चलनातून बाद हजार- पाचशेच्या एक कोटींच्या नोटा बदलण्यासाठी आलेले चौघे पोलिसांच्या जाळ्यात!

0
145

औरंगाबादः सुमारे साडेतीन वर्षांपूर्वी चलनातून बाद झालेल्या हजार, पाचशेच्या नोटांचा साठा अद्यापही काही लोकांकडे असून या नोटा बदलून घेण्याचे व्यवहार अजूनही सुरू आहेत, याला पुष्टी देणारी धक्कादायक घटना आज औरंगाबादेत घडली. चलनातून बाद झालेल्या या नोटा बदलून घेण्यासाठी जालना रोडवरील हॉटेलात थांबलेल्या चौघांना गुन्हे शाखा पोलिसांनी बँकर्स बनून पकडले. या चार जणांकडून पोलिसांनी तब्बल ९८ लाख ९२ हजार पाचशे रुपयांच्या नोटा जप्त केल्या आहेत. याप्रकरणी पोलिसांनी प्रियंका सुभाष छाजेड (३०, रा. कामगार कॉलनी, महाराष्ट्र बँकेजवळ, चिकलठाणा), नम्रता योगेश उघडे (४०, रा. देवानगरी, जाबिंदा इस्टेट), मुश्ताक जमशिद पठाण (५३, रा. टाईम्स कॉलनी, कटकटगेट) आणि हशीम खान बशीर खान (४४, रा. लक्ष्मण चावडी, मोंढा रोड) यांना ताब्यात घेतले आहे.

नोव्हेंबर २०१६ मध्ये केंद्र सरकारने चलनातून बाद केल्या. याच हजार व पाचशेच्या नोटा बदलून नवीन नोटा घेण्यासाठी चार जण जालना रोड, सिंधी कॉलनी येथील हॉटेल ग्लोबल इनमध्ये थांबल्याची माहिती गुन्हे शाखा पोलिसांना मिळाली. त्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी योजना आखली. गुन्हे शाखेचे दोन कर्मचारी त्यांना रंगेहाथ पकडण्यासाठी बँकर्स बनले. या पोलिसांनी आपण बँकेचे कर्मचारी आहोत. चलनातून बाद झालेल्या नोटा बदलून देतो असे सांगितले. त्यांचा विश्वास संपादन केल्यानंतर या चौकडीने एक कोटीसाठी पंधरा लाख रुपये द्या, असे पोलिसांना सांगितले. त्यामुळे पोलिसांनी नोटा असल्याची खातरजमा केली. त्यानंतर बुधवारी दुपारी सापळा रचत पोलिस निरीक्षक अनिल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक मनोज शिंदे, सहायक फौजदार नितीन मोरे, पोलिस नाईक भगवान शिलोटे, विलास वाघ, प्रभाकर म्हस्के, विशाल पाटील, आनंद वाहूळ, नितीन देशमुख, विरेश बने, संदीप सानप, प्रभाकर राऊत, अश्वलिंग होनराव, परवेज पठाण, गजानन डुकरे, संजीवनी शिंदे, आशा कुटे व ज्ञानेश्वर पवार यांनी छापा मारुन चौकडीला पकडले. यावेळी त्यांच्या ताब्यातून एक हजार दराच्या एकूण नऊ हजार सहाशे दहा तर पाचशे रुपये दराच्या ५६५ नोटा असे एकूण ९८ लाख ९२ हजार पाचशे रुपये हस्तगत केले. तसेच ३७ हजारांचे मोबाइल जप्त करण्यात आले आहेत.

जप्त केलेल्या नोटा.

नोटा बदलून देण्यासाठी ग्राहकाचा शोधः नम्रता उघडे आणि प्रियंका छाजेड या दोघींना पठाणने हाताशी धरले होते. या दोघींच्या मदतीने पठाण हा नोटा बदलून घेण्यासाठी ग्राहक शोधत होता. याबाबत माहिती मिळताच गुन्हे शाखा पोलिसांनी बँकर्स बनून या चौघांना रंगेहात पकडले.

नोटा नेमक्या कुणाच्या?: पठाण हा जुन्या गाड्या विक्रीचा व्यवसाय करतो. तर नम्रता उघडे ही प्लॉटिंगचा व्यवसाय करते. नोटांसंदर्भात पोलिसांनी पठाणकडे विचारपूस केली. मात्र, तो नोटा आपल्याच असल्याचे पोलिसांना सांगत आहे. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या तपासावर पोलिसांनी भर दिला आहे. त्याची कसून चौकशी केली जाणार आहे. या नोटा कोठुन आणल्या याची माहिती घेण्याचे काम सुरू आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा