डॉ. जयश्री सूर्यवंशींच्या ‘गुणवत्ते’वर ‘परफॉर्मन्स नॉट सॅटिसफॅक्टरी’चा निवड समितीचाच शेरा, पण…

0
850
संग्रहित छायाचित्र.
  • सुरेश पाटील/औरंगाबादः

आपले शिक्षण आणि नोकरी दोन्हीही खुल्या प्रवर्गातून आणि गुणवत्तेच्या आधारे झालेले आहे, असा दावा शंभर रुपयांच्या मुद्रांकावर करणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलसचिव डॉ. जयश्री सूर्यवंशी यांचा हा दावाच सपशेल खोटा असल्याचे पुरावे न्यूजटाऊनकडे उपलब्ध आहेत. वाणिज्य विषयातील सहायक प्राध्यापकपदासाठी पदव्युत्तर पदवीला किमान बी प्लसची शैक्षणिक ‘गुणवत्ता’ही धारण करत नसलेल्या डॉ. जयश्री सूर्यवंशी यांच्या मुलाखतीत म्हणजेच ‘बौद्धिक गुणवत्ते’च्या चाचणीतही निवड समितीने ‘परफॉर्मन्स नॉट सॅटिसफॅक्टरी’ असा शेरा मारत सौ. इं. भा. पाठक महिला महाविद्यालयातील वाणिज्य विषयातील सहायक प्राध्यापकाच्या पूर्णवेळ पदासाठी निवड नाकारली होती. परंतु पद आरक्षित असल्यामुळे त्यांच्या ‘पात्रतेतील उणीव’ क्षमापित करून एक वर्षासाठी तात्पुरत्या स्वरुपात निवडीची शिफारस केली होती.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या विद्यमान कुलसचिव डॉ. जयश्री सूर्यवंशी यांची सौ. इं.भा. पाठक महिला महाविद्यालयातील सहायक प्राध्यापकपदावरील मूळ नियुक्ती आणि त्या नियुक्तीच्या अनुभवाच्या आधारे विद्यापीठात मिळवलेली वेतननिश्चिती, पदेही वादाच्या भोवऱ्यात अडकली आहेत. डॉ. जयश्री सूर्यवंशी या आरक्षित प्रवर्गाच्या नसतानाही त्यांनी राजपूत भामटा जातीचे प्रमाणपत्र मिळवून त्या प्रमाणपत्राच्या आधारे महिला महाविद्यालयात सहायक प्राध्यापकाची (तत्कालीन अधिव्याख्याता नामाभिधान) नोकरी तर मिळवलीच शिवाय आरक्षण आणि विहित शैक्षणिक अर्हतेचे निकष डावलून त्यांची या महाविद्यालयात नियुक्ती करण्यात आल्याच्या आक्षेपावर राज्य सरकारने नियुक्त केलेल्या त्रिसदस्यीय चौकशी समितीने शिक्कामोर्तब केले आहे.

राज्य सरकारच्या त्रिसदस्यीय चौकशी समितीचा अहवाल आणि न्यूजटाऊनकडे उपलब्ध असलेली कागदपत्रे यावरून डॉ. जयश्री सूर्यवंशी यांनी जन्माने मराठा असतानाही राजपूत भामटा जातीचे प्रमाणपत्र मिळवून त्या प्रमाणपत्राच्या आधारे नोकरी मिळवली. सहायक प्राध्यापकपदासाठी अनिवार्य असलेली किमान शैक्षणिक अर्हताही त्यांनी धारण करत नसतानाही त्या वाणिज्य विषयातील सहायक प्राध्यापकपदी नोकरी केल्याचे स्पष्ट होत आहे. मात्र डॉ. जयश्री सूर्यवंशी यांनी औरंगाबादच्या जिल्हा जातपडताळणी समितीकडे शंभर रुपयांच्या मुद्रांकावर नोटरीद्वारे साक्षांकित करून दाखल केलेल्या शपथपत्रात आपण राजपूत भामटा जातीच्या प्रमाणपत्राचा लाभ घेतला नाही. आपल्याकडे असलेले राजपूत भामटा जातीचे प्रमाणपत्र केवळ शोभेची वस्तू असल्यासारखे पडून आहे. आपले शिक्षण आणि नोकरी दोन्ही गुणवत्तेच्याच आधारे झालेले आहे, असा दावा केला आहे. डॉ. सूर्यवंशी यांच्याकडे नियुक्तीच्या वेळी सहायक प्राध्यापकपदासाठी आवश्यक असलेली किमान शैक्षणिक अर्हता नसल्याचा पर्दाफाश न्यूजटाऊनने आधीच केला आहे.

आवश्य वाचाः डॉ. जयश्री सूर्यवंशी यांच्या ‘गुणवत्तेच्या आधारे’ निवड झाल्याच्या दाव्यातही खोटच, ही वाचा वस्तुस्थिती…

गुणवत्तेच्या दाव्याची आणखी एक पोलखोलः आता डॉ. जयश्री सूर्यवंशी यांच्या गुणवत्तेच्या आधारे नोकरीत निवड झाल्याच्या दाव्याचीही आज न्यूजटाऊन पोलखोल करत आहे. सौ. इंदिराबाई पाठक महिला महाविद्यालयातील वाणिज्य विषयाच्या सहायक प्राध्यापकपदाच्या रिक्त जागेसाठी अर्ज मागवण्यात आले होते. जाहिरातीला अनुसरून अर्ज केलेल्या उमेदवारांपैकी १५ उमेदवार मुलाखतीसाठी हजर होते. त्यात डॉ. जयश्री सूर्यवंशी यांचाही समावेश होता. ३० जुलै १९९४ रोजी निवड समितीने मुलाखती घेतल्या.  या १५ उमेदवारांपैकी निवड समितीला वाणिज्य विषयातील सहायक प्राध्यापकपदी निवडीसाठी केवळ आणि केवळ एकच उमेदवार योग्य आणि पात्र वाटला. त्या उमेदवाराचे नाव होते सुनिता ए. वाजपेयी. त्यामुळे त्यांचीच निवड पूर्णवेळ रिक्त जागेवर दोन वर्षांच्या परीवीक्षाधीन कालावधीसाठी निवडीसाठी या समितीने शिफारस केली होती.

आपली नोकरी गुणवत्तेच्याच आधारावर आहे, असा दावा करणाऱ्या डॉ. जयश्री सूर्यवंशी यांच्यासह अन्य एका उमेदवाराबाबत निवड समितीने मारलेला शेरा त्यांच्या गुणवत्तेच्या दाव्याची पोलखोल करणारा आहे. ‘अन्य उमेदवारांचा परफॉर्मन्स फारसा समाधानकारक नाही. परंतु गरज लक्षात घेता आणि दोन पदे आरक्षित असल्यामुळे खालील दोन उमेदवारांची त्यांच्या पात्रतेतील कमतरता क्षमापित करून प्राध्यान्यक्रमानुसार एक वर्षासाठी तात्पुरत्या स्वरुपात नियुक्तीसाठी शिफारस करण्यात येत आहे’, असा शेरा मारून निवड समितीने जयश्री आर. सूर्यवंशी यांच्या नावाची शिफारस केली आहे.

हेही वाचाः ‘बामु’च्या कुलसचिव डॉ. सूर्यंवशी म्हणतात: त्यांचे जातप्रमाणपत्र ‘शोभेची वस्तू’, पण हा वाचा पर्दाफाश

डॉ. जयश्री सूर्यवंशी या आपण आरक्षणाचा फायदा घेतला नाही आणि नोकरी केली ती गुणवत्तेच्याच आधारे असा दावा करत असल्या तरी १९९४ मध्ये निवड समितीने त्यांच्या बाबतीत मारलेला हा शेराच त्यांच्या दाव्याची पोलखोल करणारा आहे.

या निवड समितीत कुलगुरूंचे प्रतिनिधी, राज्य सरकारचे प्रतिनिधी आणि विद्यापीठाच्या विषयतज्ज्ञांचाही समावेश होता.  डॉ. जयश्री सूर्यवंशी यांनी या पदासाठी ज्यावेळी अर्ज केला तेव्हा त्यांच्याकडे वाणिज्य विषयातील सहायक प्राध्यापकपदासाठी अनिवार्य असलेली एम. कॉम. या पदव्युत्तर पदवीला ‘बी प्लस’ ही किमान ‘शैक्षणिक गुणवत्ता’ही नव्हतीच. शिवाय जेव्हा त्या मुलाखतीला प्रत्यक्ष हजर झाल्या त्यावेळी त्यांच्याकडे असलेल्या ‘बौद्धिक गुणवत्ते’वरही निवड समितीच्या या शेऱ्याने शिक्कामोर्तब केले आहे. केवळ जागा आरक्षित आहे म्हणून त्यांच्या ‘उणिवा’ माफ करून एक वर्षे कालावधीसाठी तात्पुरत्या स्वरुपात नियुक्तीसाठी त्यांची शिफारस करण्यात आली होती. त्यामुळे आपण राजपूत भामटा जातीच्या प्रमाणपत्राचा कधीही वापर केला नाही. ते केवळ शोभेची वस्तू असल्यासारखे पडून आहे आणि आपले शिक्षण आणि नोकरी दोन्ही गुणवत्तेच्याच आधारे आहेत, हे डॉ. जयश्री सूर्यवंशी यांचे दोन्हीही दावे फोल ठरले आहेत.

न्यूजटाऊन एक्सक्लुझिव्हः  डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्राध्यापक भरती घोटाळ्यातील एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट वाचा एका क्लिकवर, वाचण्यासाठी येथे क्लिक करा

विद्यापीठाने नाकारली होती मान्यताः वाणिज्य विषयातील सहायक प्राध्यापकाचे पद आरक्षित असल्यामुळे डॉ. जयश्री सूर्यवंशी यांच्या पात्रतेतील उणीवा क्षमापित करून निवड समितीने एक वर्षासाठी नियुक्तीची शिफारस केल्यानंतर त्यांना नियुक्ती देण्यात आली आणि त्यांच्यासह चार सहायक प्राध्यापकांच्या मान्यतेचा प्रस्ताव सौ. इं.भा. पाठक महिला महाविद्यालयाच्या वतीने २४ सप्टेंबर १९९४ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडे पाठवण्यात आला. प्रस्तावातील चारपैकी तीन प्राध्यापकांच्या नियुक्तीला ८ नोव्हेंबर १९९४ च्या पत्रान्वये विद्यापीठाने मान्यता दिली. परंतु डॉ. जयश्री सूर्यवंशी यांची मान्यता फेटाळली होती. जून १९९४ च्या शासन आदेशानुसार डॉ. जयश्री सूर्यवंशी या पात्रच नसल्यामुळे त्यांच्या निवड/ नियुक्तीला मान्यता देता येणार नसल्याचे या पत्रात विद्यापीठाच्या कुलसचिवांनी स्पष्टपणे नमूद केले आहे.

निवड समितीने तात्पुरत्या स्वरुपातील नियुक्तीसाठी डॉ. जयश्री सूर्यवंशी यांच्या नावाची शिफारस केली खरी, पण त्या पात्रच नसल्यामुळे विद्यापीठाने त्यांच्या नियुक्तीला मान्यता नाकारली होती, त्याचा हा पुरावा.

 ‘गुणवत्ते’चे हेच निकष विद्यापीठातही लावले का?: डॉ. जयश्री सूर्यवंशी या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात १७ मार्च २०२० पासून कुलसचिवपदावर कार्यरत आहेत. विद्यापीठात कुलसचिव हे पद जबाबदारी आणि सन्मानाचे आहे, असे त्यांनीच आपल्या शपथपत्रात म्हटले आहे. त्यांच्या लेखी गुणवत्तेचे जर हेच निकष असतील तर विद्यापीठ प्रशासनातही त्यांनी याच निकषाची अंमलबजावणी तर केलेली नाही ना? अशी शंकाही आता घेण्यात येऊ लागली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा