अखेर लस आली,गणपती बाप्पाच्या गजरात सीरममधून बाहेर पडली कोविशिल्ड लस

0
135
छायाचित्रः ट्विटरवरून साभार

पुणेः केंद्र सरकारकडून ऑर्डर मिळाल्यानंतर पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामधून कोविशिल्ड लसीच्या वितरणास सुरुवात झाली आहे. कोविशिल्ड लसीचे सहा कोल्ड स्टोअरेज कंटेनर आज पहाटे सीरममधून बाहेर पडले. कडेकोट पोलिस बंदोबस्तात हे कंटेनर पुणे विमानतळावरून रवाना करण्यात आले.

सीरम इन्स्टिट्यूटमधून कोविशिल्ड लसीचे कंटेनर रवाना करण्यापूर्वी परिमंडळ पाचच्या पोलिस उपायुक्त नम्रता पाटील यांच्या हस्ते नारळ फोडण्यात आला. यावेळी उपस्थित कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी गणपती बाप्पा मोरयाच्या घोषणा देत पेढे वाटून आनंद साजरा केला.

पुणे विमानतळावरून लसीचे हे कंटेनर देशातील १३ ठिकाणी पाठवण्यात येणार आहेत. त्यात अहमदाबाद, दिल्ली, चेन्नई, बंगळूर, कर्नाल, कोलकाता, विजयवाडा, हैदराबाद, गुवाहटी, लखनऊ, चंदीगड, भुवनेश्वर या शहरांचा समावेश आहे. पुणे विमानतळावरून सकाळी ८ वाजता पहिले विमान लस घेऊन दिल्लीच्या दिशेने रवाना झाले. पुणे विमानतळाने याबाबतचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत.

केंद्र सरकारने कालच सीरम इन्स्टिट्यूटला १ कोटी १० लाख लसीच्या डोजची पहिली ऑर्डर दिली होती. ऑक्सफर्ड- अस्राझेनेकाने संयुक्तपणे ही लस विकसित केली आहे. या लसीची निर्मिती सीरमने केली असून सरकारला ही लस २१० रुपयांत मिळाली आहे. १६ जानेवारीपासून देशभरात लसीकरण सुरु होणार आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा