विद्यापीठात जादूचे प्रयोगः आस्थापनावरच नसलेल्या व्यक्तीकडे प्रभारी प्राचार्यपद, पीएच.डी.ची गाईडशिप!

0
658

औरंगाबादः डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील २८ तदर्थ प्राध्यापकांना नियमबाह्यरितीने कायम करून सरकारी जावई केल्याचे प्रकरण गाजत असतानाच विद्यापीठ प्रशासनाने केलेले अनेक ‘जादू’चे प्रयोगही न्यूजटाऊनच्या हाती लागले आहेत. जी व्यक्ती महाविद्यालयाच्या आस्थापनावर कार्यरतच नाही, अशा व्यक्तीकडे त्या महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्याचा पदभार देण्याचा पराक्रम विद्यापीठ प्रशासनाने केला. विशेष म्हणजे जी व्यक्ती पूर्णवेळ मान्यताप्राप्त अध्यापकच नाही, त्या व्यक्तीला पीएच.डी.ची गाईडशिपही बहाल करण्यात आली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेश सोसायटीच्या शारीरिक शिक्षण महाविद्यालयातील हे प्रकरण आहे. न्यूजटाऊनच्या हाती लागलेल्या कागदपत्रांनुसार, पीईएसच्या शारीरिक शिक्षण महाविद्यालयात शिवाजी सूर्यवंशी यांची २१ डिसेंबर २००६ रोजी व्हीजेएनटीसाठी आरक्षित असलेल्या पदावर कंत्राटीतत्वावर तात्पुरती नियुक्ती करण्यात आली होती. विद्यापीठ प्रशासनाने त्यांच्या नियुक्तीला २००६-०७ या शैक्षणिक वर्षापुरतीच मान्यताही दिली होती. त्यानंतर २००७-०८ या शैक्षणिक वर्षासाठी त्यांची कंत्राटी तत्वावर पुन्हा नियुक्ती करण्यात आली आणि तशी मान्यताही विद्यापीठ प्रशासनाने दिली.

न्यूजटाऊन एक्सक्लुझिव्हः  डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्राध्यापक भरती घोटाळ्यातील एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट वाचा एका क्लिकवर, वाचण्यासाठी येथे क्लिक करा

२००८-०९ मध्ये सूर्यवंशी यांना फेरनियुक्ती देऊन त्यांच्या मान्यतेचा प्रस्ताव विद्यापीठ प्रशासनाकडे पाठवण्यात आल्यानंतर या फेरनियुक्तीस मान्यता देता येणार नसल्याचे पत्र विद्यापीठ प्रशासनाने २० फेब्रुवारी २००९ रोजी महाविद्यालयास दिले होते.मात्र गैरवर्तणुकीच्या प्रकरणात शिवाजी सूर्यवंशी यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यामुळे त्यांना संस्थेने २१ जून २०११ रोजी महाविद्यालयातून बडतर्फ केले. बडतर्फीनंतर सूर्यवंशी यांनी पीईएसच्याच पॉलिटेक्निकमध्ये बदली मिळवली. संस्थेचे तत्कालीन उपाध्यक्ष अशोक तळवटकर यांनी २० नोव्हेंबर २०१२ रोजी तसे आदेश जारी केले. पगाराबाबत पॉलिटेक्निकच्या प्राचार्यांशी चर्चा करावी, असे या आदेशात नमूद करण्यात आले होते. सूर्यवंशी हे पॉलिटेक्निकमध्ये प्रशासकीय अधिकारी पदावर रूजू झाले. सूर्यवंशी हे २२ नोव्हेंबर २०१२ रोजी पीईएसच्या पॉलिटेक्निकमध्ये रूजू झाले आणि तेथे त्यांची पीएफ कपातही करण्यात येत होती.

सूर्यवंशी यांची सेवा पीईएस शारिरीक शिक्षण महाविद्यालयाच्या आस्थापनेवरून खंडित झालेली असतानाही विद्यापीठ प्रशासनाने २ जानेवारी २००६ पासून दोन वर्षांच्या परीविक्षाधीन कालावधीसाठी नियमित मान्यता देण्यात येत असल्याचे पत्र ५ ऑगस्ट २०१६ रोजी दिले. या नियमित मान्यतेला ५ ऑक्टोबर २०२० रोजी पत्र देऊन संस्थेनेच आक्षेप घेतला होता. तरीही विद्यापीठ प्रशासनाने त्याबाबत कोणतीही कार्यवाही केली नाही.

सूर्यवंशींना तयार केले स्वतःचेच हजेरी मस्टरः विशेष म्हणजे शिवाजी सूर्यवंशी यांनी पीईएस शारीरिक शिक्षण महाविद्यालयात कार्यरत असल्याचे दर्शवण्यासाठी स्वतःच हजेरी मस्टर तयार केले. या हजेरी मस्टरवर फक्त त्यांची एकट्याचीच स्वाक्षरी आहे. महाविद्यालयात कार्यरत असलेल्या अन्य कोणत्याही अध्यापक किंवा शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची स्वाक्षरी या हजेरी मस्टरवर नाही. या प्रकरणी महाविद्यालयाने छावणी पोलिस ठाण्यात रितसर फिर्यादही नोंदवली आहे.

शिवाजी सूर्यवंशी यांनी तयार केलेले एकट्याचेच हजेरी मस्टर.

ईश्वर मंझानी दडवली वस्तुस्थिती, सूर्यवंशींना संरक्षणः सूर्यवंशी यांच्या मान्यतेबाबत महाविद्यालयानेच अनेक तक्रारी केल्यानंतर हे प्रकरण विद्यापीठाच्या तक्रार निवारण समितीकडे वर्ग करण्यात आले. तक्रार निवारण समितीने या प्रकरणी शैक्षणिक विभागाचे उपकुलसचिव ईश्वर मंझा यांना अहवाल सादर करण्यास सांगितल्यानंतर वस्तुस्थितीचा विपर्यास करत मंझा यांनी ‘वस्तुस्थितीदर्शक’ अहवाल सादर केला. सूर्यवंशी हे पीईएसच्या शारीरिक शिक्षण महाविद्यालयात नियमित अध्यापक असल्याचे मंझा यांनी त्यांच्या अहवालात म्हटले आहे. मात्र महाविद्यालयाने सादर केलेली सूर्यवंशी यांची बडतर्फी आणि सेवा खंडाची कागदपत्रेच मंझा यांनी विचारात घेतली तर नाहीत उलट सूर्यवंशी यांनाच प्रभारी प्राचार्यपदी नियुक्त करण्यात यावे, अशी शिफारसही या अहवालात केली  आणि संस्थेने प्रभारी प्राचार्यपदी नियुक्ती केलेल्या डॉ. भास्कर साळवी यांना बेदखल करण्याचा प्रयत्नही मंझा यांनी त्यांच्या अहवालात केला.

विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागाचे उपकुलसचिव ईश्वर मंझा यांनी दिलेला अहवाल.

चला उद्योजक बनाः स्फूर्ती योजना देते पारंपरिक उद्योगांना ५ कोटींपर्यंतचा निधी, जाणून घ्या तपशील

संशोधन मार्गदर्शक म्हणून मान्यताः सूर्यवंशी यांच्या नियुक्तीचे प्रकरणच वादग्रस्त असताना विद्यापीठ प्रशासनाने स्वतःचेच नियम धाब्यावर बसवून सूर्यवंशी यांना शारीरिक शिक्षण विषयात संशोधन मार्गदर्शक म्हणून २८ मे २०१९ रोजी मान्यता दिली. ही मान्यताही विद्यापीठ प्रशासनाने कशाच्या आधारावर दिली, हाही संशोधनाचा विषय आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा