जातीची हेराफेरी भोवलीः विवेकानंद कॉलेजचे प्रा. नागनाथ तोटावाड यांची अध्यापक मान्यता रद्द!

1
3778
संग्रहित छायाचित्र.

औरंगाबादः एसटी प्रवर्गातून सेट परीक्षा उत्तीर्ण झालेले असतानाही ओबीसी प्रवर्गातून इंग्रजी विषयातील अध्यापकाची नोकरी मिळवून अनेक वर्षे राज्य सरकारला गंडा घालणारे विवेकानंद कला व सरदार दलिपसिंग वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. नागनाथ तोटावाड यांना दिलेली अध्यापक मान्यता डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने अखेर रद्द केली आहे. विद्यापीठ प्रशासनाच्या या निर्णयामुळे जातीमध्ये हेराफेरी करून फसवणूक करणाऱ्या प्राध्यापकांचे धाबे दणाणले आहे. न्यूजटाऊनने या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा केला होता. अशाच प्रकारची  फसवाफसवी करून खुलताबादच्या चिश्तिया महाविद्यालयातील तब्बल ११ प्राध्यापक गेली कित्येक वर्षे वेतन व अन्य लाभ लाटत आहेत, आता त्यांचा नंबर कधी लागणार? याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे.

औरंगाबादच्या विवेकानंद कला आणि सरदार दलिपसिंग वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात कार्यरत असलेले प्रा. डॉ. नागनाथ रामराव तोटावाड हे २९ सप्टेंबर २००३ रोजी एसटी प्रवर्गातून इंग्रजी विषयातील सेट परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यांचा सेट परीक्षेचा आसन क्रमांक ०२८०४ असून पुणे विद्यापीठाच्या सेट परीक्षेच्या वेबसाईटवर हा डेटा उपलब्ध आहे.

हेही वाचाः फसवाफसवीः सेट परीक्षा उत्तीर्ण एसटी प्रवर्गातून, प्राध्यापकाची नोकरी मिळवली ओबीसी प्रवर्गातून

२००५ मध्ये औरंगाबादच्या विवेकानंद कला आणि सरदार दलिपसिंग वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात निघालेल्या नोकर भरतीच्या जाहिरातीसाठी नागनाथ तोटावाड यांनी ओबीसी प्रवर्गासाठी राखीव असलेल्या इंग्रजी विषयाच्या अधिव्याख्यातापदासाठी (सध्याचे सहायक प्राध्यापक पद) अर्ज केला. त्यांची दिनांक २९ ऑगस्ट २००५ रोजी पूर्णवेळ अधिव्याख्याता म्हणून नियुक्ती झाली आणि त्यांच्या नियुक्तीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने दिनांक ३ ऑक्टोबर २००५ रोजी मान्यताही दिली. त्यानंतर प्रा. डॉ. नागनाथ तोटावाड यांना ६ ऑगस्ट २०१२ रोजी सीएएस अंतर्गत सहायक प्राध्यापक पदासाठी मंजुरीही देण्यात आली.

हेही वाचाः फसवाफसवीः प्रा. नागनाथ तोटावाड यांची नियुक्ती धोक्यात, विद्यापीठाने मागवला तातडीने अहवाल

विशेष बाब म्हणजे प्रा. डॉ. नागनाथ तोटावाड यांनी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण होऊन पुणे विद्यापीठाची सेट परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर नांदेडच्या उपजिल्हाधिकारी आणि विशेष भूसंपादन अधिकारी कार्यालयातून २५ ऑगस्ट २००४ रोजी इतर मागास प्रवर्गात असलेल्या कुलेकडगी जातीचे प्रमाणपत्र प्राप्त केले. विवेकानंद कला आणि सरदार दलिपसिंग वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील नोकरीसाठी प्रा. डॉ. नागनाथ तोटावाड यांनी ओबीसी प्रवर्गातील राखीव जागेसाठी नियुक्ती मिळवल्यामुळे महाविद्यालयाने त्यांच्या जातप्रमाणपत्र पडताळणीचा प्रस्ताव २० फेब्रुवारी २००६ रोजी औरंगाबाद विभागाच्या जातप्रमाणपत्र पडताळणी समितीकडे पाठवला. जातप्रमाणपत्र पडताळणी समितीने २५ जुलै २००६ रोजी प्रा. नागनाथ तोटावाड यांचा कुलेकडगी (इतर मागास वर्ग) जातीचा दावा वैध ठरवला आणि आणि त्यांना जातप्रमाणपत्र वैधता प्रमाणपत्र बहाल केले. त्या प्रमाणपत्राच्या आधारेच प्रा. डॉ. तोटावाड गेली १६ वर्षे विवेकानंद महाविद्यालयात नोकरी करत होते.

हेही वाचाः पुणे विद्यापीठानेही उघड केली प्रा. तोटावाड यांची बनवाबनवी, एसटीचे जातप्रमाणपत्र आणले समोर

तक्रारीनंतर पर्दाफाशः प्रा. डॉ. नागनाथ तोटावाड हे एसटी प्रवर्गातून सेट परीक्षा उत्तीर्ण झालेले असताना त्यांना ओबीसी प्रवर्गातून प्राध्यापकपदी नियुक्ती देण्यात आलीच कशी? असा आक्षेप घेत रिपाइंचे मराठवाडा युवक अध्यक्ष नागराज गायकवाड यांनी तक्रार केल्यानंतर ‘न्यूजटाऊन’ने प्रा. डॉ. नागनाथ तोटावाड यांच्याशी संपर्क साधला असता आपण खुल्या प्रवर्गातूनत सेट परीक्षा उत्तीर्ण केली असून आपल्या जातीचा नंतर ओबीसी प्रवर्गात समावेश झाल्याचा दावा केला होता. आपले सगळे क्लिअर असून आपल्यावर कोणतीही कारवाई होऊ शकत नाही, असेही प्रा. तोटावाड यांनी छातीठोकपणे सांगितले होते. मात्र प्रा. पुणे विद्यापीठाच्या सेट परीक्षा विभागाच्या सहायक कुलसचिवांनी २ डिसेंबर २०२१ रोजी विवेकानंद महाविद्यालयाच्या प्राचार्यांना लिहिलेल्या पत्रामुळे प्रा. डॉ. नागनाथ तोटावाड यांचा दावा खोटा असल्याचेच स्पष्ट झाले होते.

हेही वाचाः फसवाफसवीचे कोण कोण भागीदार?: प्रा. तोटावाड यांना उच्च शिक्षण सहसंचालक, विद्यापीठाचे अभय?

नोव्हेंबर २०२१ पासून विद्यापीठ प्रशासनाने प्रा. नागनाथ तोटावाड प्रकरणात बराच कथ्थ्याकूट केला. त्यांना वारंवार संधी देण्यात आली. अखेर २९ एप्रिल २०२२ रोजी म्हणजेच तब्बल सहा महिन्यांनंतर विद्यापीठ प्रशासनाने प्रा. डॉ. नागनाथ तोटावाड यांना अध्यापक म्हणून दिलेली मान्यता रद्द केली आहे. एकाच व्यक्तीने दोन जातप्रवर्गाचा लाभ घेऊन राज्य सरकार व विद्यापीठास खोटी व असत्य माहिती सादर केल्यामुळे विद्यापीठाने इंग्रजी विषयाचे अध्यापक म्हणून १३ ऑक्टोबर २००५ रोजी दिलेली अध्यापक मान्यता आणि त्यानंतर कॅस अंतर्गत वेळोवेळी देण्यात आलेली पदोन्नती रद्द करण्यात आल्याचे पत्र विद्यापीठाने २९ एप्रिल रोजी जारी केले आहे.

हेही वाचाः न्यूजटाऊन इफेक्टः प्रा. नागनाथ तोटावाड यांचे सेट प्रमाणपत्र रद्द कराः ‘बामु’चे पुणे विद्यापीठाला पत्र

उचलेले वेतन, अन्य लाभाचे काय?: प्रा. डॉ. नागनाथ तोटावाड यांनी राज्य सरकार आणि विद्यापीठ प्रशासनाला खोटी कागदपत्रे/माहिती देऊन फसवणूक केली आणि गेली तब्बल १६ वर्षे वेतन व अन्य लाभ बिनदिक्कतपणे लाटले आहेत. आता त्यांना अध्यापक म्हणून देण्यात आलेली मान्यता रद्द करण्यात आल्यामुळे औरंगाबाद विभागाचे उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. रणजित निंबाळकर डॉ. तोटावाड यांनी उचलेले वेतन आणि लाटलेले लाभ याची वसुली करणार का? हा खरा प्रश्न आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने प्रा. डॉ. नागनाथ तोटावाड यांची मान्यता २९ एप्रिल २०२२ रोजी रद्द केली. ते पत्र.

हेही वाचाः प्रा. नागनाथ तोटावाड प्रकरणी सगळेच गोलमाल: एकच व्यक्ती दोन संवर्गाचे लाभ कशी लाटते?

चिश्तिया महाविद्यालयातील ‘त्या’ ११ जणांचा नंबर कधी?: प्रा. डॉ. नागनाथ तोटावाड प्रकरणात विद्यापीठ प्रशासनाने सहा महिन्यांनंतर का होईना, कारवाई केली खरी, परंतु याहीपेक्षा गंभीर प्रकरण खुलताबादच्या चिश्तिया महाविद्यालयातील ११ प्राध्यापकांचे आहे. तोटावाड यांच्याकडे किमान सहायक प्राध्यापक होण्यासाठी अनिवार्य असलेली अर्हता तरी होती, परंतु चिश्तिया महाविद्यालयात नियुक्त करण्यात आलेले तब्बल ११ प्राध्यापक किमान शैक्षणिक अर्हताही धारण करत नाहीत. त्यांच्या नियुक्त्यांच्या वेळी विहित कार्यपद्धतीचा अवलंब करण्यात आलेला नाही. राज्य सरकारचे आरक्षणाचे धोरणही पायदळी तुडवण्यात आले आहे. चिश्तिया महाविद्यालयातील या अत्यंत गंभीर प्रकरणाकडे विद्यापीठ प्रशासन मात्र फारशा गांभीर्याने पहायला तयार नाही. या महाविद्यालयातील फसवाफसवीची चौकशी करून तत्काळ अहवाल सादर करण्यासाठी फेब्रुवारी महिन्यात नेमलेल्या चौकशी समितीने अद्यापही कामच सुरू केलेले नाही. त्यातच विद्यापीठातील काही अधिकाऱ्यांना ‘मानवतावादी दृष्टिकोना’चे उमाळेही फुटू लागले आहेत. त्यामुळे चिश्तिया महाविद्यालयातील बोगस प्राध्यापकांना अभय मिळू लागले आहे. आता प्रा. डॉ. नागनाथ तोटावाड प्रकरणी विद्यापीठ प्रशासनाने केलेल्या कारवाईमुळे चिश्तियातील ११ बोगस प्राध्यापकांवर कारवाई कधी होणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

एक प्रतिक्रिया

  1. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद अंतर्गत महाविद्यालयात असे अनेक जातीची हेराफेरी प्रकरण आहेत….

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा