दहावी- बारावीच्या परीक्षा केंद्रावर ड्रोन कॅमेऱ्याची नजर, औरंगाबादेत राज्यातील पहिलाच प्रयोग

0
42
संग्रहित छायाचित्र.

औरंगाबाद: जिल्ह्यात २० नोव्हेंबर ते १० डिसेंबर या कालावधीत  होणाऱ्या १० वी १२ वी च्या पुरवणी परीक्षांच्या काळात परीक्षा केंद्र परिसराचे ड्रोन कॅमेऱ्याद्वारे चित्रिकरण करण्यात येणार असून राज्यात पहिल्यांदाच असा प्रयोग राबवण्यात येणार आहे. ही माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली.  

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र पुरवणी परीक्षा (इ. १२ वी) २- नोव्हेंबर ते १० डिसेंबर या कालावधीत घेण्यात येणार आहे. इयत्ता १२ वीसाठी जिल्ह्यात एकूण १५ केंद्रावर २ हजार ७९५ विद्यार्थी परीक्षेस बसणार आहेत. परीक्षेचे गोपनीय साहित्य व संकलनासाठी ८ परिक्षक केंद्रे (कस्टोडियन) स्थापन करण्यात आले आहे.

माध्यमिक शालांत प्रमाणपत्र पुरवणी परीक्षा (इयत्ता १० वी) २०  नोव्हेंबर ते ५ डिसेंबर या कालावधीत होणार आहे. इयत्ता १० वी साठी जिल्ह्यात एकूण १५ केंद्रावर  २ हजार ४०२ विद्यार्थी परीक्षेस बसणार आहेत. परीक्षेचे गोपनीय साहित्य व संकलनासाठी ८ परिक्षक केंद्र (कस्टोडियन) स्थापन करण्यात आले आहेत. १० वी आणि १२ वीच्या या परीक्षेचे चित्रिकरण व ड्रोन कॅमेराचा वापर राज्यात पहिल्यांदाच या परीक्षांदरम्यान केला जाणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालकांनी परीक्षा केंद्रांवर गर्दी करणे टाळावे. परीक्षा काळात विद्यार्थ्यांशिवाय इतरांनी प्रवेश केल्यास गुन्हा दाखल करण्यात येणार असून परीक्षा केंद्राच्या १०० यार्ड परीसरात पोलीस अधिनियम ३७ (१) (३) तसेच कलम १४४ लागू असल्याचे जिल्हाधिकारी चव्हाण म्हणाले.

विभागीय मंडळाने दिलेल्या सूचनेनुसार औरंगाबाद जिल्ह्यासाठी शिक्षणाधिकारी, (माध्यमिक), शिक्षणाधिकारी (निरंतर), असे भरारी पथकांची स्थापना करण्यात आलेली आहे. तसेच तालुकास्तरावर गटशिक्षणाधिकारी यांचे पथके कार्यरत ठेवण्यात येईल.

परीक्षेसाठी नियुक्त करण्यात आलेले ५० टक्के पर्यवेक्षक शिक्षण विभागाव्यतिरिक्त इतर विभागाचे तर ५०टक्के शिक्षण विभागाचे असणार आहेत. परीक्षा केंद्रावर बैठे पथकांचे नियोजन करण्यात आले असूनपरीक्षा केंद्रावर सर्व विद्यार्थी, पर्यवेक्षक व इतर कर्मचारी यांनी मास्क परिधान करणे, सोशल डिस्टंसिंगचे पालन करणे बंधनकारक आहे. केंद्रसंचालकांनी केंद्रांवर हँडवॉश/स्प्रे बाटली ठेवावी.  परीक्षा केंद्रावर प्रत्येक विद्यार्थ्याचे स्कॅनिंग करणे आवश्यक असून प्राथमिक आरोग्य केंद्राचे पथक नेमण्यात येणार आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा