संघधार्जिण्या कुलगुरूंच्या हकालपट्टीची मागणी, पण विद्यापीठांचे कुलपतीच संघाचे निष्ठावान स्वयंसेवक!

1
298
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील भाजप सरकारच्या काळात विविध विद्यापीठाच्या कुलगुरुपदी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीच्या कुलगुरुंच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. पुणे विद्यापीठातर्फे आयोजित केलेला ‘रिव्हिजिटिंग गांधी’  हा कार्यक्रम ऐनवेळी रद्द केल्याच्या पार्श्वभूमीवर या नियुक्त्या रद्द करून पुरोगामी महाराष्ट्रातील विद्यापीठे संघविचारमुक्त करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. मात्र राज्यपाल आणि राज्यातील विद्यापीठांचे कुलपतीच संघाचे निष्ठावान स्वयंसेवक आहेत. तसे बिरूद ते राजभवनाच्या अधिकृत संकेतस्थळावरच खुलेआम मिरवत आहेत.

फडणवीसांच्या भाजप सरकारने संघ विचारांशी बांधिलकी असणे हाच निकष लावून राज्यातील विविध विद्यापीठांतील कुलगुरुं, प्रकुलगुरू आणि उपकुलगुरूंच्या नियुक्त्या केल्या  होत्या. भाजप सरकार जाऊन राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले तरी हे कुलगुरु अद्यापही कार्यरत आहेत. राज्यात जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील हिंसाचाराच्या घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी महाराष्ट्रातील विद्यापीठाच्या संघधार्जिण्या कुलगुरुंच्या नियुक्त्या रद्द करा, अशी मागणी काँग्रेसचे नेते आशिष देशमुख यांनी यापूर्वीच केली होती. आता पुणे विद्यापीठाने महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांच्या हस्ते उद्घाटन होणारा ‘रिव्हिजिंटिंग गांधी’ हा कार्यक्रम ऐनवेळी रद्द केल्यामुळे या मागणीने पुन्हा एकदा उचल खाल्ली आहे. ज्येष्ठ गांधीवादी नेते आणि महात्मा गांधी स्मारक समितीचे अध्यक्ष कुमार सप्तर्षी यांनी देशातील सर्व राज्यपाल आणि त्यांनी नेमलेले विद्यापीठांचे कुलगुरू, प्रकुलगुरू आणि उपकुलगुरू हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी बांधील आहेत, असा आरोप केला आहे. तुषार गांधी यांच्या हस्ते उद्घाटन आणि उद्घाटनानंतर त्यांचे भाषण नको, असे पत्रच पुणे विद्यापीठाचे उपकुलगुरू डॉ. उमराणीकर यांनी दिले होते. त्यामुळे गांधीवादी मंडळी संतापली आहेत.

असे असले तरी राज्यातील विद्यापीठांचे कुलगुरू, प्रकुलगुरू आणि उपकुलगुरू यांच्या नियुक्त्या करणारे आणि त्यांच्यावर घटनात्मकदृष्ट्या नियंत्रण असलेले महाराष्ट्राचे राज्यपाल आणि विद्यापीठांचे कुलपती भगतसिंह कोश्यारी हेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे निष्ठावान सेवक असल्याचे बिरुद राजभवनाच्या अधिकृत संकेतस्थळावर मिरवत आहेत.  राजभवनाच्या अधिकृत संकेतस्थळावर राज्यपालांचा जो परिचय देण्यात आला आहे, त्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे निष्ठावान स्वयंसेवक असलेल्या कोश्यारी यांना आणीबाणीला विरोध केल्यामुळे सन १९७५ ते १९७७ या कालावधीत तुरूंगवास भोगावा लागला, असे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.

राज्यपाल हे महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९८४ आणि विद्यापीठ परिनियमानुसार राज्यातील २० विद्यापीठांचे कुलपती आहेत. त्यावर अद्याप कुणीही आक्षेप नोंदवलेला नाही. त्यामुळे कुलपतींच्या नियंत्रणाखालच्या कुलगुरू आणि उपकुलगुरूंकडून वेगळी अपेक्षाच ठेवता येणार नाही, असे बोलले जात आहे. महाविकास आघाडीचे सरकारने अशा संघधार्जिण्या कुलगुरू, उपकुलगुरू आणि प्रकुलगुरूंची हकालपट्टी करावी, अशी मागणी होत असून त्यासाठी काही विद्यार्थी संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.

एक प्रतिक्रिया

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा