धनंजय मुंडेंचे मंत्रिपद वाचले; भाजपने ऐनवेळी ‘मनसे’ दिलेली साथ आली कामी!

0
2568
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः गायिका महिलेकडून बलात्कार आणि लैंगिक शोषणाचा आरोप झाल्यामुळे अडचणीत आलेले परळीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना तूर्तास दिलासा मिळाला असून त्यांना तूर्तास मंत्रिपदी कायम ठेवण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. भाजपचे मुंबई उपाध्यक्ष आणि माजी आमदार कृष्णा हेगडे आणि मनसे नेते मनीष धुरी यांनी मुंडेंवर बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेवर ब्लॅकमेलिंग आणि हनी ट्रॅपचे आरोप केल्याचा मुद्दा मुंडे यांच्या चांगलाच पथ्यावर पडल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

धनंजय मुंडे यांच्यावर झालेले आरोप गंभीर असून पक्ष म्हणून त्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरूवारीच सांगितले होते. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी गुरूवारी रात्री उशिरा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक झाली. या बैठकीत भाजप आणि मनसे नेत्यांनी त्या महिलेविरुद्ध केलेले हनी ट्रॅप आणि ब्लॅकमेलिंगचा मुद्दा महत्वाचा ठरल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सूत्रांनी सांगितले.

शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिकही उपस्थित होते. धनंजय मुंडे यांनी त्या महिलेने केलेले आरोप आधीच फेटाळून लावले असून ती महिला आपल्याला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करत असल्याचे म्हटले आहे.

हेही वाचाः मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढल्या, आमदारकीला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान

मुंबई भाजपचे उपाध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू कृष्णा हेगडे यांनी मुंडेंवर आरोप करणारी ती महिला प्रतिष्ठित व्यक्तींना हनी ट्रॅपमध्ये अडकवून ब्लॅकमेल करत असल्याची तक्रार आंबोली पोलिसात दिली आहे. ही महिला आपल्याही मागे लागली होती. तिने वारंवार आपल्याला कॉल केले. मात्र ती महिला लबाड असून हनी ट्रॅपमध्ये अडकवून ब्लॅकमेल करत असल्याची आपल्याला माहिती मिळाल्यामुळे आपण तिच्याशी संपर्क टाळला. एवढे दिवस मी गप्प होतो, परंतु तिने धनंजय मुंडेंना लक्ष्य केल्यामुळे या सगळ्या बाबींचा खुलासा करत आहे. मुंडेंच्या आधी कदाचित मीच त्या महिलेचे टार्गेट झालो असतो, आज मुंडे तर उद्या दुसरा कुणी होईल, असे हेगडे म्हणाले.

हेही वाचाः धनंजय मुंडेंची आमदारकी गेली तर….परळीत पंकजा मुंडेंच्या कार्यकर्त्यांच्या आशा पल्लवित

मनसे नेते मनीष धुरी यांनीही त्या महिलेवर असाच आरोप केला आहे. अन्य राजकीय पक्षांच्या नेत्यांसह एक माजी अधिकाऱ्यानेही त्या महिलेवर असेच आरोप केले. हे सगळे आरोप ती महिला ब्लॅकमेल करत असल्याच्या धनंजय मुंडे यांच्या दाव्याला पुष्ठी देणारे ठरले आहेत.

हेही वाचाः भ्रष्टाचाराविरोधात रान उठवणाऱ्या अण्णा हजारेंच्या गावातच निवडणुकीत भ्रष्टाचार, चार जणांवर गुन्हे

धनंजय मुंडे प्रकरणाची चौकशी सुरू आहे. त्या चौकशीतून काय निष्पन्न होते, याची आम्हाला प्रतीक्षा करावी लागेल. त्यामुळे चौकशी पूर्ण होऊन त्यातून ठोस निष्कर्षाप्रत पोहोचेपर्यंत धनंजय मुंडे यांना मंत्रिपदी कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले.

कुणी आरोप केले म्हणून धनंजय मुंडे राजीनामा देणार नाहीत. मात्र या प्रकरणावर पक्षात चर्चा केली जाईल आणि वस्तुस्थिती विचारात घेऊन निर्णय घेतला जाईल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गुरूवारीच स्पष्ट केले होते. या प्रकरणात सुरू असलेल्या पोलिस चौकशीतून काय निष्पन्न होते, त्यावरच मुंडे यांच्याबाबत निर्णय घेतला जाईल, असेही पाटील यांनी स्पष्ट केले होते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा