तदर्थ प्राध्यापकांच्या सुरस कथाः नाट्यशास्त्रात अपात्र बंडगरांच्या नियुक्तीचा अवैध ‘एकपात्री प्रयोग’

0
916
संग्रहित छायाचित्र.
  • सुरेश पाटील/औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने २००४-०५ पासून विविध शैक्षणिक विभागात तदर्थ स्वरुपात नियुक्त केलेल्या आणि राज्य सरकारने या शिक्षकपदांच्या वेतनाचे आर्थिक दायित्व स्वीकारल्यानंतर सर्व नियम धाब्यावर बसवून सेवेत कायम केलेल्या २८ तदर्थ सहायक प्राध्यापकांच्या नियुक्तीच्या २८ सुरस कथा आहेत. नियम व पात्रतेचे किमान निकष डावलून मनमानी पद्धतीने नियुक्त्या करण्याचा विद्यापीठ प्रशासनाचा नियमबाह्य शिरस्ता वेळीच रोखला गेला असता तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने चालणारे हे विद्यापीठ नियुक्ती प्रक्रियेतील घोटाळ्यांसाठी नव्हे तर शैक्षणिक गुणवत्तेसाठी ओळखले गेले असते. परंतु तसे न झाल्यामुळे नियुक्त्यांतील घोटाळ्यांची मालिका अव्याहतपणे सुरूच राहिली. नाट्यशास्त्र विभागात प्रा. डॉ. अशोक बंडगर यांच्या अधिव्याख्यातापदी नियुक्तीचा ‘एकपात्री प्रयोग’ हा त्याच मालिकेतील एक भाग!

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने विद्यापीठ अनुदान आयोगाच्या दहाव्या योजनेअंतर्गत प्रपाठक आणि अधिव्याख्यात्यांच्या नियुक्त्या केल्या. या नियुक्त्या करतानाही सहायक प्राध्यापकपदासाठी (तेव्हाचे अधिव्याख्यातापद) आवश्यक असलेल्या किमान शैक्षणिक/ व्यावसायिक पात्रतेचे नियम आणि निकषही पाळण्यात आले नाहीत. ही नियुक्ती प्रक्रिया राबवताना किमान साधनशुचिता पाळण्याचा विवेकही विद्यापीठ प्रशासनाने दाखवला नाही.

हेही वाचाः ज्या दिवशी अर्ज, त्याच दिवशी मुलाखत; अपात्र माजी कुलगुरूपुत्राची प्राध्यापकपदी बेकायदेशीर नियुक्ती!

यूजीसीच्या दहाव्या योजनेतील नियुक्ती प्रक्रियेत झालेल्या या हडेलहप्पीचा पर्दाफाश उच्च शिक्षण संचालनालयाने २०१४ मध्ये  उच्च शिक्षण विभागाचे तत्कालीन सहसंचालक डॉ. वि. रा. मोरे यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त केलेल्या चौकशी समितीच्या अहवालातच झाला होता. औरंगाबाद विभागाचे माजी विभागीय सहसंचालक डॉ. बी. पी. लहाने, उच्च शिक्षण संचालनालयातील वरिष्ठ प्रशासन अधिकारी हरिभाऊ शिंदे हे त्या चौकशी समितीचे सदस्य होते. विद्यापीठ निधीतून नियुक्त करण्यात आलेल्या २८ तदर्थ प्राध्यापकांच्या सेवा कायम करताना उच्च शिक्षण संचालक आणि मंत्रालयातील उच्च शिक्षण विभागाच्या अवर सचिवांनी डॉ. मोरे समितीच्या अहवालावर एक दृष्टीक्षेप टाकला असता तरी हा घोटाळा टाळता आला असता.

हेही वाचाः वॉक-इन-इंटरिव्ह्यूसाठी अर्जच नसलेल्या दोघांची केली सहायक प्राध्यापकपदी निवड, एक जण कायम

नाट्यशास्त्र विभागातील अधिव्याख्यातापदाच्या नियुक्तीसाठी विद्यापीठ प्रशासनाने १ जानेवारी २००६ रोजी जाहिरात प्रसिद्ध केली होती. त्या जाहिरातीचा क्रमांक आस्था/विभा/२२/२००६ असा आहे. या जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे नाट्यशास्त्र विभागातील अधिव्याख्यातापदासाठी या विषयातील नेट अथवा सेट परीक्षा उत्तीर्ण असणे अनिवार्य होते. सोबतच पदवी किंवा पदव्युत्तर स्तरावरील अध्यापनाचा किमान तीन वर्षांचा अनुभव असणेही अनिवार्य होते. यापैकी कोणतीही अर्हता धारण करत नसतानाही प्रा. डॉ. अशोक गुरप्पा बंडगर यांची अधिव्याख्यातापदी नियुक्ती करण्यात आली.

हेही वाचाः डॉ. आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात २८ ‘तदर्थ’ प्राध्यापक अवैधरित्या बनले ‘सरकारचे जावई’!

प्रा. डॉ. अशोक बंडगर यांनी एप्रिल २००२ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून बॅचलर ऑफ ड्रामाटिक्स (बी.डी.) पदवी घेतली. याच विद्यापीठातून २००४ मध्ये त्यांनी मास्टर ऑफ ड्रामाटिक्सची (एम.डी.) पदव्युत्तर पदवी घेतली आणि २००६ मध्ये त्यांनी अधिव्याख्यातापदासाठी अर्ज केल्यानंतर त्यांची या पदावर नियुक्ती करून त्यांना ११ जून २००८ रोजी नाट्यशास्त्र विभागात अधिव्याख्यातापदी रूजूही करून घेण्यात आले.

हेही वाचाः विद्यापीठातील घोटाळाः महालेखाकारांनी २०१४ मध्येच घेतला त्या २८ ‘सरकारी जावयां’वर आक्षेप

विशेष म्हणजे मुलाखतीच्या वेळेपर्यंत डॉ. बंडगर हे जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे नेट अथवा सेट उत्तीर्ण नव्हते किंवा त्यांच्याकडे पीएच.डी.ची पदवीही नव्हती. विद्यापीठात रूजू झाल्यानंतर डॉ. बंडगर यांनी ‘स्टेज क्राफ्ट इन ड्रामा’ या विषयात पीएच.डी. केली आणि २०११ मध्ये त्यांना ही पदवी प्रदान करण्यात आली. म्हणजेच विद्यापीठात अधिव्याख्यातापदी नियुक्तीच्या चार वर्षांनंतर त्यांनी पीएच.डी. पदवी घेतली. त्यांची ही पदवी यूजीसीने २००९ मध्ये अधिव्याख्यातापदासाठी नेट/सेटमधून दिलेल्या सुटीच्या निकषात बसते की नाही? हा स्वतंत्र पडताळणीची बाब आहे. किमान पात्रतेचे निकष पूर्ण करत नसतानाही प्रा. डॉ. अशोक बंडगर यांना नियुक्ती देण्यात आली आणि नंतर त्यांची सेवा नियमितही करण्यात आली, हे विशेष!

हेही वाचाः शासन आदेशाचा चुकीचा ‘अर्थ’ लावून ‘पूर्ण’ केली २८ तदर्थ प्राध्यापकांची एचटीई ई- सेवार्थ प्रणाली!

डॉ. मोरे चौकशी समितीने या एकूणच प्रकरणात नोंदवलेली निरीक्षणे आणि केलेल्या शिफारशी गंभीर स्वरुपाच्या आहेत. ‘विद्यापीठ अनुदान आयोगाची दहावी पंचवार्षिक योजना ३१ मार्च २००७ पर्यंतच होती. या योजनेत मंजूर असलेल्या पदांचा आर्थिक भार राज्य शासनाने स्वीकारल्याचे आदेश अद्याप निर्गमित झालेले नसल्यामुळे  संबंधितांना अदा केलेले वेतन तत्काळ वसूल करण्यात यावे’, अशी महत्वाची शिफारस डॉ. मोरे समितीने केली होती.

हेही वाचाः ‘बॅक डोअर एंट्री’बाबत सुप्रीम कोर्टाचेही निर्देश धुडकावून २८ तदर्थ प्राध्यापकांना केले ‘धन’वान!

डॉ. अशोक बंडगर यांच्यासह नियमबाह्य पद्धतीने नियुक्त केलेल्या प्रपाठक व अधिव्याख्यातांना तत्काळ सेवामुक्त करून पुनःश्च जाहिरात देऊन विहित अटी व शर्तीनुसार नियुक्त्या करणे बंधनकारक आहे, अशी शिफारस करूनही डॉ. अशोक बंडगर यांना विद्यापीठ प्रशासनाने नियमबाह्य सेवासातत्य दिले आहे. ‘अपात्र’ असतानाही अधिव्याख्यातापदी नियुक्त झालेले डॉ. अशोक बंडगर यांच्या मार्गदर्शनाखाली २०१४ पासून तीन संशोधक छात्र पीएच.डी. साठी संशोधन करत आहेत.

हेही वाचाः ते २८ प्राध्यापक तदर्थ आहेत हे विद्यापीठाने लपवले, सहसंचालकांनी खपवले आणि संचालकांनी पचवले!

हेही वाचाः ना बिंदूनामावलीचे प्रमाणीकरण, ना प्रक्रियेची पडताळणी; तरीही तदर्थ नियुक्त्या ठरवल्या वैध!

चला उद्योजक बनाः शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करून कर्ज/सबसिडी मिळवायची?, पण कशी? वाचा सविस्तर

या नियुक्ती प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार व विसंगती आढळून आल्या आहेत. काही ठराविक उमेदवारांना विद्यापीठात सामावून घेण्यासाठी  जाणीवपूर्वक सदरची नियमबाह्य कृती करण्यात आली आहे. अपात्र उमेदवारांना संधी दिल्यामुळे पात्र उमेदवारांची संधी हिरावून घेऊन त्यांच्यावर अन्याय झालेला आहे. त्यामुळे शासनाच्या तिजोरीवर नाहक आर्थिक भार/ भुर्दंड पडला आहे, असे निरीक्षण नोंदवत डॉ. मोरे समितीने संबंधितांवर उचित कारवाईची शिफारस केली होती. परंतु कारवाई तर दूरच उच्च शिक्षण सहसंचालक, संचालक आणि मंत्रालयातील उच्च शिक्षण विभागाच्या अवर सचिवांनी २८ तदर्थ प्राध्यापकांच्या सेवा नियमित करून आणखी एका घोटाळ्याला खतपाणी घातले आहे.

डॉ. वि. रा. मोरे यांच्या अध्यक्षतेखालील त्रिसदस्यीय चौकशी समितीच्या अहवालातील प्रा. डॉ. अशोक बंडगर यांच्या नियुक्तीबद्दल मारलेला शेरा.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा