कुलगुरू डॉ. येवले हे कोणते संकेत?: चिश्तियाच्या ‘फ्रॉड’ प्राचार्यांनीच फोडला भूमिपूजनाचा श्रीफळ!

0
534

औरंगाबादः  ज्यांची नियुक्तीच बोगस आहे आणि ज्यांनी कागदपत्रात खाडाखोड करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची फसवणूक केल्याचे कुलसचिवांनी २००५ मध्येच मान्य केले आहे, असे खुलताबादच्या चिश्तिया महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. शेख एजाज मुन्शीमियां यांनाच कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या उपस्थितीत शुक्रवारी विद्यापीठ गेटच्या सुशोभीकरणाच्या कामाचे श्रीफळ फोडून आणि कुदळ मारून भूमिपूजन करण्याचा सन्मान देण्यात आला. त्यामुळे आता विद्यापीठ प्रशासनाने चिश्तिया महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या नियमबाह्य नियुक्त्यांबाबत स्थापन केलेल्या त्रिसदस्यीय चौकशी समितीचा अहवाल नेमका काय येणार? याचे जणू स्पष्ट संकेतच विद्यापीठ प्रशासनाने देऊन टाकले आहेत. चौकशीच्या अधीन असलेला ‘आरोपी’च भूमिपूजनाची कुदळ मारत असताना कुलगुरू डॉ. येवले त्यांच्या पाठीमागे प्रसन्न चेहऱ्याने उभे असलेले छायाचित्रात दिस आहेत.‘भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे..’ असा संदेशच जणू कुलगुरू डॉ. प्रमोद येवले या छायाचित्रातून देत आहेत. त्यामुळे डॉ शेख एजाज यांच्यासह चिश्तिया महाविद्यालयातील बोगस नियुक्त्यांना ‘राज मान्यता’ मिळणार असल्याचा संदेशच चौकशी समितीचा अहवाल येण्याआधीच या घटनेने दिल्याचे मानले जात आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्रशासनाने विद्यापीठाची शैक्षणिक गुणवत्ता आणि दर्जा वाढावा यासाठी आवश्यक असलेले उपक्रम आणि कामांवर कमी आणि अन्य बाबींवरच जास्त लक्ष केंद्रित केले आहे. जेथे मलिदा लाटायला मिळतो, अशीच बिगर शैक्षणिक कामे हाती घेण्याच्या योजना विद्यापीठ प्रशासन प्राधान्याने हाती घेत असून शैक्षणिक गुणवत्ता आणि दर्जावृद्धीकडे पूर्णतः दुर्लक्ष होत असलेले दिसून येत आहे. त्यातून ओसाड पडून उद्धवस्त झालेल्या डॉमेट्री म्हणजेच तात्पुरत्या इमारतीला कंपाऊडचे बांधकामासारखे उपक्रम हाती घेतले जात आहेत. आता  सुमारे दोन कोटी रुपये खर्चाचे विद्यापीठ गेटच्या सुशोभीकरण आणि नवीन गेटच्या बांधकामाचे काम हाती घेण्यात आले असून शुक्रवारी या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. कुलगुरू डॉ. प्रमोद येवले, प्र-कुलगुरू डॉ. श्याम शिरसाठ यांच्या प्रमुख उपस्थितीत चिश्तिया महाविद्यालयाचे ‘बोगस’ प्रभारी प्राचार्य डॉ. शेख एजाज मुन्शीमिया यांच्या हस्ते श्रीफळ फोडून आणि कुदळ मारून या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.

न्यूजटाऊन एक्सक्लुझिव्हः  डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्राध्यापक भरती घोटाळ्यातील एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट वाचा एका क्लिकवर, वाचण्यासाठी येथे क्लिक करा

विशेष म्हणजे डॉ. शेख एजाज मुन्शिमियां यांची चिश्तिया महाविद्यालयात इतिहास विषयाचे सहायक प्राध्यापक म्हणून नियुक्तीच बोगस आहे. किमान शैक्षणिक अर्हता नसतानाही त्यांची नियुक्ती झाली आहे. त्यांच्या या बोगस नियुक्तीला नियमित मान्यता देण्याचा पराक्रम ३१ जानेवारी २०२२ रोजी विद्यापीठ प्रशासनाने केला होता आणि नंतर आक्षेप आल्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने या नियमित मान्यतेला ९ फेब्रुवारी २०२२ रोजी तात्पुरती स्थगितीही दिली होती.

विशेष म्हणजे डॉ. शेख एजाज मुन्शिमियां यांनी चिश्तिया महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्यपदाचा गैरवापर करून विद्यापीठ प्रशासनाची फसवणूक केल्याचा ठपका स्वतः विद्यापीठ प्रशासनानेच त्यांच्यावर २००५ मध्येच ठेवला आहे. तसे पत्रच विद्यापीठाच्या तत्कालीन कुलसचिवांनी डॉ. शेख एजाज यांना देऊन १५ दिवसांत खुलासाही मागवला होता. शैक्ष/संलग्न/ एचजीटी/२००४-०५/३३९९-४२० क्रमांकाचे हे पत्र विद्यापीठ प्रशासनाने दिनांक २ मे २००५ रोजी डॉ. शेख एजाज मुन्शीमियां यांना दिले होते. डॉ. शेख एजाज मुन्शीमियां यांनी त्यांची निवड स्थानिक निवड समितीमार्फत निवड झालेली असतानाही ती विद्यापीठ निवड समितीने केल्याचे दर्शवून विद्यापीठाची चुकीची मान्यता मिळवली होती.

चिश्तिया महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. शेख एजाज मुन्शीमियां यांनी विद्यापीठाची फसवणूक केल्याचे कुलसचिवांनी २००५ मध्ये लिहिलेले पत्र.

विद्यापीठ प्रशासनाने विद्यापीठाचे कार्यालयीन रेकॉर्डची तपासणी केली असता ही बाब स्पष्ट झाली असल्याचे कुलसचिवांनी दिलेल्या या पत्रात म्हटले होते. ते पत्रही न्यूजटाऊनकडे उपलब्ध आहे. याबाबत १५ दिवसांत खुलासा करावा, अन्यथा आपले काहीही म्हणणे नाही, असे समजून कारवाई करण्यात येईल, असे कुलसचिवांनी या पत्रात म्हटले होते. परंतु तेव्हाही डॉ. शेख एजाज मुन्शीमियां यांच्याविरुद्ध विद्यापीठ प्रशासनाने कोणतीही कारवाई केली नाही. उलट त्याच डॉ. शेख एजाज मुन्शीमियां यांना शुक्रवारी विद्यापीठ गेटच्या सुशोभीकरणाच्या कामाचे भूमिपूजन करण्याचा सन्मान देण्यात आला आहे.

हा सन्मानच ‘चिश्तिया’ची चौकशी काय होणार याचे स्पष्ट संकेतः चिश्तिया महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या नियमबाह्य नियुक्त्यांची चौकशी करण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाने २१ फेब्रुवारी रोजी त्रिसदस्यी चौकशी समिती स्थापन केली आहे. रसायनशास्त्र विभागातील प्रा. डॉ. सुरेश गायकवाड यांच्या अध्यक्षतेखालील या समितीत आस्थापना विभागाचे उपकुलसचिव दिलीप भरड आणि प्रभारी विधी अधिकारी किशोर नाडे हे या समितीचे सदस्य आहेत. ही चौकशी समिती चिश्तिया महाविद्यालयातील ज्या प्राध्यापकांच्या नियमबाह्य नियुक्त्यांची चौकशी करणार आहे, त्यात विद्यापीठाने कुलगुरूंच्या उपस्थितीत भूमिपूजनाचा सन्मान दिलेले प्रभारी प्राचार्य डॉ. शेख एजाज मुन्शीमियां यांच्याही चौकशीचा समावेश आहे.

चला उद्योजक बनाः स्फूर्ती योजना देते पारंपरिक उद्योगांना ५ कोटींपर्यंतचा निधी, जाणून घ्या तपशील

ज्यांची नियुक्ती संशयाच्या भोवऱ्यात आहे आणि खुद्द विद्यापीठ प्रशासनानेच ज्यांच्या नियमबाह्य नियुक्तीची चौकशी करण्याचे आदेश दिले असून ही चौकशी सुरू आहे, अशा शेख एजाज मुन्शीमियां यांना विद्यापीठ गेटच्या सुशोभीकरणाच्या कामाचे भूमिपूजन करण्याचा सन्मान देऊन ही चौकशी समिती नेमकी काय चौकशी करणार आणि त्यातून काय निष्कर्ष निघणार याचे स्पष्ट संकेतच विद्यापीठ प्रशासनाने देऊन टाकले आहेत. त्यामुळे या एकूणच प्रकरणात कुलगुरू डॉ. प्रमोद येवले, प्र-कुलगुरू डॉ. श्याम शिरसाठ आणि कुलसचिव डॉ. जयश्री सूर्यवंशी यांच्या भूमिकेकडे संशयाने पाहिले जाऊ लागले आहे.


‘भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे..’ असा संदेश तर कुलगुरू डॉ. प्रमोद येवले हे चिश्तिया महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. शेख एजाज मुन्शीमियां यांना देत नसतील ना?

तू कर रडल्यासारखे, मी करतो मारल्यासारखे….: चिश्तिया महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या नियमबाह्य नियुक्त्यांचे प्रकरण वर्षानुवर्षे ‘तू कर रडल्यासारखे आणि मी करतो मारल्यासारखे’ अशाच पद्धतीने चालू आहे. प्रभारी प्राचार्य डॉ. शेख एजाज मुन्शीमियां यांनी विद्यापीठाचीच फसवणूक केल्याचा निष्कर्ष २००५ मध्ये खुद्द कुलसचिवच उपलब्ध अभिलेखाची पडताळणी करून काढतात. परंतु कोणतीही कारवाई केली जात नाही. आज १७ वर्षानंतर पुन्हा एकदा चौकशी समिती नेमण्यात आली आहे. विद्यापीठाच्या चौकशी समितीने ज्या प्रकरणाची चौकशी केली, त्याच प्रकरणाची चौकशी आज पुन्हा १७ वर्षांनंतर पुन्हा चौकशी केली जात आहे. हा प्रकार म्हणजे चौकशी समितीचीच चौकशी करण्यासारखा आहे. त्यामुळे आताच्या चौकशी समितीच्या अहवालानंतर तरी कारवाई होण्याची शक्यताही कमी असल्याचे मानले जात आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा