‘बामु’च्या कुलसचिव डॉ. सूर्यंवशी म्हणतात: त्यांचे जातप्रमाणपत्र ‘शोभेची वस्तू’, पण हा वाचा पर्दाफाश

0
1455
संग्रहित छायाचित्र.

सुरेश पाटील/औरंगाबादः

बोगस जातप्रमाणपत्रामुळे चौकशीच्या फेऱ्यात अडकलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलसचिव डॉ. जयश्री सूर्यवंशी यांच्या मते त्यांच्याकडे असलेले ‘राजपूत भामटा’ जातीचे प्रमाणपत्र  ‘शोभेची वस्तू’ असल्यासारखे पडून असून त्या प्रमाणपत्राचा त्यांनी कधीही वापर केलेला नाही. तसे शपथपत्रच त्यांनी जातप्रमाणपत्र पडताळणी समितीकडे सादर केलेले आहे. मात्र, न्यूजटाऊनच्या हाती लागलेल्या अधिकृत कागदपत्रांनुसार डॉ. जयश्री सूर्यवंशी यांचे हे शपथपत्रही सत्याचा अपलाप करणारे असून डॉ. सूर्यवंशी यांनी सौ. इं. भा. पाठक महिला महाविद्यालयातील नियुक्ती ही आरक्षण डावलून ‘राजपूत भामटा’ जातीच्या प्रमाणपत्राआधारेच मिळवली होती, हे स्पष्ट होत आहे.

विद्यापीठाच्या कुलसचिव डॉ. जयश्री राजेश सूर्यवंशी या जातीने मराठा असून त्यांचे माहेरकडील नाव जयश्री मारोतीराव शिंदे असे आहे. १९९० मध्ये त्यांनी राजेश सरदारसिंह सूर्यवंशी यांच्याशी आंतरजातीय विवाह केला. त्यानंतर त्यांनी कन्नडच्या तहसील कार्यालयातून  १५ नोव्हेंबर १९९० रोजी ‘राजपूत भामटा’ जातीचे प्रमाणपत्र मिळवले. डॉ. सूर्यवंशी आता याच जातीच्या प्रमाणपत्रावरून वादाच्या भोवऱ्यात सापडल्या असून त्यांची विविध पातळ्यांवर चौकशी सुरू आहे.

डॉ. सूर्यवंशी यांच्या जातीच्या दाव्याबाबत औरंगाबादच्या जिल्हा जातपडताळणी समितीकडे आक्षेप नोंदवण्यात आल्यानंतर जातपडताळणी समितीने त्यांना वारंवार समितीसमोर हजर राहून म्हणणे मांडण्यासाठी समन्स बजावल्यानंतरही त्या समितीसमोर हजर झाल्या नाहीत. शेवटी त्यांनी १ मार्च २०२२ रोजी जातपडताळणी समितीकडे शंभर रुपयांच्या मुद्रांकावर आपले लेखी म्हणणे सादर केले आहे. त्यांच्या लेखी म्हणण्यात त्यांनी अनेक दावे केले आहेत.

न्यूजटाऊन एक्सक्लुझिव्हः  डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्राध्यापक भरती घोटाळ्यातील एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट वाचा एका क्लिकवर, वाचण्यासाठी येथे क्लिक करा

डॉ. सूर्यवंशी यांनी सादर केलेल्या लेखी म्हणण्यानुसार, ‘प्रचलित भारतीय समाज व्यवस्थेनुसार लग्नानंगर मुलगी/सून विवाह झालेल्या कुटुंबाची सदस्य म्हणून ओळखी जाते. तत्कालीन परिस्थितीत माझे पती राजेश सूर्यवंशी यांनी माझ्या नावे त्यांच्या स्वतःच्या म्हणजेच ‘राजपूत भामटा’ जातीचा दाखला दिनांक १५/११/१९९० रोजी कन्नड तहसील कार्यालयातून काढला. माझे शिक्षण व नोकरी दोन्हीही खुल्या प्रवर्गातून व गुणवत्तेच्या आधारे झालेले असून मी दिनांक १५/११/१९९० रोजीच्या राजपूत भामटा जात प्रमाणपत्राचा कधीही वापर केला नाही. आजपर्यंत सदर जातप्रमाणपत्र शोभेची वस्तू असल्यासारखे पडून आहे. लग्नानंतर सामाजिक ओळख सासरच्या परिवाराकडील समजली जाते. त्या पार्श्वभूमीवर सेवापुस्तिकेत जातीच्या रकान्यात जात मोंद ही राजपूत भामटा (पतीची जात) नोंदवलेली आहे. या उपरोक्त राजपूत भामटा जातीचा कधीच आणि कुठेच वापर झालेला नाही,’ असे डॉ. सूर्यवंशी यांनी या शपथपत्रात म्हटले आहे.

हेही वाचाः डॉ. जयश्री सूर्यवंशी यांच्या ‘गुणवत्तेच्या आधारे’ निवड झाल्याच्या दाव्यातही खोटच, ही वाचा वस्तुस्थिती…

‘०२/०८/१९९३ ते ३१/०५/२००८ या कालावधीत सौ. इं.भा. पाठक महिला महाविद्यालय, औरंगाबाद या महाविद्यालयात कार्यरत असताना नियुक्ती आदेश तदर्थ म्हणजेच खुल्या प्रवर्गाचे असताना सुद्धा सेवापुस्तिकेत जातीच्या रकान्यात सासरकडील कुटुंबाच्या जातीची (राजपूत भामटा) नोंद झालेली होती. सदर नोंदीच्या आधारे साधारणतः २५ वर्षांच्या कालखंडानंतर नाहक त्रास देण्याचा व बदनाम करण्याचा प्रयत्न काही व्यावसायिक आरटीआय कार्यकर्ते करत आहेत,’ असा दावाही डॉ. जयश्री सूर्यवंशी यांनी या शपथपत्रात केला आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलसचिव डॉ. जयश्री सूर्यवंशी यांनी जिल्हा जातपडताळणी समितीकडे सादर केलेले शपथपत्र. यात त्यांनी राजपूत भामटा जातीचे प्रमाणपत्र शोभेच्या वस्तूसारखे पडून असल्याचे म्हटले आहे.

खरेच ‘शोभेची वस्तू’ आहे का डॉ. सूर्यवंशी यांचे जातप्रमाणपत्र?:  डॉ. जयश्री सूर्यवंशी यांनी त्यांच्याकडे असलेले ‘राजपूत भामटा’ जातीचे प्रमाणपत्र केवळ ‘शोभेची वस्तू’ असल्यासारखे पडून आहे, आणि त्यांनी त्याचा कुठेही वापर केलेला नाही किंवा फायदा घेतलेला नाही, असा दावा केला असला तरी त्यांचा हा दावाच खोटा आहे. डॉ. सूर्यवंशी यांनी सौ. इं.भा. पाठक महिला महाविद्यालयात वाणिज्य विषयातील तदर्थ स्वरुपातील सहायक प्राध्यापक म्हणून नियुक्तीसाठी २४ जून १९९३ रोजी स्वतःच्या हस्ताक्षरात पहिला अर्ज केला होता. इंग्रजीत लिहिलेल्या या अर्जात   मुद्दा क्रमांक ४ मध्ये ‘I am Belonging to Rajput Bhamtta Category (VJNT)’ म्हणजेच मी राजपूत भामटा प्रवर्गात (व्हीजेएनटी) मोडते, असा स्पष्ट उल्लेख आहे. त्यानंतर त्यांनी ११ जुलै १९९४ रोजी याच महाविद्यालयात वाणिज्य विषयातील पूर्णवेळ प्राध्यापकपदासाठी अर्ज केला. मराठीमध्ये लिहिलेल्या या अर्जातही मुद्दा क्रमांक ४ मध्ये डॉ. सूर्यवंशी यांनी ‘मी राजपूत भामटा या जातीत मोडते (व्हीजेएनटी),’ अशी स्पष्ट नोंद केली आहे. १२ जून १९९५ रोजीही डॉ. सूर्यवंशी यांनी याच महाविद्यालयात केलेल्या हस्तलिखित अर्जातही मुद्दा क्रमांक ४ मध्येही अशीच स्पष्ट नोंद आहे.

डॉ. जयश्री सूर्यवंशी यांनी सौ. इं.भा. पाठक महिला महिविद्यालयात वाणिज्य विषयातील प्राध्यापकपदासाठी केलेला पहिला अर्ज. या अर्जात आज त्यांना जे राजपूत भामटा जातीचे प्रमाणपत्र शोभेची वस्तू वाटते, त्या जातीचा आणि संवर्गाचा त्यांनी स्पष्ट उल्लेख केलेला आहे.

डॉ. सूर्यवंशी यांची सौ. इं.भा. पाठक महिला महाविद्यालयातील नियुक्ती एसटी किंवा ओबीसीसाठी आरक्षित असलेल्या पदावर व्हीजेएनटी प्रवर्गातून झाली होती. मागास प्रवर्गातून नियुक्ती झालेल्या शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी त्यांच्या जातप्रमाणपत्राची पडताळणी करून घेऊन त्याची एक प्रत महाविद्यालयात सादर करावी, अशी सूचना या महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी १० जून २००२ रोजी काढली होती. या सूचनेत डॉ. सूर्यवंशी यांचेही नाव होते. त्यांच्या नावापुढे व्हीजेएनटी असा प्रवर्ग नोंदवलेला होता आणि या सूचनेवर डॉ. सूर्यवंशी यांनी स्वाक्षरीही केली होती.

चला उद्योजक बनाः  स्फूर्ती योजना देते पारंपरिक उद्योगांना ५ कोटींपर्यंतचा निधी, जाणून घ्या तपशील

१० ऑक्टोबर २००३ रोजीही महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी अशीच सूचना काढली होती, त्यातही डॉ. सूर्यवंशी यांच्या नावाची नोंद आहे. त्यानंतर महाविद्यालयाने रजिस्टर्ड पोस्टाने २७ ऑगस्ट २००९ रोजी नोटीस पाठवून डॉ. सूर्यवंशी यांना सदर पत्र प्राप्त झाल्यापासून पाच दिवसांत किंवा ३१ ऑगस्ट २००९ पर्यंत जातीचे वैधता प्रमाणपत्र सादर करावे, अन्यथा पुढील कार्यवाही करण्यात येईल, अशी तंबी दिली होती. त्या नोटिशीलाही डॉ. सूर्यवंशी यांनी दाद दिली नाही. डॉ. सूर्यवंशी यांची नियुक्ती व्हीजेएनटी य राखीव संवर्गातून करण्यात आलेली आहे, असे लेखी पत्र महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी १८ जुलै २००८ रोजीच औरंगाबाद विभागाच्या उच्च शिक्षण सहसंचालकांनाही दिले होते. त्यामुळे आपल्याकडे असलेले राजपूत भामटा जातीचे प्रमाणपत्र केवळ शोभेची वस्तू असल्यासारखे पडून आहे आणि त्याचा आपण कुठेही वापर केलेला नाही, हा डॉ. सूर्यवंशी यांचा दावा खोटा ठरतो.

डॉ. जयश्री सूर्यवंशी यांची नियुक्ती व्हीजेएनटी या आरक्षित संवर्गातून झालेली असल्याचे नियुक्ती प्राधिकारी आणि इं.भा. पाठक महिला महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सी.बी. महाजन यांनी औरंगाबादच्या उच्च शिक्षण सहसंचालकांना पाठवले होते.
सौ. इं.भा. पाठक महिला महाविद्यालयाने २००२ मध्येच जात प्रमाणपत्राची पडताळणी करून घेण्यास सांगितले होते. या संदर्भात महाविद्यालयाने जी नोटीस काढली होती, त्या नोटिशीवर डॉ. जयश्री सूर्यवंशी यांची स्वाक्षरी आहे. त्यावेळी त्यांनी आपली नियुक्ती खुल्या प्रवर्गातून झालेली असल्यामुळे जात प्रमाणपत्राची पडताळणी करून घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे लेखी कळवले असते, तर आज त्या जो दावा करतात त्याला पुष्ठी मिळाली असती. परंतु त्यावेळी व्हीजेएनटी संवर्गातून झालेली नियुक्ती त्यांना स्वतःच मान्य होती. म्हणूनच त्यांनी महाविद्यालयाने काढलेल्या नोटिशीवर स्वाक्षरी करून तशी पोच दिली.

राज्य सरकारलाही खोटे ठरवण्याचा प्रयत्नः डॉ. जयश्री सूर्यवंशी यांच्या मूळ नियुक्तीबाबत चौकशी करून वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करण्याचे निर्देश १७ जानेवारी २०२२ रोजी देण्यात आले होते. त्यानुसार  स्थापन करण्यात आलेल्या त्रिसदस्यीय समितीनेही डॉ. सूर्यवंशी यांची नियुक्ती नियमबाह्य ठरवली होती. ‘डॉ. जयश्री राजेश सूर्यवंशी यांची डॉ. सौ. इं.भा. पाठक महिला महाविद्यालयातील नियुक्ती जाहिरातीतील विहित आरक्षण डावलून, विहित अर्हता पूर्ण होत नसताना तात्पुरत्या स्वरुपात करण्यात आली. त्यानंतर विहित कार्यपद्धतीशिवाय त्या नियुक्तीस सेवासातत्य देण्यात आले,’ असा अहवाल दिला. या त्रिसदस्यीय समितीच्या अहवालाचा संदर्भ देत उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे कक्ष अधिकारी प्र.ना. ढवळे यांनी  राज्याच्या उच्च शिक्षण सहसंचालकांना दिनांक १७ फेब्रुवारी २०२२ रोजी पत्र लिहून कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. तरीही डॉ. सूर्यवंशी यांनी आपली नियुक्ती खुल्या प्रवर्गातूनच झाली असल्याचा आणि आपण राजपूत भामटा जातीच्या प्रमाणपत्राचा वापर केला नसल्याचे शपथपत्र देऊन राज्य सरकारलाही खोटे ठरवण्याचा प्रयत्न केला आहे. आता राज्य सरकार या प्रकरणी नेमकी कोणती कारवाई करते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा