जात प्रमाणपत्र पडताळणीची प्रलंबित प्रकरणे एक महिनाभरात निकाली निघणार, मुंडेंनी दिले निर्देश

0
133
संग्रहित छायाचित्र.

मुंबई: जात प्रमाणपत्र पडताळणी अंतरिम ऑनलाइन प्रक्रिया नागरिकांचा वेळ व चकरा वाचवण्यासाठी विकसित करण्यात आली आहे. जिल्हानिहाय आकडेवारी पाहिली असता जवळपास ३५ हजारच्या वर प्रकरणे प्रलंबित आहेत. ही सर्व प्रकरणे एक महिन्याच्या आत निकाली काढण्याचे निर्देश सामाजिक न्याय व विशेषसहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी सर्व जिल्ह्यांच्या जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.

जात प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रिया वेब पोर्टलच्या माध्यमातून प्रायोगिक तत्वावर ऑनलाइन पद्धतीने कार्यरत असून  या प्रक्रियेच्या ६ महिन्यांच्या कामकाजाचा आढावा आज मुंडे यांनी घेतला. या बैठकीस सामाजिक न्याय विभागाचे मुख्य सचिव श्याम तांगडे, समाज कल्याण आयुक्त प्रशांत नारनवरे, बार्टीचे महासंचालक धम्मजित गजभिये तसेच राज्यातील सर्व जिल्ह्यांचे जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे प्रमुख अधिकारी ऑनलाईन वेबिनारद्वारे उपस्थित होते.

प्रत्येक जिल्ह्याच्या समिती अधिकाऱ्यांकडून त्या त्या जिल्ह्यातील दाखल प्रकरणे किती, प्रलंबित किती व त्यांची कारणे यावेळी मुंडे यांनी जाणून घेतली. महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेनंतर सामाजिक न्याय विभागाचा पदभार स्वीकारताच जात प्रमाणपत्र पडताळणीची प्रक्रिया सुलभ व्हावी, तसेच त्यासाठी नागरिकांना माराव्या लागणाऱ्या चकरा कमी कराव्यात, या उद्देशाने पासपोर्टच्या धर्तीवर जातप्रमाणपत्राची पडताळणी करण्याची प्रक्रिया विकसित करण्याचे मुंडेंनी जाहीर केले होते.

कोविड काळात आलेले निर्बंध व अन्य अडचणींमुळे त्यात विलंब आल्याने  लॉकडाउनमध्ये नागरिकांना दळणवळण सुविधा नसल्याने घरबसल्या अर्ज करून पडताळणी करून घेण्यासाठी विभागाने अंतरिम ऑनलाइन कार्यप्रणाली विकसित करून त्याद्वारे प्रमाणपत्र देण्यास सुरुवात केली आहे. याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

तब्बल ३५ हजार प्रकरणे प्रलंबितः सद्यस्थीतीत राज्यातील सर्व जिल्ह्यातील समित्यांकडे मिळून जवळपास ३५ हजारहून अधिक प्रकरणे या समित्यांकडे प्रलंबित असल्याचे समोर आले आहे. एक महिन्याच्या आत समित्यांनी त्यांच्याकडील सर्व प्राप्त प्रकरणे निकाली काढावीत असे निर्देश मुंडे यांनी दिले आहेत. त्यामुळे जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी प्रतीक्षेत असणाऱ्या अनेक सामान्य नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा