फसवाफसवीः प्रा. नागनाथ तोटावाड यांची नियुक्ती धोक्यात, विद्यापीठाने मागवला तातडीने अहवाल

0
308
संग्रहित छायाचित्र.

औरंगाबादः एसटी प्रवर्गातून सेट परीक्षा उत्तीर्ण झालेल्या आणि ओबीसी प्रवर्गातून प्राध्यापकाची नोकरी मिळवून गेली तब्बल १६ वर्षे मेवा लाटणारे औरंगाबादच्या विवेकानंद कला आणि सरदार दलिपसिंग वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील इंग्रजी विषयाचे प्राध्यापक डॉ. नागनाथ तोटावाड यांच्या नियुक्तीबाबतचा वस्तुस्थितीदर्शक अहवाल तीन दिवसांच्या आत सादर करण्याचे निर्देश डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने महाविद्यालयाच्या प्राचार्यांना दिले आहेत. न्यूजटाऊनने या प्रकरणावर प्रकाश टाकला होता.

औरंगाबादच्या विवेकानंद कला आणि सरदार दलिपसिंग वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात कार्यरत असलेले प्रा. डॉ. नागनाथ रामराव तोटावाड हे २९ सप्टेंबर २००३ रोजी एसटी प्रवर्गातून इंग्रजी विषयातील सेट परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यांचा सेट परीक्षेचा आसन क्रमांक ०२८०४ असून पुणे विद्यापीठाच्या सेट परीक्षेच्या वेबसाईटवर हा डेटा उपलब्ध आहे.

चला उद्योजक बनाः राज्यात औद्योगिकदृष्ट्या अविकसित, विकसनशील भागांसाठी पीएसआय योजना, कसा घ्यायचा लाभ?

२००५ मध्ये औरंगाबादच्या विवेकानंद कला आणि सरदार दलिपसिंग वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात निघालेल्या नोकर भरतीच्या जाहिरातीसाठी नागनाथ तोटावाड यांनी ओबीसी प्रवर्गासाठी राखीव असलेल्या इंग्रजी विषयाच्या अधिव्याख्यातापदासाठी (सध्याचे सहायक प्राध्यापक पद) अर्ज केला. त्यांची दिनांक २९ ऑगस्ट २००५ रोजी पूर्णवेळ अधिव्याख्याता म्हणून नियुक्ती झाली आणि त्यांच्या नियुक्तीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने दिनांक ३ ऑक्टोबर २००५ रोजी मान्यताही दिली. त्यानंतर प्रा. डॉ. नागनाथ तोटावाड यांना ६ ऑगस्ट २०१२ रोजी सीएएस अंतर्गत सहायक प्राध्यापक पदासाठी मंजुरीही देण्यात आली.

विशेष बाब म्हणजे प्रा. डॉ. नागनाथ तोटावाड यांनी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण होऊन पुणे विद्यापीठाची सेट परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर नांदेडच्या उपजिल्हाधिकारी आणि विशेष भूसंपादन अधिकारी कार्यालयातून २५ ऑगस्ट २००४ रोजी इतर मागास प्रवर्गात असलेल्या कुलेकडगी जातीचे प्रमाणपत्र प्राप्त केले. विवेकानंद कला आणि सरदार दलिपसिंग वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील नोकरीसाठी प्रा. डॉ. नागनाथ तोटावाड यांनी ओबीसी प्रवर्गातील राखीव जागेसाठी नियुक्ती मिळवल्यामुळे महाविद्यालयाने त्यांच्या जातप्रमाणपत्र पडताळणीचा प्रस्ताव २० फेब्रुवारी २००६ रोजी औरंगाबाद विभागाच्या जातप्रमाणपत्र पडताळणी समितीकडे पाठवला. जातप्रमाणपत्र पडताळणी समितीने २५ जुलै २००६ रोजी प्रा. नागनाथ तोटावाड यांचा कुलेकडगी (इतर मागास वर्ग) जातीचा दावा वैध ठरवला आणि आणि त्यांना जातप्रमाणपत्र वैधता प्रमाणपत्र बहाल केले. एसटी प्रवर्गातून सेट उत्तीर्ण झालेला उमेदवार ओबीसी प्रवर्गातून प्राध्यापकाची नोकरी मिळवण्यास पात्र कसा ठरतो? यामागे नेमके काय गौडबंगाल आहे?, असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाले आहेत.

प्रा. डॉ. नागनाथ तोटावाड यांनी सेट परीक्षेचा फॉर्म भरताना अनुसूचित जमातीचा (एसटी) असल्याचे खोटे दस्तावेज सादर करून परीक्षा दिली आणि ते ही परीक्षा उत्तीर्णही झाले. परंतु ते कुलेकडगी या जातीचे असून इतर मागास वर्गाचे (ओबीसी) आहेत. त्यांनी खोटी माहिती भरून शासनाची व पुणे विद्यापीठाची दिशाभूल करून सेट परीक्षा उत्तीर्ण केली असून त्यांच्यावर भादंविच्या ४२० कलमानुसार गुन्हा दाखल करून त्यांचे सेट परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र रद्द करण्यात यावे, अशी मागणी रिपाइंच्या युवक आघाडीचे मराठवाडा प्रदेशाध्यक्ष नागराज गायकवाड यांनी पुणे विद्यापीठाच्या कुलसचिवांकडे केली होती. आता विद्यापीठ प्रशासन प्रा. डॉ. नागनाथ तोटावाड यांच्याविरुद्ध काय करते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा