पुरूषोत्तम ‘अर्थ’शास्त्रः ना पदासाठी अर्ज, ना मुलाखत पत्र; तरीही देशमुखांची अधिव्याख्यातापदी नियुक्ती!

0
2011
संग्रहित छायाचित्र.
  • सुरेश पाटील/औरंगाबादः

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने विद्यापीठ निधीतून नियुक्त केलेल्या २८ तदर्थ  सहायक प्राध्यापकांना बेकायदेशीरित्या नियमित सेवेत कायम केल्याच्या प्रकरणाचा न्यूजटाऊन पर्दाफाश करत असल्यामुळे शैक्षणिक वर्तुळात खळबळ माजली असतानाच विद्यापीठाने या नियुक्त्यांच्या आधीही मोठ्या प्रमाणावर भ्रष्ट मार्गाचा अवलंब करून सहायक प्राध्यापकांच्या नियुक्त्या केल्याचे धक्कादायक पुरावे न्यूजटाऊनच्या हाती आले आहेत. अर्थशास्त्र विभागातील प्रोफेसर डॉ. पुरूषोत्तम विष्णू देशमुख यांची नियुक्ती त्याच भ्रष्ट प्रक्रियेचा अवलंब करून झाली आहे. प्रा. डॉ. देशमुख यांनी ज्या पदासाठी अर्जच केला नव्हता, त्या पदासाठी त्यांना पात्र ठरवून विद्यापीठ प्रशासाने नियुक्ती दिली आहे. विशेष म्हणजे प्रा. देशमुख यांच्या नियुक्तीवर आस्थापना विभागाने आक्षेप नोंदवल्यानंतर तत्कालीन कुलगुरूंनी त्यांच्या नियुक्तीचे निर्लज्जपणे समर्थनही केले आहे.

शिक्षण क्षेत्र हे नितीमूल्यांची चाड बाळगणारे आणि नितीमान समाज घडवणारे क्षेत्र! त्यामुळे या क्षेत्राकडून समाजाच्या मोठ्या अपेक्षा! या क्षेत्रात डॉ. नागनाथ कोतापल्लेसारखी समाजाला ज्ञान, नितीमूल्यांचे डोस पाजणारी ज्येष्ठ साहित्यिक-विचारवंत व्यक्ती जर कुलगुरूपदी असेल तर या अपेक्षा कैकपटींनी उंचावतात. परंतु त्यांच्याच कार्यकाळात सर्व कायदे, नियम, निकष धाब्यावर बसवून धडाक्यात बेकायदेशी नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागात प्रा. डॉ. पुरूषोत्तम देशमुख यांची सहायक प्राध्यापकपदी (तेव्हाचे अधिव्याख्यातापद) ज्या पद्धतीने नियुक्ती करण्यात आली, ती केवळ धक्कादायकच नव्हे तर शिक्षण क्षेत्रालाच काळीमा फासणारी आहे.

हेही वाचाः तदर्थ प्राध्यापकांच्या सुरस कथाः संगणकशास्त्राच्या धोपेश्वरकरांना ८ वेळा अवैध मुदतवाढ, आता कायम

न्यूजटाऊन इम्पॅक्टः ‘बाटु’चे नवनियुक्त कुलगुरू डॉ. कारभारी काळे राज्यपालांच्या भेटीला, चर्चा गुलदस्त्यात!

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने २००८ मध्ये सहायक प्राध्यापकांच्या रिक्तपदावरील भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली होती. या जाहिरातीत अर्थशास्त्र विभागातील एक प्रपाठक आणि तीन अधिव्याख्यातापदासाठी अर्ज मागवले होते. या तीनपैकी अधिव्याख्यात्याचे एक पद धारणाधिकाराचे (लीन) होते तर दोनपदांपैकी एक पद व्हीजेएनटीसाठी आणि एक पद खुल्या प्रवर्गासाठी होते. या जाहिरातीच्या अनुषंगनाने प्रा. डॉ. देशमुख यांनी खुल्या प्रवर्गातील अधिव्याख्यातापदासाठी अर्ज केला होता. परंतु या पदासाठी आवश्यक असलेली अर्हता प्रा. देशमुख यांच्याकडे नसल्यामुळे त्यांना या पदासाठी अपात्र ठरवण्यात आले होते.

हेही वाचाः डॉ. आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात २८ ‘तदर्थ’ प्राध्यापक अवैधरित्या बनले ‘सरकारचे जावई’!

याच जाहिरातीच्या अनुषंगाने खुल्या प्रवर्गातील अधिव्याख्याता (धारणाधिकार) पदासाठी नरेश रामकृष्ण बोडके, कैलाश धर्मा लांगडे आणि गजानन सोपना पठ्ठेबहादूर या तीन उमेदवारांनी अर्ज केले होते आणि विद्यापीठ प्रशासनाने त्यांना मुलाखतीसाठी पत्रही दिले होते. हे तिन्ही उमेदवार विद्यापीठ प्रशासनाने निर्धारित केलेल्या तारखेला मुलाखतीसाठी निवड समितीसमोर हजरही झाले होते. त्या तिन्ही उमेदवारांकडे या पदासाठी आवश्यक असलेली किमान शैक्षणिक अर्हताही होती. धारणाधिकारावरील अधिव्याख्यात्याच्या जागेसाठी प्रा. देशमुख यांनी अर्जच केलेला नव्हता.

हेही वाचाः तदर्थ प्राध्यापकांच्या सुरस कथाः नाट्यशास्त्रात अपात्र बंडगरांच्या नियुक्तीचा अवैध ‘एकपात्री प्रयोग’

या जागांच्या निवडीसाठी विद्यापीठ प्रशासनाने महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ च्या कलम ७६(२) नुसार निवड समिती स्थापन केली होती आणि १६ जून २००८ रोजी या रिक्त पदांसाठी मुलाखती घेण्यात आल्या होत्या. धक्कादायक बाब म्हणजे निवड समितीने या पदासाठी अर्जच नसलेल्या आणि अर्ज नव्हता म्हणून मुलाखतीसाठी पत्रही दिले नसलेल्या प्रा. डॉ. देशमुख यांची अधिव्याख्यातापदी (लीन व्हॅकेन्सी) निवड केली. विशेष म्हणजे या पदासाठी ‘रिजनल इकॉनॉमिक्स व इकॉनॉमेट्रिक्स’ असे स्पेशालायजेशन आवश्यक होते. तेही प्रा. देशमुख यांच्याकडे नाही. त्यांचे स्पेशालायजेशन ‘मॅथेमॅटिक इकॉनॉमिक्स’ असे आहे.

हेही वाचाः ज्या दिवशी अर्ज, त्याच दिवशी मुलाखत; अपात्र माजी कुलगुरूपुत्राची प्राध्यापकपदी बेकायदेशीर नियुक्ती!

ज्या उमेदवाराचा ज्या पदासाठी अर्जच नव्हता आणि त्याला निवड समितीसमोर मुलाखतीसाठी बोलावण्यातही आले नव्हते, त्या उमेदवाराच्या नावाची शिफारस निवड समितीने केल्याचा ‘जादूचा प्रयोग’ पाहून विद्यापीठाच्या आस्थापना विभागाचे सहायक कुलसचिव, उपकुलसचिव चक्रावले आणि त्यांनी १८ जून २००८ रोजी कुलसचिवांमार्फत तत्कालीन कुलगुरू डॉ. नागनाथ कोतापल्ले यांच्याकडे नोट पुटअप केली. त्या नोटमधील मजकूर शब्दशः असाः

‘सादर,

मा. कुलगुरूंना सादर करण्यात येते की, विद्यापीठाने जाहिरात क्र. आस्था/विभाग/४०/२००८ दि. ०४/०१/२००८ रोजी प्रसिद्ध केली होती. त्यात अर्थशास्त्र विभागातील एक प्रपाठक (अनुसूचित जाती), एक अधिव्याख्याता वि.जा. अ. (अ,ब,क,ड अंतर्गत अपरिवर्तनीय),’ एक अधिव्याख्याता खुल्या प्रवर्गासाठी, एक अधिव्याख्याता खुला (धारणाधिकार) इत्यादी रिक्त प्रवर्गाचा समावेश उपरोक्त जाहिरातीत करण्यात आला होता.

हेही वाचाः वॉक-इन-इंटरिव्ह्यूसाठी अर्जच नसलेल्या दोघांची केली सहायक प्राध्यापकपदी निवड, एक जण कायम

उपरोक्त जाहिरातीच्या अनुषंगाने एक अधिव्याख्याता खुला (धारणाधिकार) या रिक्त पदासाठी खालील तीन उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले होते.

  • श्री. बोडके नरेश रामकृष्ण
  • श्री. लांडगे कैलाश धर्मा
  • श्री. पठ्ठेबहादूर गजानन सोपान

महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ कलम ७६(२) नुसार गठित करण्यात आलेल्या निवड समितीने दि. १६/०६/२००८ च्या बैठकीत श्री. देशमुख पुरूषोत्तम विष्णू यांच्या नावाची शिफारस केली आहे.

याबाबत असे सादर करण्यात येते की, एक अधिव्याख्याता खुला (धारणाधिकार) या रिक्त पदासाठी उपरोक्त तीन उमेदवारांचे अर्ज प्राप्त झालेले होते. व त्यांना मुलाखत पत्र देण्यात येऊन संबंधित तीन उमेदवार मुलाखतीसाठी हजर होते.

श्री. देशमुख पुरूषोत्तम विष्णू यांनी अधिव्याख्याता खुल्या प्रवर्गासाठी अर्ज केलेला होता. तसेच त्यांनी अधिव्याख्याता खुला (धारणाधिकार) या पदासाठी अर्ज केलेला नव्हता.

सबब, निवड समितीने श्री. देशमुख पुरूषोत्तम विष्णू यांच्या नावाची शिफारस केलेली असल्यामुळे त्यांना अधिव्याख्याता खुला ( धारणाधिकार) या रिक्त पदावर कार्यालयीन आदेश देण्यात यावे किंवा कसे? आदेशास्तव सादर’

मानवी चूक म्हणून निवड समितीने प्रा. देशमुख यांची नजर चुकीने निवड केलेली असावी, असे आपण काही क्षणांसाठी समजू. पण ही बाब स्पष्टपणे निदर्शनास आणून देण्यात आल्यानंतर त्या नजर चुकीची दुरूस्ती करण्यासाठी वाव होता. परंतु कोणतेही नियम, कायदे, निकष आणि प्रक्रिया यांचे पालन करायचेच नाही आणि आपणाला हव्या असलेल्या व्यक्तीचीच त्या पदावर वर्णी लावायचीच असे ठरवूनच टाकलेले असेल तर मात्र या चुकीची दुरूस्ती करण्याची अपेक्षाच न केलेली बरी. तत्कालीन कुलगुरू डॉ. नागनाथ कोतापल्ले यांनीही तेच केले.

हेही वाचाः विद्यापीठातील घोटाळाः महालेखाकारांनी २०१४ मध्येच घेतला त्या २८ ‘सरकारी जावयां’वर आक्षेप

आस्थापना विभागाची नोट पुटअप झाल्यानंतर प्रा. डॉ. नागनाथ कोतापल्ले यांनी या नोटवर मारलेला शेरा कुलगुरू म्हणून त्यांनी केलेल्या भ्रष्ट आचरणाचा ढळढळीत पुरावाच आहे. त्यांनी या नोटवर मारलेला शेरा आणि दिलेले आदेश त्यांच्याच शब्दांत ते असेः ‘उपरोक्त तिन्ही उमेदवारांचा परफॉर्मनन्स चांगला नव्हता. त्यासाठी समितीने त्यांना नाकारले आहे. म्हणून श्री देशमुख यांना नेमणूक देण्यात यावी.’

परफॉर्मनन्स चांगला नसल्यामुळे उमेदवारांना नाकारणे हा निवड समितीचा कायदेशीर अधिकार आहेच. अशा स्थितीत कुलगुरू या पदासाठी पुन्हा जाहिरात करून अर्ज मागवण्याचे आदेश देऊ शकले असते. परंतु त्यांनी तसे न करता या पदासाठी अर्जच केला नसलेल्या, मुलाखतही दिली नसलेल्या देशमुखांच्या नियुक्तीचे आदेश देऊन आपली नितीमत्ता किती उच्च कोटीची आहे, हेच दाखवून दिले आहे.

हेही वाचाः शासन आदेशाचा चुकीचा ‘अर्थ’ लावून ‘पूर्ण’ केली २८ तदर्थ प्राध्यापकांची एचटीई ई- सेवार्थ प्रणाली!

प्रक्रिया काय सांगते?: कोणत्याही उमेदवाराला जाहिरातीतील एकापेक्षा जास्त पदासाठी अर्ज करण्याचा अधिकार आहे. मात्र तसे करताना त्याला त्या त्या पदांसाठी स्वतंत्र अर्ज सादर करावा लागतो आणि त्या पदाच्या अर्जासाठी निर्धारित केलेले शुल्कही भरावे लागते. ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर विद्यापीठाची छाणनी समिती अर्जाची छाणनी करते आणि किमान निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवाराला मुलाखतीसाठी पाचारण करते. अर्थशास्त्र विभागातील अधिव्याख्याता खुला (धारणाधिकार) या पदासाठी प्रा. डॉ. देशमुख यांनी या पैकी कोणतीही प्रक्रिया पूर्ण केलेली नव्हती. तरीही त्यांना नेमणूक देण्याचे आदेश तत्कालीन कुलगुरूंनी दिले. ते पूर्णतः बेकायदेशीर आहेत.

हेही वाचाः ‘बॅक डोअर एंट्री’बाबत सुप्रीम कोर्टाचेही निर्देश धुडकावून २८ तदर्थ प्राध्यापकांना केले ‘धन’वान!

प्रा. डॉ. पुरूषोत्तम देशमुख यांच्या बेकायदेशीर निवडीबाबत आस्थापना विभागाने पुटअप केलेली नोट आणि त्यावर कुलगुरूंनी शेरा मारून दिलेले आदेश.

हेही वाचाः ते २८ प्राध्यापक तदर्थ आहेत हे विद्यापीठाने लपवले, सहसंचालकांनी खपवले आणि संचालकांनी पचवले!

चला उद्योजक बनाः शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करून कर्ज/सबसिडी मिळवायची?, पण कशी? वाचा सविस्तर

 अमान्य केलेले वेतन पुन्हा सुरू कसे झाले?: प्रा. डॉ. पुरूषोत्तम देशमुख यांची अर्थशास्त्र विभागातील अधिव्याख्यातापदी झालेली नियुक्ती बेकायदेशीर आहे, ही बाब उच्च शिक्षण संचालकांच्या निदर्शास आल्यानंतर त्यांनी २२ ऑगस्ट २०१४ रोजी औरंगाबादच्या उच्च शिक्षण सहसंचालकांना पत्र लिहून प्रा. देशमुख यांचे वेतन अमान्य करण्यात आल्याचे कळवले होते आणि त्याबाबत कारवाई करून सात दिवसांच्या आत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. उच्च शिक्षण संचलकांच्या पत्रातील मजकूर असाः ‘डॉ. पुरूषोत्तम देशमुख यांनी नियमित पदावरील पदासाठी अर्ज केला होता. तसेच त्यांची शैक्षणिक अर्हता नियमित पदावरील जागेसाठी होती. परंतु त्यांची नियुक्ती धारणाधिकार (खुला) संवर्गातील पदावर करण्यात आलेली आहे. वास्तविक पाहता त्यांनी उक्त पदासाठी आवेदनपत्र सादर करणे आवश्यक होते. परंतु संबंधित उमेदवारांनी ज्या पदासाठी अर्ज केला नाही, त्या पदासाठी त्यांची निवड केलेली असणे हे नियमानुसार नाही. तसेच लीनपदावरील पदासाठी लागणारी अर्हता ते धारण करीत नसल्याचे दिसून येते. त्यामुळे संबंधितांचे वेतन अमान्य करण्यात येत आहे.’ उच्च शिक्षण संचालकांच्या या आदेशानंतर औरंगाबाद उच्च शिक्षण सहसंचालकांनी प्रा. देशमुख यांचे वेतन बंद केले. परंतु राजकीय दबाव वापरून ते पुन्हा सुरू करण्यात तर आलेच शिवाय २०१४ मध्ये त्यांना सहयोगी प्राध्यापक म्हणून विद्यापीठाच्या सेवेत नियमितही करण्यात आले आणि २०१७ मध्ये त्यांना प्रोफेसरपदी पदोन्नतीही देण्यात आली, असे विद्यापीठाचा डेटाबेस सांगतो.

न्यूजटाऊनच्या बातम्यांंबद्दल आपल्या प्रतिक्रिया आवश्य कळवाः व्हॉट्सअप क्रमांक: 9823427325 किंवा ईमेलः m.newstown@gmail.com

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा