फडणवीसांनी घेतली गँगस्टर इक्बाल मिर्चीकडून १० कोटींची खंडणीः गोटेंचा बॉम्बगोळा, ईडीकडे तक्रार

0
460
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमशी संबंधित मालमत्तांची खरेदी केल्याच्या आरोपावरून सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना अटक केल्यामुळे राजकीय वातावरण तापलेले असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल गोटे यांनी गुरूवारी माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर बॉम्बगोळा टाकला. दाऊदचा उजवा हात असलेल्या गँगस्टर इक्बाल मिर्चीशी संबंधित कंपनीकडून तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला १० कोटी रुपयांची देणगी मिळाल्याचा आरोप गोटे यांनी केला असून याबाबत त्यांनी गुरूवारी ईडीकडेही तक्रार केली आहे.

विशेष म्हणजे फडणवीसांविरुद्ध हा गंभीर आरोप करणारे अनिल गोटे हे भाजपचे माजी आमदार आहेत. देवेंद्र फडणवीस सरकारने कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमचा उजवा हात इक्बाल मिर्चीकडून खंडणी गोळा केल्याप्रकरणी अनिल गोटे यांनी मुंबईतील ईडीच्या कार्यालयात गुरूवारी तक्रार नोंदवली असून फडणवीस यांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी या तक्रारीत करण्यात आली आहे. याबाबतची माहिती स्वतः अनिल गोटे यांनीच पत्रकारांशी बोलताना दिली.

न्यूजटाऊन एक्सक्लुझिव्हः  डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्राध्यापक भरती घोटाळ्यातील एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट वाचा एका क्लिकवर, वाचण्यासाठी येथे क्लिक करा

 गँगस्टर दाऊद इब्राहीमचा उजवा हात असलेला इक्बाल मिर्ची हा देशद्रोही असून १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोट मालिकेतील मुख्य आरोपी आहे. इक्बाल मिर्चीशी संबंधित असलेल्या आरकेडब्ल्यू डेव्हलपर्स प्रा. लि. या बांधकाम कंपनीचा मालक राकेश वाधवान यांच्या बँख खात्यातून फडणवीस सरकारला २०१४ ते २०१५ मध्ये १० कोटी रुपयांची देणगी मिळाली. राकेश वाधवान हा पीएमसी बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी असून सध्या तो तुरूंगात आहे, असे गोटे म्हणाले.

 आरकेडब्ल्यू डेव्हलपर्स प्रा. लि. म्हणजेच पीएमसी बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी राकेश वाधवान याच्या कन्स्ट्रक्शन कंपनीच्या बँक खात्यातून १० कोटी रुपये भाजपला देणगी म्हणून देण्यात आले. पण ही देणगी आहे की खंडणी? असा सवाल गोटे यांनी केला आहे. भाजपला १० कोटींची ही देणगी की खंडणी दोनवेळा देण्यात आली. अतिरेक्यांशी संबंध जोडून ईडी जर मंत्री नवाब मलिक यांना अटक करू शकते तर तोच न्याय फडणवीस यांनाही लावण्यात यावा, अशी मागणी ईडीकडे केल्याचे गोटे यांनी सांगितले.

चला उद्योजक बनाः स्फूर्ती योजना देते पारंपरिक उद्योगांना ५ कोटींपर्यंतचा निधी, जाणून घ्या तपशील

भाजप नेत्यांनी केलेल्या तक्रारीवरून ईडीने महाविकास आघाडीतील अनेक नेते आणि मंत्री रडावर घेतले आहेत. ईडीने काही जणांना समन्स पाठवून चौकशी केली, काही जणांच्या ठिकाणांवर छापेमारी केली. उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या मालमत्तेवर टाच आणली तर नवाब मलिक आणि अनिल देशमुख या मंत्र्यांना अटक केली. भाजपकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर केला जात असल्याचा आरोप सत्ताधारी महाविकास आघाडीकडून केला जात आहे. त्यामुळे आता अनिल गोटे यांनी देवेंद्र फडणवीसांविरुद्ध तक्रार दाखल करून त्यांच्या चौकशी मागणी केल्यानंतर ईडीकडून काही कारवाई केली जाते की गोटेंच्या तक्रारीला कचराकुंडी दाखवली जाते, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा