कर्जत-जामखेड तालुक्याच्या विकासासाठी भरीव निधी देणारः उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आश्वासन

0
91

अहमदनगर :  कर्जत-जामखेड तालुक्याच्या विकासासाठी आणि येथील आरोग्य, शिक्षण, रोजगार, रस्ते या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी आवश्यक भरीव निधी उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

कर्जत तालुक्यातील माहिजळगाव येथे आयोजित महाराजस्‍व अभियानाअंतर्गत विस्तारित समाधान योजना, सृजन शासकीय योजना शिबिराचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते झाले. ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ, ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष राजश्री घुले, आ. सुधीर तांबे, आ.लहू कानडे, शिबिराचे आयोजक आ. रोहित पवार, बारामती ॲग्रोचे अध्यक्ष राजेंद्र पवार आदींची उपस्थिती होती.

नवीन सरकारकडून लोकांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. या अपेक्षा पूर्ण करण्याचा आणि सर्वसामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न निश्‍चितपणे केला जात आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा तसेच त्यांना स्वयंपूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही 50 हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. अहमदनगर जिल्ह्याच्या विकासासाठी आवश्यक सर्व करण्याचा आणि त्यासाठी आर्थिक निधी उपलब्ध करून देण्याचा शब्द तुम्हाला देतो, अशा शब्दात पवार यांनी कर्जत-जामखेडकरांना आश्वस्त केले. मागील सरकारचा काळात प्रलंबित राहिलेली कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल. यात तुकाई चारी,  कुकडी चारीचे काम, पिण्याच्या पाण्याच्या योजना, चौंडी तीर्थक्षेत्र विकासाला चालना यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल. कर्जत आणि जामखेड येथे अद्ययावत बसस्थानकासाठी निधीची तरतूद उपलब्ध करून देणार असल्याचे अजित पवार म्हणाले. महिलांच्या सुरक्षिततेसाठी अधिक कडक कायदा आपण करणार आहोत. पोलिसांनीही जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था चोख राखण्याच्या दृष्टीने सर्व प्रयत्न करण्याचे निर्देश पवार यांनी दिले.

प्रास्ताविकात आमदार पवार यांनी शिबिराचे आयोजन करण्यामागील भूमिका स्पष्ट केली. या शिबिराच्या माध्यमातून माहि जळगाव, जामखेड तालुक्यातील खर्डा मंडळातील गावे आणि कर्जत शहर येथील 42 हजार लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ देण्यात आल्याचे ते म्हणाले. या महाराजस्व अभियान प्रसंगी महसूल, सामाजिक वनीकरण, परिवहन, कृषी,आरोग्य शिक्षण, भूमी अभिलेख यासह विविध विभागांचे स्टॉल्स लावण्यात आले होते. तेथे विविध नागरिकांना योजनांची माहिती तसेच लाभासाठी पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यात येत होता. या स्टॉल्सची पाहणी उपमुख्यमंत्री पवार, पालकमंत्री मुश्रीफ आणि मान्यवरांनी केली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा