ड्रग्ज पार्टीः शाहरूख खानची मॅनेजर पूजा ददलानी, किरण गोसावी भेटीचे फुटेज एसआयटीच्या हाती

0
586
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः  क्रूझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणात एक मोठी बातमी समोर येत आहे. अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानच्या सुटकेसाठी एनसीबीचे मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडेंसह एनसीबीच्या अन्य अधिकाऱ्यांनी शाहरूख खानकडे २५ कोटींची खंडणी मागितल्याच्या आरोपांची चौकशी करत असलेल्या मुंबई पोलिसांच्या विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) हाती एक महत्वाचे सीसीटीव्ही फुटेज लागले आहे. ड्रग्ज प्रकरणात एनसीबीकडून आर्यन खानला अटक करण्याच्या काही तास आधी शाहरूख खानची मॅनेजर पूजा ददलानी लोअर परेल भागात या प्रकरणातील साक्षीदार किरण गोसावीची भेट घेताना या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. आर्यन खानची अटक टाळण्यासाठी याच ठिकाणी पैशांची देवाणघेवाण झाल्याचा पोलिसांना संशय आहे.

आर्यन खानची अटक टाळण्यासाठी अभिनेता शाहरूख खानकडे २५ कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली होती. त्यातील ८ कोटी रुपये एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांना देण्यात येणार होते, असा खळबळजनक आरोप ड्रग्ज पार्टी प्रकरणातील पंच साक्षीदार  किरण गोसावीचा बॉडीगार्ड प्रभाकर साईलने केला होता. ३ ऑक्टोबर रोजी पहाटे शाहरूख खानची मॅनेजर पूजा ददलानी आणि किरण गोसावी यांची लोअर परेल भागात भेट झाली होती, असा दावा प्रभाकर साईलने शपथपत्रावर केला होता.

चला उद्योजक बनाः स्फूर्ती योजना देते पारंपरिक उद्योगांना ५ कोटींपर्यंतचा निधी, जाणून घ्या तपशील

एसआयटीच्या हाती लागलेल्या या सीसीटीव्ही फुटेजमध्ये पूजा ददलानी निळ्या रंगाच्या मर्सिडीज कारमधून उतरून किरण गोसावीची भेट घेताना दिसत आहे. प्रभाकर साईलच्या दाव्याला पुष्टी देणारा हा भक्कम पुरावा मानला जात आहे. आता पूजा ददलानी आणि किरण गोसावी यांच्या भेटीचा नेमका हेतू काय होता आणि या ठिकाणी पैशांची देवाणघेवाण झाली काय? या दिशेने तपासाची चक्रे फिरवली जाणार आहेत, असे सूत्रांनी सांगितले.

आर्यन खानला एनसीबीच्या कार्यालयात आणल्यानंतर ‘मी एनसीबीच्या कार्यालयात आहे,’ असे आर्यन खानचे व्हॉइस रेकॉर्डिंग किरण गोसावीने मोबाइलवर केले आणि तेच पूजा ददलानी यांना पाठवून दिले. आर्यन खानची आपणच सुटका करू शकतो, याची खात्री देण्यासाठी किरण गोसावीने हे व्हॉइस रेकॉर्डिंग करून पूजा ददलानींना पाठवले, अशी माहितीही एसआयटीला मिळाली आहे.

आता एसआयटीकडून ड्रग्ज पार्टी प्रकरणातील पंच साक्षीदार किरण गोसावीच्या विरोधात तोतयागिरी आणि खंडणीचा गुन्हा दाखल केला जाण्याची शक्यता आहे. क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात आर्यन खानच्या सुटकेसाठी किरण गोसावीनेच पूजा ददलानींना मदत करण्याचे आश्वासन दिले होते, असे सांगितले जाते. किरण गोसावीला पुणे पोलिसांनी फसवणुकीच्या एका प्रकरणात आधीच अटक केलेली आहे. ५ नोव्हेंबरपर्यंत तो कोठडीत आहे.

आर्यन खानच्या सुटकेसाठी २५ कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी या आरोपांची चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन केली. या एसआयटीने १० ते १५ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज धुंडाळल्यानंतर त्यांना लोअर परेल भागातील बिग बाजारजवळ निळ्या रंगाची एक मर्सिडीज आणि दोन इनोव्हा एसयूव्ही आढळून आल्या. या दोन इनोव्हापैकी एक इनोव्हा किरण गोसावीची आहे तर दुसरी इनोव्हा सॅम डिसुझाची आहे. निळ्या मर्सिडीज कारमधून एक महिला खाली उतरून किरण गोसावीशी बोलत आहे आणि नंतर दोघेही आपआपल्या कारमध्ये बसताना दिसत आहे.

काही वेळानंतर हे सगळे जण त्यांच्या वाहनातून निघून जाताना दिसत आहेत. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये पूजा ददलानी, किरण गोसावी, सॅम डिसुझा आणि प्रभाकर साईल यांची लोअर परेल भागात भेट झाल्याचे स्पष्ट होत आहे. त्यांच्यात नेमके काय झाले, हे आम्हाला माहीत नाही, असे सूत्रांनी सांगितले. या प्रकरणात एसआयटीकडून पूजा ददलानी आणि आर्यन खानचाही जवाब नोंदवला जाण्याची शक्यता आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा