नोटबंदीनंतरही 500 रुपयाच्या बनावट नोटांत 221 टक्के, तर 200 रुपयाच्या नोटांत 161 टक्के वाढ

0
86

मुंबईः नोटबंदीमुळे भारतीय चलनातून बनावट नोटा हद्दपार झाल्याचा दावा मोदी सरकार करत असले तरी भारतीय रिझर्व्ह बँकेच्या एका अहवालानुसार 2000 रुपयाच्या बनावटत नोटांत 21.9 टक्के तर 500 रुपयाच्या बनावट नोटांत 221 टक्के वाढ झाली आहे. 200 रुपयाच्या बनावट नोटांतील ही वाढ 161 टक्के आहे.

रिझर्व्ह बँकेच्या 2018-19 च्या वार्षिक अहवालात ही धक्कादायक बाब समोर आली आहे. देशात मोठ्या प्रमाणावर झालेल्या बँक घोटाळ्यांबरोबरच बनावट नोटांच्या प्रमाणातही प्रचंड वाढ झाल्याचे या अहवालावरून स्पष्ट झाले आहे. 2018-19 मध्ये भारतीय चलनातील एकूण बनावट नोटांपैकी 5.6 टक्के बनावट नोटांचा शोध स्वतः रिझर्व्ह बँकेने घेतला आहे, तर इतर बँकांनी 94.4 टक्के बनावट नोटा शोधल्या आहेत. 2017-18 या आर्थिक वर्षात 10 रुपयाच्या बनावट नोटांत 20.2 टक्के, 20 रुपयांच्या बनावट नोटांत 87.2 टक्के आणि 50 रुपयाच्या बनावट नोटांत 57.3 टक्के वाढ झाली आहे, असे रिझर्व्ह बँकेचा हा अहवाल सांगतो.

2017-18 मध्ये 50 रुपयाच्या 23,447 बनावट नोटा, 20 रुपयाच्या 437 आणि 10 रुपयाच्या 287 बनावट नोटा पकडण्यात आल्या होत्या. 2018-19 या वर्षांत हे प्रमाण वाढले. या वर्षात 50 रुपयाच्या 222,218 बनावट नोटा, 20 रुपयाच्या 818 बनावट नोटा आणि 10 रुपयांच्या 345 बनावट नोटा पकडण्यात आल्या आहेत. त्याआधी 2016-17 मध्ये 50 रुपयाच्या 9,222 बनावट नोटा, 20 रुपयाच्या 324 आणि 10 रुपयाच्या 523 बनावट नोटा पकडण्यात आल्या होत्या. बनावट नोटांचे हे आकडे रिझर्व्ह बँक आणि अन्य बँकांनी पकडलेल्या नोटांचे आहेत. या आकडेवारीत पोलिस किंवा अन्य तपास संस्थांनी पकडलेल्या बनावट नोटांचा समावेश नाही.

रिझर्व्ह बँकेच्या अहवालातील आकडेवारीनुसार, 2017-18 च्या तुलनेत 100 रुपयाच्या बनावट नोटांच्या प्रमाणात घट झाली आहे. 2017-18 मध्ये 100 रुपयाच्या 239,182 बनावट नोटा पकडण्यात आल्या होत्या. तर 2018-19 मध्ये 221,218 बनावट नोटा पकडण्यात आल्या आहेत. मात्र, 2016-17 च्या आकडेवारीची तुलना केली तर बनावट नोटांच्या संख्येत वाढ झाली आहे. 2016-17 मध्ये बँकांनी 100 रुपयाच्या एकूण 177,195 नोटा शोधल्या होत्या. अशा प्रकारे 2018-19 मध्ये 100 रुपयाच्या बनावट नोटांच्या प्रमाणात 25 टक्के वाढ झाली आहे.

ऑगस्ट 2017 मध्ये 200 रुपयाची नोट चलनात आणण्यात आली होती. रिझर्व्ह बँकेच्या अहवालानुसार, 2017-18 या वर्षाच्या सुमारे सात महिन्यातच 200 रुपयाच्या 79 बनावट नोटा पकडण्यात आल्या होत्या. 2018-19 मध्ये 200 रुपयाच्या बनावट नोटांच्या प्रमाणात प्रचंड वाढ होऊन हा आकडा 12,728 वर पोहोचला आहे. एक वर्षाच्या आतच 200 रुपयाच्या बनावट नोटांच्या प्रमाणात 161 टक्के वाढ झाली आहे. अशीच 500 रुपयाच्या नवीन बनावट नोटांत 121 टक्के वाढ झाली झाली आहे. वर्ष 2017-18 मध्ये 500 रुपयाच्या नवीन 9,892 बनावट नोटा पकडण्यात आल्या होत्या. 2018-19 मध्ये हा आकडा वाढून 21,865 (221 टक्के) वर पोहोचला आहे.

1000 रुपयाच्या बनावट नोटांतही मोठी वाढ झाली आहे. 2017-18 मध्ये बँकांनी 1000 रुपयांच्या 103,611 बनावट शोधून काढल्याचे रिझर्व्ह बँकेचा हा अहवाल सांगतो. 2018-10 मध्ये मात्र या प्रमाणात घट झाली. या वर्षात 1000 रुपयांच्या 717 बनावट नोटा पकडण्यात आल्या. विशेष म्हणजे नोटबंदी लागू केल्यानंतर 1000 आणि 500 रुपयाच्या जुन्या नोटा चलनातून काढून टाकण्यात आल्या होत्या.

8 नोव्हेंबर 2016 रोजी नोटबंदी लागू केल्यानंतर पहिल्यांदा 2000 रुपयाच्या नव्या नोटा चलनात आणण्यात आल्या होत्या. रिझर्व्ह बँकेच्या अहवालानुसार, ही नोट चलनात आणल्याच्या पुढच्या चार महिन्यांतच बँकांनी 638 बनावट नोटा शोधून काढल्या होत्या. पुढच्या वर्षी या प्रमाणात मोठी वाढ झाली. 2017-18 मध्ये 2000 रुपयाच्या 17,929 बनावट नोटा पकडल्या गेल्या. वर्ष 2018-19 मध्ये 2000 रुपयाच्या बनावट नोटांमध्ये 21.9 टक्के वाढ झाली. या वर्षी रिझर्व्ह बँकेसह अन्य बँकांनी  2000 रुपयाच्या एकूण 21,847 नोटा पकडल्या.

नोटबंदी घोषणा करताना मोदी सरकारने रोख रक्कमेचे व्यवहार कमी करणे, बनावट नोटा आणि काळा पैसा संपुष्टात आणण्यासाठीच नोटबंदी करण्यात आल्याचे सांगितले होते. नोटबंदीमुळे बनावट नोटांना पायबंद बसला आहे, असा मोदी सरकारचा दावा आहे. परंतु रिझर्व्ह बँकेच्या संचालक मंडळाच्या झालेल्या बैठकीत भारतीय चलनात एकूण 400 कोटी रुपयांच्याच बनावट नोटा आहेत आणि ही रक्कम एकूण चलनाच्या तुलनेत खूपच कमी आहे, असे म्हटले होते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा