‘शूर न्यायमूर्ती लोयांची आठवण येते, ज्यांची बदली करण्यात आली नव्हती’

0
163
संग्रहित छायाचित्र.

नवी दिल्ली: दिल्लीतील हिंसाचार प्रकरणी प्रक्षोभक भाषणे देणाऱ्या भाजप नेत्यांविरूद्ध एफआयआर दाखल करण्याचे निर्देश देणारे दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस. मुरलीधर यांची तडकाफडकी बदली झाल्यामुळे मोदी सरकारवर चौफेर टीका केली जात आहे. ‘ शूर न्यायमूर्ती लोयांची आठवण येत आहे, ज्यांची बदली करण्यात आली नव्हती…’ अशा शब्दांत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. तर न्या. मुरलीधर यांची मध्यरात्री केलेली बदली खेदजनक आणि लज्जास्पद असल्याचे काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी म्हटले आहे.

सोहराबुद्दीन शेख बनावट चकमक प्रकरणाची सुनावणी करणारे न्यायमूर्ती यांचा १ डिसेंबर २०१४ रोजी नागपुरात संशयास्पद मृत्यू झाला होता. या खटल्यात विद्यमान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आरोपी होते. दिल्लीतील हिंसाचार प्रकरणाची सुनावणी करणारे दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस. मुरलीधर यांची तडकाफडकी बदली करण्यात आल्याच्या मुद्यावर राहुल गांधी यांनी ट्विट करून ‘शूर न्यायमूर्ती लोयांची आठवण येत आहे. ज्यांची बदली करण्यात आली नव्हती…’ असा टोला मोदी- शाहांना लगावला आहे.

काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनीही न्या. मुरलीधर यांच्या बदलीवरून मोदी सरकारवर टिकास्त्र सोडले आहे. सध्याची परिस्थिती पाहता न्या. मुरलीधर यांची मध्यरात्री झालेली बदली धक्कादायक नाही परंतु ती निश्चितच खेदजनक आणि लज्जास्पद आहे. लाखो भारतीय लोकांचा न्यायप्रिय आणि प्रामाणिक न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. न्यायाचा उपहास करून नागरिकांचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास नाहीसा करण्याचे सरकारचे प्रयत्न दुस्साहसी आहेत, असे प्रियंका गांधी यांनी म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा