सोमवारच्या मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेकडून संजय शिरसाठ, राष्ट्रवादीकडून धनंजय मुंडेंना संधी?

0
186
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः महाविकास आघाडीच्या उद्धव ठाकरे सरकारचा शपथविधी येत्या सोमवारी दुपारी एक वाजता होत असून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना अशा तिन्ही पक्षांचे मिळून 36 मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे. शिवसेनेकडून औरंगाबादच्या संजय शिरसाठांना तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून धनंजय मुंडेंना मंत्रिपदाची संधी दिली जाण्याची शक्यता आहे. या शपथविधी समारंभाला मंत्र्यांचे नातेवाईक, पक्षाचे कार्यकर्ते, समर्थक, आमदार आणि राजकीय नेते मोठ्या संख्येने उपस्थित रहाण्याची शक्यता गृहित धरून हा शपथविधी समारंभ राजभवनाऐवजी विधानभवनाच्या प्रांगणात होणार आहे. विधानभवनात या शपथविधी समारंभाची जय्यत तयारी सुरुही झाली आहे.

महाविकास आघाडी सरकारचा शपथविधी 28 नोव्हेंबरला शिवतीर्थीवर पार पडला होता. तेव्हापासूनच मंत्रिमंडळाच्या विस्ताराची चर्चा सुरु होती. मात्र या ना त्या कारणाने हा मंत्रिमंडळ विस्तार लांबतच गेला. दोनच दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात मंत्रिमंडळ विस्ताराबाबत सह्याद्री अतिथीगृहावर चर्चा झाली होती. सोमवारी, 30 डिसेंबरला होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी 10 मंत्री आणि तीन राज्यमंत्री तर काँग्रेसचे 10 मंत्री शपथ घेणार आहेत. या मंत्रिमंडळ विस्तारावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना आपले मित्र पक्ष तसेच अपक्षांनाही सामावून घेण्याची शक्यता आहे. शिवसेनेकडून प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू तर काँग्रेसकडून समाजवादी पक्षाचे अबू आझमी यांना मंत्रिपदाची संधी दिली जाण्याची शक्यता आहे.

 मंत्रिपदासाठी तिन्ही पक्षांत यांची नावे चर्चेतः

शिवसेनाः रविंद्र वायकर, उदय सामंत, गुलाबराव पाटील, तानाजी सावंत, आशिष जैस्वाल, संजय राठोड, दादा भुसे, दिवाकर रावते, अनिल परब, डॉ. राहुल पाटील, संजय शिरसाठ, अनिल बाबर, शंभूराजे देसाई.

 राष्ट्रवादी काँग्रेसः अजित पवार, दिलीप वळसे पाटील, नवाब मलिक, धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड, हसन मुश्रीफ, अनिल देशमुख, राजेंद्र शिंगणे, मकरंद पाटील, बाळासाहेब पाटील, सरोज अहिरे, डॉ. किरण लहामटे.

काँग्रेसः माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार, के.सी. पडवी, अमित देशमुख, सतेज पाटील, विश्‍वजित कदम, यशोमती ठाकूर, सुनिल केदार, वर्षा गायकवाड, अमिन पटेल, प्रणिती शिंदे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा