धनंजय मुंडेंवर बालंट कायमः पोलिसांनी FIR नोंदवला नाही तर रेणू शर्मा न्यायालयात जाणार

0
348
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्कार आणि लैंगिक शोषणाच्या आरोपाचे बालंट कायम आहे. पोलिसांनी एफआयआर नोंदवून घेतला नाही तर स्थानिक न्यायालयात दाद मागू, असा इशारा धनंजय मुंडेंवर हे आरोप करणाऱ्या रेणू शर्मा या गायिका महिलेने दिला आहे.

रेणू शर्मा  गायिका महिलेने धनंजय मुंडेंवर बलात्कार आणि लैंगिक शोषणाचा आरोप केल्यानंतर महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले होते. भाजपने मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणीही केली होती. मात्र मुंबई भाजपचे उपाध्यक्ष कृष्णा हेगडे आणि मनसेचे नेते मनीष धुरी यांनी ही महिला प्रतिष्ठित व्यक्तींना हनी ट्रॅपमध्ये अडकवून ब्लॅकमेल करणारी असल्याचे आरोप केल्यानंतर या प्रकरणाला वेगळेच वळण लागले होते. आणि धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदावरील बालंट टळल्यासारखे वाटत होते.

या सर्व घडामोडींनंतर रेणू शर्माने मैंही पिछे हट जाती हूं, असे ट्विट केल्यामुळे ती हे प्रकरण फारसे ताणणार नाही, असेही संकेत मिळाले होते. मात्र काल डीएन नगर पोलिस ठाण्यात सहायक आयुक्तांसमोर सात तास जबाब नोंदवल्यानंतर तिची भूमिका बदलली आहे. पोलिसांनी रेणू शर्माच्या तक्रारीवरून एफआयआर दाखल करून घेतला नाही तर आम्ही स्थानिक न्यायालयात दाद मागू, असे रेणू शर्माच्या वकील सुधा द्विवेदी यांनी म्हटले आहे.

एफआयआरबद्दल पोलिसांनी आम्हाला काहीही सांगितलेले नाही. पोलिसांनी जर आमचा एफआयआर नोंदवून घेतला नाही तर आम्ही न्यायालयात जाऊ. खासगी तक्रार करून न्यायालयीन प्रक्रिया करू, असे द्विवेदी यांनी म्हटले आहे. त्यामुळे  धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपाचे प्रकरण आता न्यायालयीन कचाट्यात अडकण्याची शक्यता बळावली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा