चिंता मिटलीः डीआरडीओने शोधले कोरोना बरे करणारे औषध, ऑक्सीजनची गरजही कमी होणार!

0
294

नवी दिल्लीः कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे सबंध देश हैराण झाला आहे.  दररोज चार लाखांहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत असल्यामुळे आरोग्य व्यवस्था कोलमडून पडली आहे. मोदी सरकारच्या कोरोना व्यवस्थापनाचे जगभरात वाभाडे काढले जात आहेत. अशातच संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजेच डीआरडीओने कोरोना संसर्गावरील औषध शोधून काढले आहे. कोरोनावरील उपचारात प्रभावी ठरणाऱ्या या औषधाच्या आपत्कालीन वापराला भारताच्या औषधी महानियंत्रकांनी ( डीजीसीआय) परवानगी दिली आहे. या औषधामुळे कोरोना रुग्ण लवकरच बरा होतो, असे डीआरडीओने म्हटले आहे.

डीआरडीओच्या  इन्सिट्यूट ऑफ न्यूक्लिअर अँड अलाइड सायन्सने (आयएनएमएएस) हैदराबादच्या डॉ. रेड्डीज लॅबसोबत २ डीऑक्सी-डी ग्लूकोज (२ डीजी) हे औषध विकसित केले आहे. या औषधामुळे कोरोनाचा रुग्ण लवकर बरा होतो आणि या औषधामुळे ऑक्सीजनवरील अवलंबित्वही कमी होते, असे डीआरडीओने म्हटले आहे.

पावडरच्या स्वरूपातील हे औषध असून पाण्यात मिसळून ते तोंडावाटे घेता येते. हे औषध कोरोनाची मध्यम आणि गंभीर लक्षणे असलेल्या रुग्णावर वापरण्यास मंजुरी देण्यात आली आहे. ज्या रुग्णांवर या औषधाचा प्रयोग करण्यात आला, त्या रुग्णांची आरटीपीसीआर चाचणी लवकर निगेटिव्ह आली. २ डीऑक्सी-जीमुळे रुग्णालयात दाखल रुग्ण रुग्ण लवकर बरे होतात आणि त्यांना अतिरिक्त ऑक्सीजन देण्याची गरजही कमी होते.

या औषधाच्या मे ऑणि ऑक्टोबर दरम्यान दुसऱ्या टप्प्यातील चाचण्या करण्यात आल्या. या चाचण्यात हे औषध सुरक्षित आढळून आले आहे. चाचण्यांमध्ये कोरोना रुग्णांत प्रचंड सुधारणा आढळून आली. दुसऱ्या टप्प्यात ११० रुग्णांवर या औषधाच्या चाचण्या घेण्यात आल्या. तिसऱ्या टप्प्यात वेगवेगळ्या ११ रुग्णालयांतील रुग्णांवर या औषधाच्या चाचण्या घेण्यात आल्या.

२ डीऑक्सी-जी हे औषध कोरोनाचा संसर्ग झालेल्या पेशींमध्ये जमा होते आणि कोरोना विषाणूची वाढ रोखते. विषाणूमुळे संक्रमित झालेल्या पेशी निवडून त्यावरच ही औषधी काम करते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा