राज्यात दुष्काळ आणि पुरामुळे ऊस गेला, जास्तीत जास्त तीन महिनेच चालणार यंदाचा गळीत हंगाम

0
100
संग्रहित छायाचित्र.

नवी दिल्ली : ऊस उत्पादनात देशातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे राज्य असलेल्या महाराष्ट्रात यावर्षी दुष्काळ आणि पुरामुळे ऊसाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे यंदा साखर कारखान्यांचा गळीत हंगाम तीन महिनेही चालण्याची शक्यता कमीच आहे. यंदा राज्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम दीड महिना उशिराने म्हणजे 15 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. मात्र ऊसाची उपलब्धताच कमी असल्यामुळे साखर कारखान्यांना यंदा फेब्रुवारीमध्येच गळीत हंगाम थांबवावा लागणार आहे.

नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज लिमिटेडचे ( एनएफसीएसएफ) व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी ही माहिती दिली. दुष्काळ आणि पुरामुळे यावर्षी महाराष्ट्रात ऊसाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान आहे. त्यामुळे साखर कारखान्यांत यंदा जास्तीत जास्त तीन महिने गळीत हंगाम चालेल. 15 नोव्हेंबरपासून राज्यातील जवळपास सर्वच साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू होईल, असे नाईकनवरे म्हणाले. महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना कर्नाटकमधून ऊसाचा पुरवठा करणार का, असे विचारले असता नाईकनवरे म्हणाले की, कर्नाटकमध्येही ऊसाच्या पिकाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना कर्नाटकमधून ऊसाचा पुरवठा होण्याची शक्यता तशी कमीच आहे.

महाराष्ट्रातील मराठवाडा विभागात यंदा तीव्र दुष्काळ होता. त्यामुळे मराठवाड्यातील ऊस गेला. तर कोल्हापूर, सांगली, सातारा आणि इचलकरंजीत पुरामुळे ऊसाचे मोठे नुकसान झाले आहे. चालू हंगाम 2019-20 मध्ये महाराष्ट्रात 55 लाख टन साखर उत्पादन होईल, असा एनएफसीएसएफचा अंदाज आहे. मागच्या हंगामात ( 2018-19) मध्ये 107 लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज होता, असे नाईकनवरे म्हणाले. ऊसउत्पादक शेतकऱ्यांच्या थकबाकीबाबत नाईकनवरे म्हणाले की, महाराष्ट्रात ऊसउत्पादक शेतकऱ्यांची सुमारे 100 कोटी रुपयांची थकबाकी आहे. देशभरातील ऊसउत्पादक शेतकऱ्यांची जवळपास 6,500 कोटी रुपये थकबाकी आहे. त्यात सर्वाधिक थकबाकी 5,000 कोटी रुपये उत्तर प्रदेशातील ऊसउत्पादक शेतकऱ्यांची आहे, असे नाईकनवरे यांनी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा