कुलगुरू साहेब, त्या नावाची कुणीच प्राध्यापक नाही; कुणाची बदली करू?, व्यवस्थापनशास्त्रातही गडबड

0
929
संग्रहित छायाचित्र.
  • सुरेश पाटील/औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने विद्यापीठ निधीतून नवीन विभागाची निर्मिती करताना आणि त्या विभागात सहायक प्राध्यापकांच्या तदर्थ स्वरुपात नियुक्त करताना ठराविक उमेदवारांना विद्यापीठाच्या सेवेत सामावून घेण्यासाठी जाणीवपूर्वक बेकायदेशीर कृती केल्याचे निरीक्षण डॉ. दि.मा. मोरे यांच्या अध्यक्षतेखालील त्रिसदस्यी चौकशी समितीने नोंदवले आहे. विद्यापीठ प्रशासनाने अशा ठराविक उमेदवारांच्या वॉक-इन- इंटरिव्ह्यूद्वारे झटपट नियुक्त्या केल्या आणि अवघ्या साडेचार महिन्यातच त्यांना सोयीच्या ठिकाणी बदल्याही दिल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. तत्कालीन कुलगुरू डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांच्या डोक्यात अशा ठराविक उमेदवारांची एवढी गर्दी झाली होती की, नियुक्ती कोणाची केली आणि बदलीचे आदेश आपण कोणाचे देत आहोत, याचे भानही त्यांना राहिलेले दिसत नाही. व्यवस्थापनशास्त्र विभागात सोनाली क्षीरसागर यांची केलेली नियुक्ती त्याचीच साक्ष देणारी आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने मास्टर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन (एमबीए) या अभ्यासक्रमासाठी विद्यापीठ निधीतून पाच वर्षाच्या कालावधीसाठी सहायक प्राध्यापकांच्या तात्पुरत्या स्वरुपात नियुक्त्यांसाठी वॉक-इन-इंटरिव्ह्यूची जाहिरात प्रसिद्ध केली. या जाहिरातीनुसार २४ सप्टेंबर २००९ रोजी थेट मुलाखती घेण्यात आल्या. या मुलाखतींद्वारे प्रमोद निकम (एसटी), सोनाली क्षीरसागर (ओबीसी), सुयोग अरूणराव अमृतराव (एनटी) आणि राम कलानी (खुला संवर्ग) यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. या नियुक्त्यांच्या मंजुरीसाठीची नोट ५ ऑक्टोबर २००९ रोजी आस्थापना विभागाने तत्कालीन कुलगुरू डॉ. नागनाथ कोत्तापले यांच्याकडे पाठवली. या नोटमध्ये या चारपैकी सोनाली क्षीरसागर आणि सुयोग अमृतराव यांच्या नियुक्त्या विद्यापीठाच्या उस्मानाबाद कॅम्पससाठी असल्याचे स्वतः कुलगुरूंनीच त्यांच्या नावापुढे लिहिले आणि प्रत्येकाच्या नियुक्ती आदेशात त्यांच्या सेवा स्थानांतरणीय (ट्रान्सफरेबल) असल्याचा शेरा मारून स्वाक्षरी केली. त्यानंतर नियुक्ती आदेश मिळाल्यावर क्षीरसागर व अमृतराव विद्यापीठाच्या उस्मानाबाद कॅम्पसमध्ये रूजूही झाले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील २८ तदर्थ सहायक प्राध्यापक आणि अन्य भरतीतील घोटाळ्याचे न्यूजटाऊनचे एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट्स एकत्र वाचण्यासाठी येथे क्लिक करा

एमबीए कोर्ससाठी नियुक्ती केलेल्या तदर्थ सहायक प्राध्यापक सोनाली क्षीरसागर यांच्या नियुक्तीची नोट.

विद्यापीठ प्रशासनाने त्यानंतर व्यवस्थापनशास्त्र विभागातील खुल्या संवर्गातील एका जागेसाठी पुन्हा वॉक-इन- इंटरिव्ह्यूची जाहिरात प्रसिद्ध केली आणि या जागेसाठी १५ फेब्रुवारी २०१० रोजी थेट मुलाखत घेतली. या मुलाखतीद्वारे वरूणराज चंद्रशेखर कळसे (एसटी संवर्ग) यांची पाच वर्षे कालावधीसाठी विद्यापीठ निधीतून सहायक प्राध्यापकपदी नियुक्ती करण्यात आली. विशेष म्हणजे या जाहिरातीत हे पद विद्यापीठाच्या व्यवस्थापनशास्त्र विभागात भरण्यात येत असल्याचे स्पष्टपणे नमूद केले होते. आधीच्या जाहिरातीत एमबीए अभ्यासक्रमासाठी शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्यात येत असल्याचे नमूद करण्यात आले होते.

आस्थापना विभागाने कळसे यांच्या नियुक्तीची नोट मंजुरीसाठी २३ फेब्रुवारी २०१० रोजी मंजुरीसाठी कुलगुरूंकडे पुटअप केली. या नोटवरच तत्कालीन कुलगुरू डॉ. नागनाथ कोत्तापल्ले नियुक्ती आदेशावर सेवा स्थानांतरणीय असल्याचे नमूद करण्याचे आदेश देतात. शिवाय कळसे यांची नियुक्ती उस्मानाबादसाठी करण्यात आली आहे आणि श्रीमती वाघमारे यंची बदली औरंगाबादमध्ये करण्यात आली आहे, असा शेरा मारून स्वाक्षरी करतात.

व्यवस्थापन शास्त्र विभागातील वरूणराज कळसे यांच्या नियुक्तीला मंजुरी देण्याच्या आदेशावरच कुलगुरू कोत्तापले यांनी ‘वाघमारे’ यांच्या बदलीचे आदेश दिले.

कुलगुरूंचा हा शेरा वाचून आस्थापना विभाग चक्रावून जातो. ज्या आडनावाचा सहायक प्राध्यापक विद्यापीठाच्या उस्मानाबाद कॅम्पसमध्ये सेवेतच नाही, तर कुलगुरूंच्या आदेशानुसार औरंगाबादला नेमकी बदली कुणाची करायची? असा प्रश्न आस्थापना विभागाला पडतो आणि हा विभाग कुलगुरूंकडे पुन्हा नोट पुटअप करतो… ती नोट शब्दशः अशीः

‘पुन्हा सादर

कृपया शेऱ्याचे अवलोकन व्हावे. श्री. कळसे यांची उस्मानाबाद उपकेंद्र कॅम्पससाठी नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि श्रीमती वाघमारे यांची बदली औरंगाबाद कॅम्पससाठी करण्यात आली आहे.

सर, हे निदर्शनास आणून देऊ इच्छितो की उस्मानाबाद उपकेंद्रातील व्यवस्थापनशास्त्र विभागात खालील अध्यापक कार्यरत आहे.

  • श्रीमती क्षीरसागर सोनाली रमेश, अधिव्याख्याता.
  • श्री. सुयोग अरूणराव अमृतराव, अधिव्याख्याता.

श्रीमती वाघमारे नावाची कुणीही व्यक्ती तेथे नाही. त्यामुळे पुनर्आदेशासाठी सादर…  त्यावर ‘ कृपया वाघमारेऐवजी श्रीमती क्षीरसागर वाचावे, असा शेरा तत्कालीन कुलगुरू मारतात आणि स्वाक्षरी करतात.

सोनाली क्षीरसागर विद्यापीठाच्या उस्मानाबाद उपकेंद्रात रूजू झाल्या २३ ऑक्टोबर २०१० रोजी आणि कुलगुरूंनी अन्य एका उमेदवाराच्या नियुक्तीच्या मंजुरी आदेशावरच त्यांची बदली करण्याचाही आदेश दिला अवघ्या पाचच महिन्यांच्या आत! त्या औरंगाबाद कॅम्पसमध्ये रूजू झाल्या १७ मार्च २०१० रोजी. विद्यापीठाच्या सेवेतच सहायक प्राध्यापक म्हणून कार्यरत असताना त्यांनी २०१४ मध्ये पीएच.डी. पूर्ण केली आहे.

कुलगुरू यांनी ज्या वाघमारे यांच्या बदलीचे आदेश दिले, त्या वाघमारे विद्यापीठाच्या सेवेतच नसल्याचे आस्थापना विभागाने त्यांच्या लक्षात आणून दिले.

विद्यापीठात सहायक प्राध्यापक किंवा अन्य कर्मचाऱ्यांच्या बदलीचीही एक प्रक्रिया असते. संबंधितांनी काही विशिष्ट कारणे देत बदलीसाठी विद्यापीठ प्रशासनाकडे अर्ज करावा लागतो आणि त्यावर पुढील प्रक्रिया केली जाते. सोनाली क्षीरसागर यांच्या बदलीच्या बाबतीत तसे झाले नाही. त्यांचा अर्ज नसतानाही तत्कालीन कुलगुरू स्वतःच त्यांची बदली उस्मानाबादहून औरंगाबाद कॅम्पसमध्ये करण्यात आल्याचे आदेश जारी करतात. आपण कोणत्या कॅम्पमध्ये कोणाकोणाची वर्णी लावली हेही नीट लक्षात राहिले नसल्यामुळे ते क्षीरसागर यांच्याऐवजी वाघमारे असे लिहितात. परंतु कुलगुरूंना एवढी घाई कशामुळे झाली असावी?, असे प्रश्न आस्थापना विभागाने पुटअप केलेल्या नोट आणि त्यावर त्यांनी मारलेले शेरे वाचून पडतात.

क्षीरसागर यांची नियुक्ती कंत्राटी तत्वावर पाच वर्षे कालावधीसाठी असली तरी नियुक्तीनंतर विद्यापीठाच्या सेवेत किमान काही महिन्यांचा तरी परीवीक्षा कालावधी निश्चितच असला पाहिजे आणि परीवीक्षा कालावधीत कोणत्याही कर्मचाऱ्याला बदली मागता येणार नाही किंवा करता येणार नाही, अशीही तरतूद विद्यापीठाचे नियम आणि परिनियमात असलीच पाहिजे. तरीही तत्कालीन कुलगुरूंनी खास मेहरबानी दाखवत अवघ्या पाच महिन्यांच्या आतच बदलीचे आदेश जारी केल्याने डॉ. दि.मा. मोरे समितीने नोंदवलेल्या निरीक्षणाला पुष्ठी मिळते.  

चला उद्योजक बनाः शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करून कर्ज/सबसिडी मिळवायची?, पण कशी? वाचा सविस्तर

डॉ. दि. मा. मोरे त्रिसदस्यी समितीची महत्वाची निरीक्षणेः विद्यापीठाने केलेल्या शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या भरतीवर राज्य सरकारने नियुक्त केलेल्या चौकशी समित्यांनी कठोर ताशेरे ओढले आहेत. तरीही विद्यापीठाने नियम, निकष, कायद्यांची मोडतोड करून नियुक्त्यांचे घोटाळे सुरूच ठेवले आहेत. डॉ. दि.मा. मोरे त्रिसदस्यी चौकशी समितीची ही महत्वाची निरीक्षणेही तेच अधोरेखित करतात. ‘दोन वेगवेगळ्या जाहिरातींमध्ये एकाच/ समान नावाच्या पदासाठी वेगवेगळी अर्हता नमूद केल्याचे दिसून येते. सदरची बाब अपात्र उमेदवारांना सेवेत घेण्याकरिता केली असल्याचे दिसून येते. भरतीमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार व विसंगती आढळून येते. काही ठराविक उमेदवारांना विद्यापीठात सामावून घेण्यासाठी जाणीवपूर्वक सदरची नियमबाह्य कृती करण्यात आली आहे. अपात्र उमेदवारांना संधी दिल्यामुळे पात्र उमेदवारांची संधी हिरावून घेऊन त्यांच्यावर अन्याय झालेला आहे. त्यामुळे शासनाच्या तिजोरीवर नाहक जादा आर्थिक भार/ भूर्दंड पडला आहे, असे निरीक्षण मोरे समितीने नोंदवले आहे. २८ तदर्थ सहायक प्राध्यापकांचा समावेश एचटीई- सेवार्थ प्रणाली करून त्यांच्या सेवा कायम करतानाही विद्यापीठ प्रशासनाने हेच केले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा