‘थँक्यू डॉ. आंबेडकर’: औरंगाबादेत डिजिटल फलक झळकवून महामानवाला अनोखे अभिवादन!

0
88

औरंगाबादः भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती देशभरात उत्साहात साजरी केली जात असतानाच औरंगाबादेतील तरूणांनी अनोख्या पद्धतीने महामानवास अभिवादन केले आहे. ‘थँक्यू मिस्टर आंबेडकर’ असा डिजिटल डिस्प्ले लावण्यात आला आहे. हा डिजिटल डिस्प्ले औरंगाबादकरांचे लक्ष वेधून घेणारा ठरला आहे.

 औरंगाबादेतील अमोल साळवे आणि ज्ञानेश्वर भालेराव या दोन तरूणांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून अनोख्या पद्धतीने बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी हा डिस्प्ले लावला आहे. आम्हाला बाबासाहेबांमुळेच सन्मानाने जण्याचा अधिकार मिळाला आहे. म्हणूनच थँक्यू डॉ. आंबेडकर या संकल्पनेतून आम्ही हा डिजिटल डिस्प्ले लावून अभिवादन केल्याचे हे तरूण सांगतात.

या तरूणांनी प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत ढोल, ताशे, डीजे न लावता साध्या पद्धतीने बाबासाहेबांची जयंती साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे.

जगभर कोरोनाने थैमान घातले असून सण, उत्सवाच्या उत्साहाची जागा भीतीने घेतली आहे. यातच सलग दोन वर्ष भीमजयंती साजरी न करता आल्याने आंबेडकरी युवकांत निराशा आलेली होती. परंतु ही निराशा दूर सारत लोकोपयोगी उपक्रम राबवून भीमजयंती साजरी करण्यात येत आहे.

 भीमजयंतीच्या निमित्ताने आंबेडकरी अनुयायांना अमोल आणि ज्ञानेश्वर या तरुणांनी एक वेगळी भेट देऊ केली आहे. यापूर्वी औरंगाबाद महानगरपालिकेने शहराच्या सौंदर्यात भर घालण्याकरिता ‘लव्ह औरंगाबाद’ चे डिस्प्ले उभारले आहेत. त्याच अनुषंगाने या तरुणांनी  ‘थँक्यू डॉ. आंबेडकर’ हा डिस्प्ले तयार केले आहे. या संकल्पनेसाठी विजयराव साळवे, सचिन निकम, गुणरत्न सोनवणे, विशाल बोर्डे, अनमोल लिहिणार, अमोल कतले, विशाल बनकर यांनी सहकार्य केले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा