुमत दिल्याचे पहायला मिळत आहे.

 कोणाच्या एक्झिटपोलमध्ये कोणाला किती जागा?: टाइम्स नाऊच्या एक्झिट पोलमध्ये आपला 47 तर भाजप आघाडीला 23 जागा, एबीपी-सीव्होटर्सच्या एक्झिटपोलमध्ये आपला 56, भाजप आघाडीला 12 तर काँग्रेसला केवळ 2 जागा मिळताना दिसत आहेत. जन की बातच्या एक्झिटपोलमध्ये आपला 55 आणि भाजप आघाडीला फक्त 15 जागा मिळतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. न्यूज एक्स- नेताच्या एक्झिटपोलमध्ये 55 जागा दिल्या असून भाजप आघाडीला 14 जागाच मिळताना दिसत आहेत. काँग्रेसला फक्त एकच जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. इंडिया न्यूज नेशनने आपला 55, भाजप आघाडीला 14, काँग्रेसला 1, न्यूज एक्स- पोलस्टारने आपला 56, भाजपला 14 तर इंडिया टीव्हीने आपला 44 आणि भाजप आघाडीला 26 जागा मिळतील, असा अंदाज वर्तवला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा