वंचित बहुजन आघाडीचे दरवाजे एमआयएमसाठी अजूनही खुलेच : प्रकाश आंबेडकर

0
246

मुंबईः जागावाटपाच्या मुद्यावरून ताटातूट झालेल्या वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएममध्ये पुन्हा आघाडी होऊन दोघेही विधानसभा निवडणुकीला एकत्रितपणे सामोरे जाण्याची शक्यता बळावत चालली आहे. वंचित बहुजन आघाडीशी पुन्हा चर्चा करण्याची तयारी एमआयएमने दाखवल्यानंतर एमआयएमसाठी वंचित बहुजन आघाडीचे दरवाजे अजूनही खुले आहेत, असे मोठे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने फक्त 8 जागा देऊ केल्या होत्या, असे सांगत एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष व औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी वंचित बहुजन आघाडीशी युती तोडून स्वबळावर निवडणूक लढवण्याची एकतर्फी घोषणा केली होती. त्यानंतर त्यांनीच वंचित बहुजन आघाडीशी आम्ही पुन्हा युती करण्यास उत्सुक आहोत. एमआयएमचे प्रमुख असदोद्दिन ओवेसी जागावाटपाबाबत प्रकाश आंबेडकरांशी चर्चा करण्यास तयार आहेत, असे संकेत पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना इम्तियाज जलील यांनी दिले होते. या एकूणच प्रकरणावर प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी खुलासा केला. वंचित बहुजन आघाडीने एमआयएमला 8 जागांचा प्रस्ताव दिलाच नव्हता, असा गौप्यस्फोट त्यांनी केला. एमआयएमसोबत जागावाटपाबाबत चर्चा सुरु असतानाच त्यांनी अचानक युती होणार नसल्याचे जाहीर केले. वंचित बहुजन आघाडीसोबत न येण्याच्या निर्णय त्यांचा आहे. मात्र आमचे दार त्यांच्यासाठी अजूनही खुले आहे, असे आंबेडकर म्हणाले. प्रकाश आंबेडकर आणि ओवेसी या दोन्ही नेत्यांची वक्तव्य पुन्हा एकत्र येण्याच्या दृष्टीने सकारात्मक असल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम यांच्यात आघाडी होण्याची शक्यता बळावली आहे. लोकसभा निवडणुकीत तब्बल 41 लाखांहून अधिक मते घेऊन आपली राजकीय ताकद दाखवून दिलेल्या वंचित बहुजन आघाडीने राज्यभर विधानसभा निवडणुकांची जोरदार तयारी सुरू केली असतानाच एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी युती तोडल्याची घोषणा केली आणि एमआयएमची पहिली उमेदवार यादीही जाहीर करून टाकली होती. परंतु काही दिवसांनी त्यांनीच ओवेसी यांच्याशी चर्चा करून प्रकाश आंबेडकरांनी जागावाटपाबाबत तोडगा काढावा, आमची पुन्हा नव्याने सुरूवात करण्याची तयारी आहे, असे जलील यांनी म्हटले होते. त्यावर आता वंचित बहुजन आघाडीकडूनही सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला आहे.

काँग्रेस- राष्ट्रवादीला विरोधक मानतच नाही, भाजपच खरा विरोधक

दरम्यान, कोल्हापुरात बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला आम्ही विरोधक मानतच नाही. आमचा खरा विरोधक भाजपच आहे. राज्यातील लोकांना बदल हवा आहे. त्यामुळेच आगामी विधानसभा निवडणुकीत वंचित आघाडी परिवर्तन घडवून आणेल.  वंचित बहुजन आघाडीच्या सत्ता संपादन यात्रेला राज्यात प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. लोक बदलाची अपेक्षा व्यक्त करत आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादीत आता कोणी शिल्लक राहिलेले नाही. म्हणूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वंचित आघाडीकडे विरोधी पक्ष नेते पद असेल, असे सांगत आहेत. परंतु आम्ही विरोधी पक्षाचे नेतेपद नव्हे तर राज्यातील सत्ताच हाती घेणार आहोत. आम्ही कार्यक्रम घेवून जनतेकडे जात आहोत. त्याला जनता चांगला प्रतिसाद मिळत आहे. असा जाहीरनामा घेवून कोणी जनतेकडे जात नाही.  राज्यात आमचे सरकार आल्यानंतर पोलिसांची आठ तासांची ड्युटी, आशा अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ, पर्यावरण समतोल यासह उजाला योजनेची व्याप्ती वाढवणार असून त्यासाठी 100 रुपये सबसिडी दिली जाईल,अशी घोषणाही प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा