‘चिश्तिया’तील जमालेंच्या नियुक्तीचा ‘इतिहास’ही काळवंडलेलाच, दिशाभूल करून लाटले वेतन लाभ

0
357
संग्रहित छायाचित्र.

औरंगाबादः उर्दू एज्युकेशन सोसायटीमार्फत खुलताबाद येथे चालवण्यात येणाऱ्या चिश्तिया महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या नियुक्त्यांत मोठ्या प्रमाणावर अनियमितता आणि नियमांचे उल्लंघन करण्यात आले आहे. या महाविद्यालयातील दहा प्राध्यापकांच्या नियुक्त्यांत अनियमितता असल्याचे स्वतः संस्थेनेचे दिलेल्या अहवालात कबूल केले असल्याचा पर्दाफाश न्यूजटाऊनने केल्यामुळे शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली असतानाच याच महाविद्यालयातील इतिहास विषयाचे प्राध्यापक डॉ. हरी नारायण जमाले यांच्या नियुक्तीही नियमबाह्य असल्याचे आणि त्यांनी नियुक्तीपासून सरकारची दिशाभूल करून लाखो रुपयांचे वेतन खिशात घातल्याची माहिती न्यूजटाऊनच्या हाती आली आहे.

 चिश्तिया महाविद्यालयात डॉ. हरी नारायण जमाले यांची नियुक्ती १ जुलै १९९५ रोजी करण्यात आली. डॉ. जमाले यांच्या नियुक्तीच्या वेळी सामाजिक शास्त्राच्या कार्यभारानुसार प्राध्यापकांची केवळ दोनच पदे शासन मान्य होती. तरीही डॉ. जमाले यांची नियुक्ती तिसऱ्या पूर्णवेळ पदावर दाखवण्यात आली आहे. ज्या पदाला मान्यताच नव्हती, त्यापदावर डॉ. जमाले यांची नियुक्ती दाखवण्यात आली आणि त्यांना सरकारी तिजोरीतून वेतन अदा करण्यात आले.

हेही वाचाः ‘चिश्तिया’तील १० प्राध्यापकांच्या नियुक्त्या बोगस, तरी शिक्षण सहसंचालकानी डोळे झाकून दिले वेतन

चिश्तिया महाविद्यालयात जे तिसरे पदच अस्तित्वात नव्हते, त्या पदावर डॉ. जमाले यांची पूर्णवेळ नियुक्ती दाखवण्यात आली. त्यांच्या मान्यतेचा प्रस्ताव डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि औरंगाबाद विभागाच्या उच्च शिक्षण सहसंचालकांकडे पाठवण्यात आला आणि त्या प्रस्तावाला मान्यताही घेण्यात येऊन डॉ. जमाले यांना सरकारी तिजोरीतून नियमबाह्य वेतनही अदा करण्यात आले आहे.

विशेष म्हणजे १९९५ मध्ये डॉ. जमाले यांची चिश्तिया महाविद्यालयात इतिहास विषयाच्या अधिव्याख्यातापदी नियुक्ती करण्यात आली, त्याच शैक्षणिक वर्षात म्हणजे १९९४-९५ मध्ये डॉ. जमाले हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या इतिहास विभागात एम.फिल.चे पूर्णवेळ विद्यार्थी होते. चिश्तिया महाविद्यालयात अधिव्याख्यातापदावर पूर्णवेळ नोकरी करत वेतन खिशात घालत असतानाच डॉ. जमाले यांनी एम. फिल. चा पूर्णवेळ अभ्यासक्रम अभ्यासक्रमही पूर्ण केला आहे.

न्यूजटाऊन एक्सक्लुझिव्हः डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्राध्यापक भरती घोटाळ्यातील एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट वाचा एका क्लिकवर, वाचण्यासाठी येथे क्लिक करा

डॉ. जमाले यांनी १९९४-९५ या शैक्षणिक वर्षात एम. फिल. इतिहास या अभ्यासक्रमात नियमित स्वरुपात प्रवेश घेतला होता. त्यांनी नियमितपणे वर्गात उपस्थित राहून विद्यापीठाच्या नियमानुसार अभ्यासक्रम पूर्ण केला, असे इतिहास विभाग प्रमुखांनी माहितीच्या अधिकारांतर्गत दिलेल्या माहितीत म्हटले आहे. एकच व्यक्ती  ठिकाणी पूर्णवेळ कशी काय उपस्थित राहू शकते?, जर जमाले यांनी पूर्णवेळ एम. फिल. पूर्ण केली आहे तर त्यांना या काळात पूर्णवेळ नोकरी केल्याचे गृहित धरून वेतन कसे काय अदा करण्यात आले?, असे गंभीर प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत.

पूर्णवेळ नोकरी करत असतानाच पूर्णवेळ उपस्थित राहून प्राप्त केलेल्या एम. फिल. पदवीच्याच आधारे कॅस आणि सेवेचे सर्व फायदे लाटले आहेत. एम. फिल.च्या आधारे त्यांनी पदोन्नतीसह वेतनवाढीही खिशात घातल्या आहेत. डॉ. जमाले यांनी राज्य सरकार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि राज्य सरकारच्या उच्च शिक्षण संचालनालयाच्या डोळ्यात धुळफेक करून लाखो रुपयांचे वेतन लाटले आहेत.

डॉ. हरी नारायण जमाले यांनी पूर्णवेळ उपस्थित राहून एम. फिल. पूर्ण केल्याचे विद्यापीठाच्या इतिहास विभाग प्रमुखांचे पत्र.

हेही वाचाः अल्पसंख्यांक दर्जाच्या नावाखाली ‘चिश्तिया’मध्ये हडेलहप्पी, अपात्र प्राध्यापक नियुक्त्यांत चांगभलं!

विशेष म्हणजे डॉ. जमाले यांच्या नियुक्तीतील घोळाबाबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि औरंगाबाद विभागाच्या उच्च शिक्षण सहसंचालकांकडे अनेकदा लेखी तक्रारी करण्यात आल्या आहेत. मात्र त्या तक्रारींवर आतापर्यंत कोणतीही कारवाई झालेली नाही. दिशाभूल करून लाखो रुपयांचे वेतन आणि वेतनवाढी खिशात घालणाऱ्या डॉ. जमाले यांच्याविरुद्ध औरंगाबाद विभागाचे उच्च शिक्षण सहसंचालक आता तरी कारवाई करून त्यांनी लाटलेले वेतन वसूल करणार का?, हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा