अजित पवार म्हणालेः राजकारणात येण्याच्या भानगडीत पडू नका, मी इथे आलो आणि अडकलो!

0
456
संग्रहित छायाचित्र.

पुणेः  विद्यार्थ्यांनी राजकारणात येण्याच्या भानगडीत पडू नये. या क्षेत्रात काही खरे नाही. मी राजकारणात आलो आणि अडकलो. इथून बाहेर पडताही येत नाही आणि कुठे जाताही येत नाही. तुम्ही तसे या क्षेत्रात येऊन अडकू नका. इतर क्षेत्रात जाण्याचा प्रयत्न करा, असा ‘अनुभवी’ सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विद्यार्थ्यांना दिला.

शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन केलेल्या पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा अजित पवार यांच्या हस्ते सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. पुणे जिल्हा परिषदेने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

सर्वच क्षेत्रात चांगली कामगिरी करता येईल, यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्न केले पाहिजे. कला, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्राबरोबरच कृषी आणि स्पर्धा परीक्षांमध्येही करिअर करायला हवे. जे क्षेत्र निवडाल, त्या क्षेत्रात आईवडिलांसह गावाचे नावही उज्ज्वल करा, असा सल्लाही अजित पवार यांनी दिला. यूपीएससीमध्ये बिहार, उत्तर प्रदेशचे विद्यार्थी जास्त आहेत. तिकडचे जास्त विद्यार्थी आयएएस होतात. सुरूवातीला आमच्याही काही चुका झाल्या. विद्यार्थ्यांच्या मनावर यूपीएससी बिंबवण्यात आम्ही कमी पडलो. आता मात्र यूपीएससीमध्ये महाराष्ट्रातील विद्यार्थी कमी पडता कामा नये, असेही पवार म्हणाले.

कार्यकर्त्यांनो, पोट कमी कराः  अजित पवार यांनी यावेळी कार्यकर्त्यांनाही पोट कमी करण्याचा सल्ला दिला. कार्यकर्त्यांनो, ढेरी कमी करा, नाही तर लोकांना सांगताना माझी पंचाईत व्हायची. मी दररोज पहाटे पाच वाजता उठतो आणि एक तास व्यायाम करतो, असेही पवार म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा