पूजा चव्हाण प्रकरणी पोलिस महासंचालकांचे चौकशीचे आदेश, वनमंत्री राठोड नॉट रिचेबल

0
498
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः बीड जिल्ह्याच्या परळीतील तरूणी पूजा चव्हाण हिच्या आत्महत्या प्रकरणी सखोल चौकशीचे आदेश पोलिस महासंचालक हेमंत नगराळे यांनी पुणे पोलिसांना दिले आहेत. या आत्महत्या प्रकरणी राजकारण चांगलेच तापू लागले असून विरोधकांनी या प्रकरणाशी वनमंत्री संजय राठोड यांचे नाव जोडले आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राठोड हे नॉट रिचेबल आहेत. यवतमाळमधील त्यांच्या कार्यालयातील कार्यकर्त्यांची वर्दळही कमी झाली आहे.

प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपकडून पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला जात असतानाच काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणी सखोल चौकशी होईल. चौकशीतून सत्य जनतेसमोर येईल आणि चौकशीनंतर ज्याच्यावर कारवाई करण्याची आवश्यकता असेल, त्याच्यावर कारवाई केली जाईल, असे म्हटले होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून कुणाला तरी आयुष्यातून उठवण्याचे प्रयत्न केले जात असल्याचे दिसते आहे. तसे होता कामा नये, अशी अपेक्षाही ठाकरे यांनी व्यक्त केली होती.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाचा तपास पुण्याच्या परिमंडळ पाचच्या पोलिस उपायुक्त नम्रता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक दीपक लगड करत आहेत. या प्रकरणात पूजा चव्हाण यांच्या कुटुंबीयांकडून अद्याप कोणतीही तक्रार देण्यात आली नाही. पुणे पोलिसांनी या प्रकरणी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. दरम्यान, राष्ट्रीय महिला आयोगाने या प्रकरणाची दखल घेत पुणे पोलिसांकडून चौकशीचा अहवाल मागितला आहे.

पूजा चव्हाण ही परळीतील तरूणी इंग्रजी संभाषण कौशल्य अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी पुण्यात आली होती. पुण्याच्या हेवन पार्क या उच्चभ्रू वसाहतीत पूजा, तिचा चुलत भाऊ आणि एक मित्र राहत होते. रविवारी (७फेब्रुवारी) रोजी पूजाने बाल्कनीतून उडी मारून आत्महत्या केली होती. या आत्महत्या प्रकरणात पूजाचा चुलत भाऊ आणि मित्राचा जबाब नोंदवण्यात आला आहे.

पूजा चव्हाणच्या आत्महत्येमागे एक मंत्री असल्याचे मोबाइल संभाषणावरून स्पष्ट होत आहे. तरूणीचा लॅपटॉप स्कॅन केल्यास आणखी पुरावे बाहेर येतील. त्यामुळे मुख्यमंत्री आणि सरकारचे कर्तेधर्ते शरद पवार यांनी संबंधित मंत्र्यांवर कारवाई करावी, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली होती. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही पोलिस महासंचालकांना पत्र लिहून काही ऑडिओ क्लिप्सही पाठवल्या होत्या. मात्र या दोघांनीही कोणत्याही मंत्र्याचे नाव घेतले नसताना भाजपच्या उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी मात्र थेट वनमंत्री संजय राठोड यांचे नाव घेतले होते.

वनमंत्री संजय राठोड नॉटरिचेबलः पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात वनमंत्री संजय राठोड यांचे नाव घेतले जाऊ लागल्यामुळे ते अडचणीत आले आहेत. राठोड यांच्याविरुद्ध भाजपने जोरदार मोहीम उघडली आहे. वनमंत्री राठोड गेल्या आठवडाभरापासून मंत्रालयात आलेले नाहीत. गेल्या तीन दिवसांपासून त्यांचा मोबाइलही नॉटरिचेबल आहे. दोन दिवसांपासून राठोड यांची गाडी मंत्रालयाच्या पार्किंगमध्येच आहे. त्यामुळे त्यांच्याविषयाची कुतुहल वाढू लागले आहे. रेणू शर्मा प्रकरणात आरोप झाल्यानंतर सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी स्वतःहोऊन पुढे येत आपली बाजू मांडली होती. तशी कोणतीही बाजू राठोड यांनी अद्याप मांडलेली नाही.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा