शिवरायांशी मोदींची तुलना: भाजपशी संबंध नाही तर पुस्तक मागे घेतल्याची घोषणा तुम्ही कशी करता?, जावडेकरांना शिवप्रेमींचा खडा सवाल

0
119
छायाचित्रः जयभगवान गोयल यांच्या फेसबुक वॉलवरून साभार.

मुंबई: छत्रपती शिवरायांशी नरेंद्र मोदींची तुलना करणारे ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ हे पुस्तक आणि त्या पुस्तकाचे लेखक जयभगवान गोयल यांच्याशी भाजपचा संबंध नाही म्हणत लेखकाने माफी मागितली आणि हे पुस्तक मागे घेतले आहे, अशी घोषणा भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ट्विटरवर केली असली तरी त्यामुळे महाराष्ट्रातील शिवप्रेमींचे समाधान झाले नाही. लेखकाने माफी मागितली तर कधी आणि कुणाची? पुस्तकाशी भाजपचा संबंध नाही तर त्याचे प्रकाशन दिल्लीतील भाजपच्या कार्यालयात कसे झाले? आणि पुस्तक मागे घेतल्याची घोषणा तुम्ही ट्विटरवर कशी करता?  असे अनेक सवाल महाराष्ट्रातील शिवप्रेमींनी जावडेकरांना विचारले असून हा महाराष्ट्राला वेडे बनवण्याचा प्रकार असल्याच्या संतप्त प्रतिक्रियाही उमटल्या आहेत.

संबंध देशाच्या ज्वाज्वल्य स्वाभिमानाचे प्रतिक असलेल्या छत्रपती शिवरायांशी मोदींची तुलना करणारे पुस्तक ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ हे पुस्तक युनायटेड हिंदू फ्रंटचे कार्यकारी अध्यक्ष आणि भाजपचे ज्येष्ठ नेते असलेल्या जयभगवान गोयल यांनी लिहिले आणि दिल्लीतील भाजपच्या कार्यालयात सार्वजनिक कार्यक्रमात त्याचे प्रकाशन झाल्यानंतर महाराष्ट्रभर संतापाची लाट उसळली आहे. संबंध महाराष्ट्र संताप व्यक्त करत असताना महाराष्ट्रातील भाजपचे नेते मात्र या पुस्तकाचे समर्थन करताना दिसून आले. गोडसे- सावकरांबद्दल अपशब्द वापरले गेले तेव्हा शिवसेना नेते संजय राऊत गप्प का होते? असा सवाल करत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या तुलनेबद्दल खेदाचा चकार शब्दही काढला नाही. भाजपचे दुसरे एक नेते सुधीर मुनगंटीवार यांनीही शरद पवारांना जाणता राजा म्हटलेले चालते का? असा सवाल करत निषेधाचा शब्दही उच्चारला नाही. ‘मेरा नाम राहुल सावरकर नही’ असे वक्तव्य राहुल  गांधी यांनी केल्यानंतर नागपूरचे हिवाळी अधिवेशन डोक्यावर घेत गोंधळ घालणारे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर याबद्दल अद्याप चकार शब्दही काढलेला नाही.शेवटी भाजप नेते प्रकाश जावडेकर यांनी सोमवारी रात्री 11 वाजून 22 मिनिटांनी ट्विट करून या पुस्तकाचा भाजपशी संबंध नाही असे सांगतानाच लेखकाने क्षमा मागितल्याचे आणि पुस्तक मागे घेतल्याचेही जाहीर केले. मात्र त्यामुळे शिवप्रेमींचे समाधान झालेले नाही.

लेखकाने कुणाची आणि कधी माफी मागितली? पुस्तकाचे प्रकाशन ट्विटरवर झाले होते का? पुस्तकाचे प्रकाशन भाजप कार्यालयात झाले, भाजप कार्यालय पाकिस्तानात आहे का?, असे अनेक सवाल शिवप्रेमींनी जावडेकरांना विचारले असून जावडेकरांनी एकाही प्रश्नाचे उत्तर दिलेले नाही. त्यामुळे महाराष्ट्राचा संताप अद्यापही कायम आहे. विशेष म्हणजे हे पुस्तक बाजारात आले असून बाजारातून त्याच्या प्रती मागे घेण्यात आल्या की नाही, हे स्पष्ट होऊ शकलेले नाही.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा