जयंती विशेषः महाकारुणिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर!

2
300
संग्रहित छायाचित्र.

शेतकऱ्यांसाठी मंत्रालयावर मोर्चा काढणारे बाबासाहेब, भारतातील तमाम स्त्रियांवर अमानुष निर्बंध लादणारी, त्यांना हीन ठरविणारी मनुस्मृती जाळणारे, त्यांच्या उत्थानासाठी हिंदू कोड बिल मांडणारे व ते मान्य होत नाही म्हणून मंत्रिपदावर लाथ मारणारे बाबासाहेब, ओबीसींसाठी लढणारे बाबसाहेब, भटके-विमुक्त-आदिवासी यांच्यासाठी जीवाचे रान करणारे बाबासाहेब. शेतमजूर, कामगार, कष्टकरी यांच्या जीवनात बदल घडविणारे कायदे करणारे बाबासाहेब. हे सगळी बाबासाहेबांच्या कार्य कर्तृत्वाचे पैलू ठाऊक असूनही दर जयंतीला लोकांना हा प्रश्न पडतोच की बाबासाहेब कुणाचे? हे नक्की दुर्दैव कुणाचे?

डॉ. राजेंद्र गोणारकर (लेखक आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार आणि नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या माध्यमशास्त्र संकुलात सहयोगी प्राध्यापक आहेत.)

हिमालयाएवढी प्रतिकुलता सदैव वाट्याला येऊनही ज्यांनी आभाळ वाकवण्याचा अजोड पराक्रम केला, त्या महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची १२९ वी जयंती कोरोना या विषाणूने सबंध जग संकटात असताना यावी, हा योग म्हटला पाहिजे. कितीही संकटे आली तरी निष्ठापूर्वक ध्येयपथावर वाटचाल केल्यास इप्सित स्थळी पोहोचतात येते, याचा वस्तूपाठ ज्यांनी आपल्या जीवनकार्यातून घालून दिला त्या महामानवाला अभिवादन करणे हीच एका अर्थाने प्रेरक गोष्ट आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे उदासी, हतबलता झटकून आपल्या अंगभूत सामर्थ्यासह लढण्यास उद्युक्त करणाऱ्या उत्तुंग अशा हिमतीचे नाव आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जीवन हे ओतप्रोत आंदोलन आणि अविरत संघर्ष हेच होते. इथल्या सनातन शोषण व्यवस्थेशी त्यांचा संघर्ष होता. या शोषणाला अधिमान्यता देणारी धर्मशास्त्रे, प्रथा-परंपरांशी त्यांचा संघर्ष होता. महात्मा गांधी म्हणजे भारत आणि भारत म्हणजे गांधी असे व्यक्तिमहात्म्य ज्या तत्कालीन माध्यमांनी निर्माण केले, त्या माध्यमांशी त्यांचा संघर्ष होता. खुद्द महात्मा गांधींशी त्यांचा संघर्ष होता. ब्रिटिशांशी त्यांचा संघर्ष होता. काँग्रेस पक्षाशी त्यांचा संघर्ष होता. कम्युनिस्टांशी त्यांचे भांडण होते. या संघर्षाला ठोस भूमिका होती. त्यांना जे जग निर्माण करावयाचे होते, त्याच्या आत्यंतिक गरजेतून त्यांनी हा संघर्ष केला. काय हवे होते त्यांना? त्यांचा अविरत संघर्ष होता कुणासाठी? याचे उत्तर शोधले तर काय हाती येते?

तत्कालीन भारतीय समाज हा जातीय उच्च-नीचता, गरीब-श्रीमंत भेदभाव व स्त्रीदास्य यामुळे गतानुगतिक झाला होता. त्याच्या प्रगतीचे सारे मार्ग गोठून गेले होते. कुणाला शुद्र, कुणाला अस्पृश्य, कुणाला पायातली वहाण ठरवून बहुसंख्याक लोकांची अडवणूक करण्यात आली होती. बहुसंख्यांक लोक या व्यवस्थेने नाडल्या गेले होते. ज्यांना हीन ठरवण्यात आले, मानवी अधिकार नाकारले गेले, त्यांचे तर जगणे नासवून ठेवले होते. पण जे अनिर्बंध विशेषाधिकार उपभोगत होते, त्यांचीही मने व्यवस्थेने कुरूप केली होती. हे सनातन संस्कृतीचे मूठभर कंत्राटदार बहुसंख्यांना माणूसपणाचे अधिकार देण्याच्या मानसिकतेत नव्हते. त्यांची तरी माणूसपणाची पातळी कुठे शिल्लक होती. इतरांना हीन लेखता लेखता माणूस म्हणून ते पार अध:पतीत झाले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संघर्ष या बहुसंख्यांक शूद्र, अतिशुद्र व तमाम स्त्रियांना त्यांचे माणूसपणाचे हक्क मिळवून देण्यासाठी होता. हे जसे खरे आहे, तसे ज्यांनी शोषणाला धर्म आणि अन्यायाला गौरवशाली परंपरा म्हणून आपले मनुष्यत्व रसातळाला नेले त्यांना देखील माणूस म्हणून उन्नत करण्यासाठी डॉ. आंबेडकरांचा संघर्ष होता. कुणाला पराभूत करण्यासाठी हा संघर्ष नव्हता तर माणुसकीचा विजय व्हावा, यासाठी अखंड पुकारलेले युद्ध होते.

……………………………………..
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संघर्ष या बहुसंख्यांक शूद्र, अतिशुद्र व तमाम स्त्रियांना त्यांचे माणूसपणाचे हक्क मिळवून देण्यासाठी होता. हे जसे खरे आहे, तसे ज्यांनी शोषणाला धर्म आणि अन्यायाला गौरवशाली परंपरा म्हणून आपले मनुष्यत्व रसातळाला नेले त्यांना देखील माणूस म्हणून उन्नत करण्यासाठी डॉ. आंबेडकरांचा संघर्ष होता. कुणाला पराभूत करण्यासाठी हा संघर्ष नव्हता तर माणुसकीचा विजय व्हावा, यासाठी अखंड पुकारलेले युद्ध होते.
……………………………………..

शोषणकर्ते अल्पसंख्यांक आणि शोषित बहुसंख्यांक यांना एकाच पातळीवर आणून समता, स्वातंत्र्य व बंधुभावावर आधारित शोषणमुक्त समताधिष्ठित समाज निर्माण करणे,प्रबुद्ध भारत निर्माण करणे हे त्यांचे स्वप्न होते. हे विराट स्वप्न त्यांना का पडत होते? डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनीच ‘रानडे, गांधी आणि जिना’ या १९ जानेवारी १९४३ रोजी पुण्यात दिलेल्या भाषणात कार्लाइल व इतर विचारवंतांचा संदर्भ देत थोर पुरुष कोणास म्हणावे हे सांगितले होते. थोर पुरुष होण्यासाठी सचोटी आणि बुद्धीमत्ता या गोष्टी तर अनिवार्य आहेतच परंतु ही एवढीच गुणवत्ता महापुरुष होण्यास पुरेशी नसते. त्यासाठी तिसरा ही गुण आवश्यक असतो. तो म्हणजे व्यक्ती समाज हिताच्या दृष्टीने प्रेरित असली पाहिजे. समाज बदलण्याची उर्मी त्याच्या ठायी असली पाहिजे. आपली प्रज्ञा आणि प्रतिभेचा वापर त्याने समाज बदलण्यासाठी केला पाहिजे. थोर पुरुषाचे त्यांनी केलेले वर्णन इतर कुणाही पेक्षा बाबासाहेबांनाच ते चपखलपणे लागू होते. बाबासाहेब थोर पुरुष होते. बाबासाहेबांनी आपली ज्ञानसाधना परिवर्तनासाठी वापरली. प्रसंगी आपले कुटुंब, आपली प्रकृती याकडे दुर्लक्ष करून हा थोर महापुरुष समाज बदलाच्या लढाईत सदैव आघाडीवर राहिला.

पण तरी अजून एक प्रश्न शिल्लक राहतोच की आपली प्रज्ञा, प्रतिभा समाज बदलासाठी वापरावी असा विचार आला तरी कुठून? कोणी शिकवली त्यांना ही बांधिलकी? याचे उत्तरही त्यांनीच दिले आहे. ०३ ऑक्टोबर १९५६ रोजी दिल्ली नभोवाणीवरून दिलेल्या भाषणात त्यांनी सांगितले की, मी काही संन्यासी नाही की बैरागी नाही. पण मला गुरु आहेत. माझे पहिले आणि श्रेष्ठ गुरु बुद्ध होत. माझे दुसरे गुरु कबीर आणि तिसरे गुरु म्हणजे ज्योतिबा फुले होत. प्राचीन काळातील तथागत बुद्ध, मध्ययुगीन काळातील संत कबीर आणि आधुनिक काळातील काळातील क्रांतिबा ज्योतिबा फुले. या तीन क्रांतिकारकांना आपले गुरू मानून बाबासाहेबांनी भारताचा सबंध भूतकाळ कवटाळला होता. वर्तमानकाळात आपले पाय घट्ट रोवून त्यांनी भविष्यावर नजर रोखली होती. या नजरेत होती बुद्धाची करुणा, कबीराची बंडखोरी ,क्रांतिबा फुले यांची संघर्षशीलता आणि नव्या भारताचे संकल्पचित्र!

मानवी कल्याणाचा हा वसा उरात घेऊन बाबासाहेबांनी आपल्या जीवित कार्याला प्रारंभ केला. अस्पृश्यांच्या प्रतिनिधीत्वाचा प्रश्न, पाण्यावरील न्याय्य हक्काचा प्रश्न, खोतीचा प्रश्न असे असंख्य प्रश्न हातात घेणारे बाबासाहेब, शेतकऱ्यांसाठी मंत्रालयावर मोर्चा काढणारे बाबासाहेब, भारतातील तमाम स्त्रियांवर अमानुष निर्बंध लादणारी, त्यांना हीन ठरविणारी मनुस्मृती जाळणारे, त्यांच्या उत्थानासाठी हिंदू कोड बिल मांडणारे व ते मान्य होत नाही म्हणून मंत्रिपदावर लाथ मारणारे बाबासाहेब,  ओबीसींसाठी लढणारे बाबसाहेब, भटके-विमुक्त-आदिवासी यांच्यासाठी जीवाचे रान करणारे बाबासाहेब. शेतमजूर, कामगार, कष्टकरी यांच्या जीवनात बदल घडविणारे कायदे करणारे बाबासाहेब. हे सगळी बाबासाहेबांच्या कार्य कर्तृत्वाचे पैलू ठाऊक असूनही दर जयंतीला लोकांना हा प्रश्न पडतोच की बाबासाहेब कुणाचे? हे नक्की दुर्दैव कुणाचे?

……………………………………..
प्राचीन काळातील तथागत बुद्ध, मध्ययुगीन काळातील संत कबीर आणि आधुनिक काळातील काळातील क्रांतिबा ज्योतिबा फुले. या तीन क्रांतिकारकांना आपले गुरू मानून बाबासाहेबांनी भारताचा सबंध भूतकाळ कवटाळला होता. वर्तमानकाळात आपले पाय घट्ट रोवून त्यांनी भविष्यावर नजर रोखली होती. या नजरेत होती बुद्धाची करुणा, कबीराची बंडखोरी ,क्रांतिबा फुले यांची संघर्षशीलता आणि नव्या भारताचे संकल्पचित्र!
……………………………………..

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मात्र बुद्धाची करुणा हृदयात घेऊन अखंड वाटचाल करीत होते. यू. आर. राव यांनी एके ठिकाणी नोंदवले आहे की, १९४५ मध्ये अमेरिकेने हिरोशिमा-नागासाकीवर अणुबॉम्ब हल्ला केला तेव्हा बाबसाहेब खिन्न मनाने म्हणाले होते, ‘ख्रिश्चनांनी केलेल्या या अमानवी कृत्याची जबाबदारी त्यांना नक्की घ्यावी लागेल. त्यांनी वस्तुत: युद्धाला आरंभ करणाऱ्या हिटलरच्या जर्मनीवर अणुबॉम्ब न टाकता आशियातील आणि तेही बौद्ध धर्माचे पालन करणाऱ्या देशातील दोन शहरांवर टाकला. दोस्त राष्ट्रांनी आपले हे संहारक शस्त्र ख्रिश्चन नसलेल्या आपल्या शत्रूसाठी राखून ठेवले आहे काय?’ बुद्धाप्रतीची डॉ. बाबासाहेब आंबेकरांची ओढच या प्रतिक्रियेतून दिसून येते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनाकडे पाहिल्यावर असे वाटत राहते की, अस्पृश्य म्हणून बालपणी छळ, शाळेत-महाविद्यालयात अस्पृश्य म्हणून अवमान,  बडोद्याला लॉजवर व कार्यालयात तुच्छतेची वागणूक, देशासाठी जीवाचे रान करून ही माध्यमांनी देशद्रोही म्हणून केलेली निर्भत्सना, काँग्रेसने वेळोवेळी केलेली अडवणूक, अमेरिकेतील थॉमस जेफरसनने अमेरिकेच्या राजघटनेत योगदान दिले तर अमेरिकेने कृतज्ञता म्हणून जेफरसनला अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष केले आणि जगातील अव्वल दर्जाचे संविधान निर्माण करणाऱ्या राज्यघटनेच्या शिल्पकाराप्रती कृतज्ञता काय तर संविधान लागू झाल्यानंतरच्या पहिल्याच सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसने ठरवून त्यांचा पराभव केला. कम्युनिस्टानी दगाबाजी केली. हिंदू कोड बिलाच्या वेळी एका अस्पृश्याला आमच्या धर्मात हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही, असा शंकराचार्यांनी जहरी फुत्कार काढला. बघा काय परतफेड आहे देशप्रेमाची? एका माणसाने अखेर सहन तरी किती करावे?  इतके होवूनही कुणाबद्दल वैर नाही, शत्रुत्व नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ठायी कधीच बदल्याची भावना नव्हती. होती ती हे सारं बदलून टाकण्याची तीव्रोत्कट असोशी. कारण त्यांचे काळीज करुणेने ओथंबलेले होते. या अर्थाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे महाकारूणिकच होते!

2 प्रतिक्रिया

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा