धनंजय मुंडे आणि त्यांच्या ‘लिव्ह इन पार्टनर’ महिलेमधील वाद आता मध्यस्थांसमोर

0
844
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः परळीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे आणि त्यांच्या लिव्ह इन पार्टनरमधील वाद परस्पर सामंजस्याने मिटवण्याचे ठरवण्यात आले आहे. त्यामुळे आता हे प्रकरण न्यायालायाने नियुक्त केलेल्या मध्यस्थांसमोर जाणार आहे.

मुंडे यांनी त्यांच्यासोबत लिव्ह इन पार्टनरशिपमध्ये राहिलेल्या महिलेच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात अब्रुनुकसानीचा दावा केला होता. मात्र मुंडे आणि त्या महिलेच्या वतीने गुरूवारी हा वाद परस्पर सहमतीने सोडवण्याबाबतचे मुद्दे गुरूवारी न्या. ए.के. मेनन यांच्यासमोर सादर करण्यात आले. त्यामुळे हे प्रकरण न्यायालयाने नियुक्त केलेल्या मध्यस्थांसमोर जाणार आहे.

धनंजय मुंडे हे विवाहित असून त्यांना दोन मुली आहेत. मुंडेंना त्यांच्या लिव्ह इन पार्टनरपासून एक मुलगा आणि एक मुलगी आहे. त्या दोघांनाही आपले नाव दिले असल्याचे मुंडे यांनी यापूर्वीच जाहीर केले आहे. मुंडेंसोबत लिव्ह इन पार्टनर म्हणून राहिलेल्या या महिलेने काही महिन्यांपूर्वी मुंडे यांच्यासोबतची छायाचित्रे आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केले होते.

आपल्या लिव्ह इन पार्टनरच्या या कृतीमुळे धनंजय मुंडे यांनी ४ डिसेंबर रोजी मुंबई उच्च न्यायालयात अब्रुनुकसानीचा व भरपाईचा दावा दाखल केला होता. नंतर मुंडे यांनी आपल्यासोबतचे खासगी छायाचित्रे आणि व्हिडीओ आणि ऑडिओ रेकॉर्डिंग फेसबुक, व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम किंवा ट्विटर तसेच इलेक्ट्रॉनिक व प्रिंट मीडियात प्रसिद्ध करण्यास मनाई करावी, अशी विनंती न्यायालयाला केली होती.

धनंजय मुंडे यांच्या विनंतीनुसार मुंबई उच्च न्यायालयाने १६ डिसेंबर २०२० रोजी त्या महिलेला मनाई करणारा सशर्त आदेश काढला होता. त्यानंतर हे प्रकरण परस्पर सामंजस्याने मिटवायचे असल्याचे दोन्ही बाजूंनी सांगण्यात आल्यानंतर न्या. मेनन यांनी परस्पर सहमतीचे मुद्दे सादर करण्यासाठी या प्रकरणावर गुरूवारी सुनावणी ठेवली होती. त्यानुसार मुंडे यांच्या वतीने ऍड. शार्दुल सिंग आणि त्या महिलेच्या वतीने ऍड. ए.आर. शेख यांनी परस्पर सहमतीचे मुद्दे सादर केले.

आता उच्च न्यायालय हे प्रकरण परस्पर सहमतीने सोडवण्यासाठी मध्यस्थाची नियुक्ती करणार असून त्या मध्यस्थामार्फत या प्रकरणात सहमती घडवून आणली जाईल.

विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच या महिलेच्या बहिणीने धनंजय मुंडे यांनी आपल्याला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार आणि लैंगिक शोषण केल्याचा आरोप करून खळबळ उडवून दिली होती. त्यावरून महाराष्ट्राचे राजकारण चांगलेच तापले होते आणि विरोधकांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणीही केली होती. नंतर त्या महिलेने मुंडे यांच्या विरोधातील तक्रार मागे घेतली आणि या प्रकरणावर पडदा पडला.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा