सुरेश पाटील/औरंगाबादः
‘एक झूठ छिपाने के लिए सौ झूठ बोलने पडते है…’असा एक प्रसिद्ध हिंदी वाक्चप्रचार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलसचिव डॉ. जयश्री सूर्यवंशी यांची अशीच काहीशी अवस्था झालेली दिसते. ‘माझे शिक्षण व नोकरी दोन्हीही खुल्या प्रवर्गातून व गुणवत्तेआधारे झालेले आहे,’ असा दावा डॉ. जयश्री सूर्यवंशी यांनी औरंगाबाद जिल्हा जातपडताळणी समितीकडे सादर केलेल्या शपथपत्रात केला आहे. मात्र त्यांचा हा दावाही ‘मी १५/११/१९९० रोजीच्या राजपूत भामटा जातप्रमाणपत्राचा कधीही वापर केलेला नाही, आजपर्यंत सदर जातप्रमाणपत्र शोभेची वस्तू असल्याप्रमाणे पडून आहे,’ या दाव्याप्रमाणेच बोगस आणि खोटा असल्याचे न्यूजटाऊनच्या हाती आलेल्या कागदपत्रांवरून स्पष्ट होत आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलसचिव डॉ. जयश्री सूर्यवंशी (जयश्री मारूतीराव शिंदे हे मूळ माहेरचे नाव) यांच्या मूळ नियुक्तीवर आक्षेप घेण्यात आले आहेत. डॉ. सूर्यवंशी या जातीने ‘मराठा’ असताना त्यांनी ‘राजपूत भामटा’ जातीचे बोगस जातप्रमाणपत्र मिळवून आरक्षणाचे बेकायदेशीर लाभ उपटल्याचा त्यांच्यावर मूळ आक्षेप आहे. राज्य सरकारने स्थापन केलेल्या त्रिसदस्यी चौकशी समितीने डॉ. सूर्यवंशी यांची सौ. इंदिराबाई पाठक महिला महाविद्यालयात वाणिज्य विषयाच्या सहायक प्राध्यापक म्हणून झालेली मूळ नियुक्ती विहित आरक्षण डावलून आणि विहित अर्हता पूर्ण होत नसताना केल्याचे आणि त्यानंतर विहित कार्यपद्धतीशिवाय त्या नियुक्तीस सेवासातत्य दिल्याचे आपल्या अहवालात म्हटले आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर डॉ. जयश्री सूर्यवंशी यांनी औरंगाबादच्या जिल्हा जातपडताळणी समितीकडे १ मार्च २०२२ रोजी शंभर रुपयाच्या मुद्रांकावर शपथपत्र दाखल केले आहे. त्या शपथपत्रात त्यांनी १५ नोव्हेंबर १९९० रोजी कन्नड तहसील कार्यालयातून ‘राजपूत भामटा’ जातीचे प्रमाणपत्र काढल्याचा पहिला गुन्हा स्वतःहून कबूल केला आहे. मात्र हा गुन्हा कबूल करताना त्यांनी माझे शिक्षण व नोकरी दोन्ही खुल्या प्रवर्गातून आणि गुणवत्तेआधारे झाले असून आपण राजपूत भामटा जातप्रमाणपत्राचा कधीही वापर केलेला नाही, असा दावा केला आहे. त्यांच्या या दाव्याची न्यूजटाऊनने पडताळणी केली असता डॉ. सूर्यवंशी यांनी सौ. इं.भा. पाठक महिला महाविद्यालयातील मूळ नियुक्त्या या ‘राजपूत भामटा’ जातप्रमाणपत्राच्या आधारेच मिळवल्याचा पर्दाफाश झाला आहे.
‘बामु’च्या कुलसचिव डॉ. सूर्यंवशी म्हणतात: त्यांचे जातप्रमाणपत्र ‘शोभेची वस्तू’, पण हा वाचा पर्दाफाश सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा
‘गुणवत्तेवर निवडी’ची ही वाचा पोलखोलः राजपूत भामटा जातप्रमाणपत्राचा कधीही वापर न केल्याचा डॉ. सूर्यवंशी यांचा दावा जसा खोटा आहे, तसाच माझे शिक्षण आणि नोकरी दोन्ही गुणवत्तेआधारे झाल्याचा त्यांचा दावाही खोटाच असल्याचे न्यूजटाऊनकडे उपलब्ध असलेल्या दस्तऐवजांवरून स्पष्ट होत आहे.
डॉ. जयश्री सूर्यवंशी यांनी वाणिज्य विषयातील सहायक प्राध्यापक (तेव्हाचे अधिव्याख्याता नामाभिधान) म्हणून सौ. इं. भा. पाठक महिला महाविद्यालयात पहिली नियुक्ती १९९३ मध्ये मिळवली. या पदासाठी महाविद्यालायाने १४ जून १९९३ रोजीच्या दैनिक लोकमतमध्ये जाहिरात प्रसिद्ध केली होती. या जाहिरातीत नमूद केलेल्या निकषानुसार वाणिज्य विषयातील सहायक प्राध्यापकपदासाठी एम. कॉम. ला बी प्लस असावे अशी ‘किमान गुणवत्ते’ची अट होती आणि उमेदवार एम.फिल., पीएच.डी. धारण करत असल्यास त्याला प्राधान्य दिले जाणार होते.
न्यूजटाऊन एक्सक्लुझिव्हः डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्राध्यापक भरती घोटाळ्यातील एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट वाचा एका क्लिकवर, वाचण्यासाठी येथे क्लिक करा
डॉ. जयश्री सूर्यवंशी यांनी या पदासाठी २४ जून १९९३ रोजी अर्ज केला तेव्हा त्यांच्याकडे एम.कॉम. ला ‘बी प्लस’ ही ‘किमान गुणवत्ता’ही नव्हती. डॉ. सूर्यवंशी यांनी मार्च/ एप्रिल १९८९ मध्ये एम. कॉम. द्वितीय वर्षाची परीक्षा उत्तीर्ण केली. त्यांना द्वितीय वर्षाला २०२ गुण म्हणजे ५०.५ टक्के गुण मिळाले होते. त्यांच्या प्रथम आणि द्वितीय वर्षांच्या एकूण गुणांची गोळाबेरीज ४१८ एवढी म्हणजेच ५२.२५ टक्के एवढी आहे. म्हणजेच एम. कॉम. ला ‘बी प्लस’ ही किमान गुणवत्ता नसतानाही डॉ. सूर्यवंशी यांची तदर्थ स्वरुपात निवड झाली आणि २ ऑगस्ट १९९३ रोजी त्या या महाविद्यालयात रूजूही झाल्या. त्यामुळे आपली नोकरी गुणवत्तेच्या आधारे असल्याचा डॉ. सूर्यवंशी यांचा दावा नमनालाच म्हणजेच त्यांच्या अध्यापन क्षेत्रातील प्रवेशाच्या पहिल्याच टप्प्यावर खोटा ठरतो.

१९९४-९५ या शैक्षणिक वर्षासाठी सौ. इं.भा. पाठक महिला महाविद्यालयाने पुन्हा इंग्रजी विषयातील दोन, समाजशास्त्र विषयातील एक आणि वाणिज्य विषयातील तीन सहायक प्राध्यापकांची पदे भरण्यासाठी २ जुलै १९९४ च्या दैनिक लोकमतमध्ये जाहिरात प्रसिद्ध केली. याही जाहिरातीत नमूद केल्यानुसार पदव्युत्तर पदवीला (एम.कॉम.) किमान ५५ टक्के म्हणजेच बी प्लसची अट तर होतीच शिवाय उमेदवार यूजीसीने निर्धारित केलेली नेट/सेट उत्तीर्ण झालेला असावा, अशीही ‘मस्ट हॅव’ म्हणजेच अनिवार्य अटही होती. डॉ. जयश्री सूर्यवंशी यांनी याहीवेळी ११ जुलै १९९४ रोजी अर्ज केला. तेव्हाही त्यांच्याकडे नेट/सेट तर सोडाच एम. कॉम. ला बी प्लस ही ‘किमान गुणवत्ता’ ही नव्हती. तरीही डॉ. सूर्यवंशी यांची निवड झाली आणि ४ ऑगस्ट १९९४ रोजी या महाविद्यालयात पुन्हा रूजू झाल्या.
डॉ. जयश्री सूर्यवंशी या ‘किमान गुणवत्ते’चा निकषही पूर्ण करत नसल्याचे म्हणजेच एम.कॉम.ला त्यांना बी प्लससुद्धा नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर सौ. इं.भा. पाठक महिला महाविद्यालयाने डॉ. जयश्री सूर्यवंशी यांना १५ फेब्रुवारी १९९५ रोजी सेवामुक्त केले.
डॉ. जयश्री सूर्यवंशी यांनी याच महाविद्यालयात वाणिज्य विषयातील पूर्णवेळ प्राध्यापकपदासाठी १२ जून १९९५ रोजी पुन्हा अर्ज केला. तेव्हाही त्यांच्याकडे पदव्युत्तर पदवीला बी प्लस ही ‘किमान गुणवत्ता’ नव्हती. तरीही त्यांची निवड झाली आणि त्या ४ जून १९९५ रोजी या महाविद्यालयात पुन्हा रूजू झाल्या.
आपले शिक्षण आणि नोकरी गुणवत्तेच्या आधारेच असल्याचा दावा करणाऱ्या डॉ. जयश्री सूर्यवंशी यांनी दरम्यानच्या काळात एम.कॉम.चे इम्प्रुव्हमेंट केले. विशेष म्हणजे त्यांनी इम्प्रुव्हमेंटसाठी एम. कॉम. च्या आठही पेपरची परीक्षा दिली. एप्रिल/मे १९९५ मध्ये एम.कॉम. द्वितीय वर्षाच्या इम्प्रुव्हमेंटची परीक्षा दिली. द्वितीय वर्षाच्या इम्प्रुव्हमेंटचा निकाल लागण्याआधीच म्हणजेच पदव्युत्तर पदवीला बी प्लस ही ‘किमान गुणवत्ता’ नसतानाच त्यांना पुन्हा रूजू करून घेण्यात आले.

चला उद्योजक बनाः स्फूर्ती योजना देते पारंपरिक उद्योगांना ५ कोटींपर्यंतचा निधी, जाणून घ्या तपशील
नंतर इम्प्रुव्हमेंटचा निकाल लागला. डॉ. जयश्री सूर्यवंशी यांनी ५७ टक्के गुण मिळवले आणि सहायक प्राध्यापकपदासाठी अनिवार्य असलेली पदव्युत्तर पदवीला बी प्लसची ‘किमान गुणवत्ता’ प्राप्त करून घेतली. ‘किमान गुणवत्ते’च्या निकषात बसत नसतानाही डॉ. जयश्री सूर्यवंशी यांनी १९९३ ते १९९५ अशी तीन वर्षे सहायक प्राध्यापक म्हणून नियुक्त्या मिळवल्या, वेतनही उचलले आहे. त्यामुळे ‘आपले शिक्षण आणि नोकरी दोन्ही खुल्या प्रवर्गातून आणि गुणवत्ते आधारे’ असल्याचा डॉ. जयश्री सूर्यवंशी यांचा दावा ‘राजपूत भामटा जातीचे प्रमाणपत्र शोभेची वस्तू असल्यासारखे पडून आहे आणि त्याचा आपण कधीही वापर केला नाही,’ या दाव्या इतकाच दिशाभूल करणारा आणि खोटा ठरणारा आहे.
शपथेवर खोटे बोलणे हा गंभीर गुन्हा, होऊ शकते ३ ते ७ वर्षे तुरूंगवासाची शिक्षाः डॉ. जयश्री सूर्यवंशी यांनी शंभर रुपयांच्या मुद्रांकावर नोटरीद्वारे साक्षांकित करून औरंगाबादच्या जिल्हा जातप्रमाणपत्र पडताळणी समितीकडे शपथपत्र दाखल केले आहे. उपलब्ध कागदपत्रांनुसार त्यांनी शपथपत्रात नमूद केलेली माहिती खोटी आणि दिशाभूल करणारी असल्याचेच स्पष्ट होऊ लागले आहे. अशा प्रकारचे खोटे शपथपत्र दाखल करणे हा कायदेशारदृष्ट्या गंभीर स्वरुपाचा गुन्हा आहे. कायदेशीर तरतुदींनुसार एखाद्या व्यक्तीने स्वेच्छेने खोटे शपथपत्र दाखल केल्यास त्याला किंवा तिला भारतीय दंड विधानाच्या कलम १९९१,१९३, १९५ आणि १९९ अन्वये शिक्षेस पात्र गुन्हा आहे. खोटे शपथपत्र दाखल केल्यास या कलमांतंर्गत तीन ते सात वर्षे कालावधीच्या तुरूंगवासाची शिक्षा ठोठावली जाऊ शकते. अर्धन्यायिक कार्यवाहीसाठी एखाद्या व्यक्तीने खोटे शपथपत्र दाखल केलेले असल्यास त्या व्यक्तीविरुद्ध सक्षम दंडाधिकाऱ्यांकडे भादंविच्या कलम २०० अंतर्गत खासगी तक्रार दाखल करता येऊ शकते.