शेतकऱ्यांची ट्रॅक्टर रॅली हायजॅक करण्यासाठी ३०० पाकिस्तानी ट्विटर हॅण्डलः दिल्ली पोलिसांचा दावा

0
163
छायाचित्रः ट्विटर

नवी दिल्लीः मोदी सरकारच्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना ट्रॅक्टर रॅली काढण्यास पोलिसांनी सशर्त परवानगी दिली असूनपाकिस्तानातून ३०० ट्विटर हॅण्डल कार्यान्वित झाली असल्याचा दावा दिल्ली पोलिसांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर प्रजासत्ताक दिनाचे संचलन संपल्यानंतर कडक बंदोबस्तात ट्रॅक्टर रॅली काढण्यात येणार असल्याची माहिती दिल्लीचे विशेष पोलिस आयुक्त ( गुप्तचर यंत्रणा) दीपेंद्र पाठक यांनी दिली.

लोकांची दिशाभूल करून ट्रॅक्टर रॅली हायजॅक करण्यासाठी १३ जानेवारी ते १८ जानेवारी दरम्यान पाकिस्तानातून ३०८ ट्विटर हॅण्डल कार्यान्वित करण्यात आली आहेत. विविध गुप्तचर यंत्रणांकडून ही माहिती मिळाली आहे. आमच्यासाठी हे मोठे आव्हान असणार आहे. तरीही प्रजासत्ताक दिनाचे संचलन संपल्यानंतर कडक सुरक्षा व्यवस्थेत शेतकऱ्यांची ट्रॅक्टर रॅली काढण्यात येणार आहे, असे पाठक म्हणाले.

दरम्यान, दिल्ली पोलिसांनी प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीला सशर्त परवानगी दिली आहे. या रॅलीसाठी अनेक अटी घालण्यात आल्या आहेत. शेतकरी दिल्लीत प्रवेश करू शकतील मात्र प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात कोणताही अडथळा आणणार नाहीत. प्रजासत्ताक दिनाचे संचलन संपल्यावर दुपारनंतरच ट्रॅक्टर रॅली काढता येईल. निश्चित केलेल्या मार्गांवरच ही ट्रॅक्टर रॅली निघेल.

शेतकऱ्यांच्या मागण्यांचा सन्मान राखण्यासाठीच या ट्रॅक्टर रॅलीला परवानगी देण्यात आली आहे. शेतकरी काही किलोमीटरपर्यंतच दिल्लीत प्रवेश करू शकतील आणि नंतर त्यांच्या ठिकाणी परत जातील. अद्याप या ट्रॅक्टर रॅलीमध्ये सहभागी ट्रॅक्टरची संख्या निश्चित करण्यात आलेली नाही. मात्र सुरक्षेची सर्व व्यवस्था करता यावी, अशा पद्धतीने या रॅलीचे नियोजन करण्यात आले आहे.

बॅरिकेड्स हटवणारः आम्ही भारतीय किसान युनियनच्या नेत्यांशी चर्चा केली आहे. प्रजासत्ताक दिनाचा समारंभ संपल्यानंतरच ट्रॅक्टर रॅली काढण्यावर सहमती झाली आहे. या रॅलीदरम्यान कोणताही गोंधळ होणार नाही. आम्ही त्यांना पुरेशी सुरक्षा देऊ. त्यांची रॅली शांततापूर्ण असेल आणि शेवटी ते सीमेवर परत जातील. शेतकऱ्यांना दिल्लीत प्रवेशापासून रोखण्यासाठी लावण्यात आलेले बॅरिकेड्स २६ जानेवारी रोजी हटवण्यात येतील, असे पाठक म्हणाले.

 गडबड करण्याचा प्रयत्नः पाकिस्तानातील अतिरेकी काही तरी मोठी समस्या निर्माण करू शकतील, असा धोका आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण होऊ शकतो. पाकिस्तानातील ३०८ ट्विटर हॅण्डल #farmersProtest #TractorRally अशा हॅशटॅगचा सातत्याने वापर करत आहेत, असे पाठक म्हणाले.

रॅलीसाठी १७० किलोमीटर मार्गः शेतकऱ्यांची ही ट्रॅक्टर रॅली टिकरी, सिंघू, गाझीपूर सीमेवरून दिल्लीत प्रवेश करेल आणि नंतर मूळ ठिकाणी परत जाईल. तीन मार्गांवर १७० किलोमीटर मार्गांवर रॅली काढण्यास शेतकऱ्यांना परवानगी देण्यात आली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा