नियुक्तीत लोचा, अवैध मुदतवाढीचा बुस्टर तरीही प्रा. डॉ. देशमुखांची शासन मान्यतेआधीच वेतन निश्चिती

0
137
संग्रहित छायाचित्र.
  • सुरेश पाटील/औरंगाबादः

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात दहाव्या पंचवार्षिक योजनेत ‘पंधरा दिवसांचे पाहुणे’ म्हणून संगणकशास्त्र आणि माहिती तंत्रज्ञान विभागात सहयोगी प्राध्यापकपदी नियुक्त करण्यात आलेले प्रा. डॉ. रत्नदीप रघुनाथराव उर्फ आर. आर. देशमुख यांची मूळ नियुक्तीच संशयास्पद असताना आणि वारंवार चार दिवस ते तीन महिन्यांच्या मुदतवाढीचा नियमबाह्य बुस्टर देऊन त्यांना सेवासातत्य देण्यात आलेले असतानाही औरंगाबादच्या विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयाने शासन मान्यतेआधीच त्यांची वेतन निश्चिती केली आणि त्यांना पदस्थापनाही दिल्याची कागदपत्रे न्यूजटाऊनच्या हाती आली आहेत.

यूजीसीच्या दहाव्या पंचवार्षिक योजनेची मुदत संपायला अवघे पंधरा दिवसच शिल्लक असताना प्रा. डॉ. आर. आर. देशमुख यांची विद्यापीठाच्या संगणकशास्त्र आणि माहिती तंत्रज्ञान विभागात सहयोगी प्राध्यापकपदी (आधीचे प्रपाठकपद) नियुक्ती करण्यात आली. या योजनेची मुदत संपल्यानंतर खरे तर प्रा. डॉ. देशमुख यांची सेवा खंडित करणे अपेक्षित होते. परंतु विद्यापीठ प्रशासनाने तसे न करता राज्य सरकार या पदाचे आर्थिक दायित्व स्वीकारेल, असे गृहित धरून त्यांना वारंवार मुदतवाढ देऊन त्यांची सेवा सुरूच ठेवली. राज्या सरकारने आर्थिक दायित्व स्वीकारले नाही तर आपली सेवा अमूक तारखेला आपोआपच संपुष्टात येईल, असे इशारे देत देतच प्रा. डॉ. देशमुखांना चार दिवस, पंधरा दिवस, एक, महिना, तीन महिने अशा कालावधीच्या मुदतवाढीचे बुस्टर डोस देत त्यांना विद्यापीठाच्या सेवेत कायम ठेवण्यात आले आणि विद्यापीठ निधीतून वेतनाची अदायगी करण्यात येत राहिली.

न्यूजटाऊन एक्सक्लुझिव्हः डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्राध्यापक भरती घोटाळ्यातील एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट वाचा एका क्लिकवर, वाचण्यासाठी येथे क्लिक करा

कोणत्याही शिक्षकपदाची वेतन निश्चिती करताना उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयाकडून त्या शिक्षकाची नियुक्ती नियमानुसार झालेली आहे की नाही? नियुक्तीच्या वेळी त्या पदासाठी आवश्यक असलेली शैक्षणिक अर्हता आणि अनुभव संबंधित पदावर कार्यरत असलेला शिक्षक धारण करत होता की नाही?  संबंधित शिक्षकाची राज्य सरकारच्या कोणत्या आदेशान्वये आणि कधी नियमित करण्यात आली आणि  नेमके कसे सेवासातत्य देण्यात आले? याची पडताळणी करूनच वेतन निश्चिती करण्यात येते. प्रा. डॉ. देशमुखांची वेतन निश्चिती करताना उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयाने त्याकडेही कानाडोळा केल्याचे दिसते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विदयापीठाने ३१ ऑक्टोबर २००६ रोजी शिक्षकीय पदांच्या आकृतीबंधाचा प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर केला होता. त्या आकृतीबंधास २३ ऑक्टोबर २०१० रोजी राज्य सरकारने मान्यता दिली. ही मान्यता देताना राज्य सरकारने शिक्षकीय पदांच्या आकृतीबंधास मान्यता दिली, त्या पदावर कार्यरत असलेल्या शिक्षकांच्या नावास मान्यता दिलेली नव्हती. राज्य सरकारकडून आकृतीबंध मंजुर करण्याच्या सात महिने आधीच म्हणजे १५ मार्च २०१० रोजी प्रपाठकपदी तीन वर्षांची सेवा पूर्ण झाल्याचे गृहित धरून प्रा. डॉ. देशमुखांची वेतन निश्चिती करण्यात आली आहे. म्हणजेच राज्य सरकारने मान्यता देण्याआधीच उच्च शिक्षण सहसंचालकांनी प्रा. डॉ. देशमुखांना वेतन निश्चितीचे ‘बक्षीस’ देऊन टाकले! नियुक्तीच्या वेळी प्रा. डॉ. देशमुखांचे वेतन रू.२२,३२०+ एजीपी ८००० असे होते. या वेतन निश्चितीनंतर त्यांची वेतन श्रेणी ३७४००-६७०००+ एजीपी ९००० अशी करण्यात आली. त्यावर उच्च शिक्षण विभागाचे वरिष्ठ लेखापरीक्षक आणि उच्च शिक्षण सहसंचालकांनी शिक्कामोर्तबही केले.

शासन मान्यतेच्या आधीच म्हणजे १५ मार्च २०१० रोजी प्रा. डॉ.आर.आर. देशमुखांची वेतन निश्चिती करण्यात आली. त्यांच्या सेवा पुस्तिकेचा हा उतारा.

चला उद्योजक बनाः शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करून कर्ज/सबसिडी मिळवायची?, पण कशी? वाचा सविस्तर

प्राध्यापक संगणकशास्त्रात आणि  पीएच.डी.चे मार्गदर्शक इंजिनिअरिंग विषयातः संख्याशास्त्रात पीएच.डी.ची पदवी धारण करणारे प्रा. डॉ. आर. आर. देशमुख यांची विद्यापीठाच्या संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान विभागात सहयोगी प्राध्यापक म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर त्यांना प्रोफेसरपदी पदोन्नतीही देण्यात आली. संगणकशास्त्र आणि माहिती तंत्रज्ञान विषयाचा संख्याशास्त्राशी नेमका काय संबंध येतो? हा प्रश्न अनुत्तरीत ठेवूनच डॉ. देशमुखांना विद्यापीठाने संगणकशास्त्रात प्रोफेसरही केलेले असतानाच त्यांना अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान विषयातील पीएच.डी.चे संशोधन मार्गदर्शक म्हणूनही मान्यता देण्यात आली आहे. संख्याशास्त्रात संशोधन करून पीएच.डी. मिळवणारे प्रा. डॉ. देशमुख इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी विषयातील संशोधक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत. या विषयात त्यांच्याकडे ८ संशोधन छात्राची क्षमता आहे. आता संख्याशास्त्र आणि इंजिनिअरिंग या दोन भिन्न विषयांचा अर्थाअर्थी काय संबंध येतो? हेही एक कोडेच आहे. याचा खुलासाही विद्यापीठ प्रशासनाने करण्याची गरज आहे.

संख्याशास्त्रात पीएच.डी. प्राप्त करणारे प्रा. डॉ. आर. आर. देशमुख इंजिनिअरिंग आणि टेक्नॉलॉजी विषयात पीएच. डी. चे संशोधन मार्गदर्शक आहेत.

उच्च शिक्षण सहसंचालकांनी न्यूजटाऊनचे सवालः प्रा. डॉ. आर.आर. देशमुख यांच्या वेतन निश्चितीत औरंगाबादच्या विभागीय उच्च शिक्षण सहसंचालकांची भूमिकाही संशयास्पद आहे. शासनाचे प्रतिनिधी म्हणून नियम-कायद्याला अनुसरून पद मान्यता आणि वेतन निश्चिती देण्याची जबाबदारी असलेल्या उच्च शिक्षण सहसंचालकांना न्यूजटाऊनचे काही सवाल आहेत. ते असेः प्रा. डॉ. देशमुखांची वेतन निश्चिती करताना त्यांच्या नियुक्ती आणि शैक्षणिक अर्हतेची कागदपत्रे नीट तपासली होती का? राज्य शासनाने प्रा. डॉ. देशमुखांची वेतन निश्चिती करताना त्यांच्या पदाला मान्यता दिलेली आहे की नाही? दिली असेल तर कोणत्या शासन आदेशान्वये याची खातरजमा केली होती का? शिक्षकीय पदांच्या आकृतीबंधास जर राज्य सरकारने २३ ऑक्टोबर २०१० रोजी मान्यता दिलेली असेल तर प्रा. डॉ. देशमुखांची वेतन निश्चिती त्याआधीच म्हणजे १५ मार्च २०१० रोजी कोणत्या नियमाआधारे करण्यात आली? या वेतन निश्चितीला कायदेशीर आधार कोणता? या प्रश्नांची उत्तरे औरंगाबादच्या उच्च शिक्षण सहसंचालकांनी द्यायला हवी, असे न्यूजटाऊनचे आव्हान आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा