बांधकामासाठीचे विकास शुल्क ग्रामनिधीत जमा होणार, ग्रामपंचायतींच्या उत्पन्नात होणार वाढ

0
76

मुंबई:  ग्रामीण भागातील बांधकामासाठीचे विकास शुल्क ग्रामनिधीत जमा करण्या येणार असून त्यामुळे ग्रामपंचायतींच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. परिणामी हा निधी गावांच्या विकासासाठी वापरता येणार आहे.

राज्यातील ग्रामीण भागातील ३ हजार २२९ चौरस फुटापर्यंतच्या (३०० चौरस मीटर) भूखंडावरील बांधकामांना नगररचनाकाराच्या परवानगीची गरज नसल्याबाबतचा निर्णय नुकताच घेण्यात आला आहे. याऐवजी ग्रामस्थांना आता बांधकामासाठी काही कागदपत्रे ग्रामपंचायतीकडे सादर करावयाची असून विकास शुल्क आणि बांधकाम कामगार उपकर भरावयाचा आहे. ग्रामीण भागातील नागरीकांना दिलासा देणाऱ्या या निर्णयाची अंमलबजावणी करण्याच्या सूचना ग्रामविकास विभागामार्फत राज्यातील सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्राद्वारे देण्यात आल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

नगरविकास विभागाने जाहीर केलेल्या युनिफाईड डीसीआर (एकत्रीकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली) यास अनुसरुन नुकताच ग्रामीण बांधकामासंदर्भातील निर्णय जाहीर करण्यात आला आहे. आता नव्या निर्णयानुसार बांधकामासाठी भरावयाचे विकास शुल्क हे बांधकामइच्छूक ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीकडे भरावयाचे असून यामुळे ग्रामपंचायतीच्या उत्पन्नातही मोठी वाढ होणार आहे, अशी माहितीही मंत्री मुश्रीफ यांनी दिली.

नगरविकास विभागाकडून डिसेंबर २०२० मध्ये अधिसूचनेन्वये एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन जारी करण्यात आली आहे. या नियमावली अन्वये ग्रामीण भागातील इमारत बांधकामाबाबत बांधकाम परवानगीचे निकष निश्चित केले आहेत. बांधकाम परवानगीच्या अनुषंगाने अधिक स्पष्टीकरणासाठी नगरविकास विभाग शासन अधिसूचना दिनांक २ डिसेंबर, २०२० मधील तरतुदी प्रमाणभूत समजण्यात याव्यात. तसेच उक्त बांधकाम परवानगीच्या अनुषंगाने अंमलबजावणी करताना अडीअडचणी आल्यास जिल्ह्यातील सबंधित नगररचना अधिकारी यांचे मार्गदर्शन घेण्यात यावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

असे असेल जमीन विकास शुल्कः ग्रामीण भागात होणाऱ्या विविध बांधकामांच्या परवानगीच्या अनुषंगाने विकास शुल्क व बांधकाम कामगार उपकर लागू राहील. नगरविकास विभागाच्या एमआरटीपी कायद्यानुसार जमीन विकास शुल्क हे रहिवाससाठी त्या जागेच्या रेडीरेकनर दराने होणाऱ्या किमतीच्या अर्धा टक्के असेल, तर वाणिज्यसाठी त्या जागेच्या रेडीरेकनर दराने होणाऱ्या किमतीच्या १ टक्के असेल. बांधकाम विकास शुल्क हे रहिवाससाठी त्या जागेच्या रेडीरेकनर दराने होणाऱ्या किमतीच्या २ टक्के असेल, तर वाणिज्यसाठी त्या जागेच्या रेडीरेकनर दराने होणाऱ्या किमतीच्या ४ टक्के इतके असेल.

 बांधकाम किमतीच्या १ टक्का कामगार उपकरः जमीन विकास शुल्क आणि बांधकाम विकास शुल्क मिळून एकुण विकास शुल्क होईल. हे विकास शुल्क संबंधित ग्रामपंचायतीकडे ग्रामनिधीमध्ये जमा करुन घेण्यात यावे व त्याची स्वतंत्रपणे नोंद ठेवण्यात यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. याशिवाय बांधकाम किमतीच्या १ टक्के इतका बांधकाम कामगार उपकर असेल. हा उपकर संबंधीत प्राधिकरणाकडे जमा करावयाचा आहे.  

या कागदपत्रांची तपासणी आवश्यकः यूनिफाईड डीसीआरमधील तरतुदीनुसार ३०० चौरस मीटर क्षेत्रफळापर्यंतच्या भूखंडावरील गावठाण हद्दीतील इमारत बांधकामाकरिता ग्रामपंचायतींकडून कागदपत्रांची तपासणी करणे आवश्यक आहे. यामध्ये  जागेच्या मालकीची कागदपत्रे, मंजूर लेआऊट, बिल्डिंग प्लान (पी लाईनसहित), विकास शुल्क व बांधकाम कामगार उपकर सबंधित प्राधिकरणाकडे भरल्याची पोच/पावती, आर्किटेक्टचा विहित नमुन्यातील दाखला  यांचा समावेश राहील.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा