खंडणीसाठीच आर्यन खानचे अपहरण, भाजपचे कम्बोज मास्टरमाइंडः नवाब मलिकांचा आरोप

0
162
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः अभिनेता शाहरूख खान यांचा मुलगा आर्यन खानचे अपहरण करून खंडणी उकळण्याचाच डाव आहे. या अपहरण नाट्याचे मास्टरमाइंड मोहीत कम्बोज आहेत, असा खळबळजनक दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. कार्डिलिया क्रूझ पार्टीसाठी मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनाही निमंत्रण देण्यात आले होते, पण ते गेले नाहीत, असा धक्कादायक खुलासाही मलिक यांनी केला.

एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे आणि भारतीय जनता पक्षाचे नेते मोहीत कम्बोज हे एकमेकांना चांगले ओळखतात. बॉलीवूडच्या सेलिब्रेटींना खोट्या केसेसमध्ये अडकवून त्यांच्याकडून खंडणी उकळण्याचे रॅकेट या दोघांच्या माध्यमातून चालते. मुंबई शहरात मोहीत कम्बोज यांचे एकूण १२ हॉटेल आहेत. आपल्या हॉटेलच्या शेजारी असलेल्या इतर हॉटेल मालकांना समीर वानखेडेंच्या माध्यमातून खोट्या ड्रग्ज केसेसमध्ये अडकवण्याचे काम कम्बोज करतात, असा आरोपही नवाब मलिक यांनी केला आहे.

चला उद्योजक बनाः स्फूर्ती योजना देते पारंपरिक उद्योगांना ५ कोटींपर्यंतचा निधी, जाणून घ्या तपशील

आर्यन खानला २ ऑक्टोबर रोजी क्रूझवर बोलावण्यात आले. प्रतिक गाबा आणि आमिर फर्निचरवाला यांच्या माध्यमातून आर्यन खान क्रूझवर गेला. मोहीत कम्बोज यांच्या साल्याच्या माध्यमातून हे जाळे टाकण्यात आले. तिथे आर्यन खानला पोहोचवले गेले. आर्यन खानचे अपहरण करून २५ कोटींची खंडणी मागण्याचा खेळ सुरू झाला. याची डील १८ कोटींमध्ये झाली. ५० लाख रुपये उचलले देखील गेले होते. पण एका सेल्फीने खेळ बिघडवला, असे नवाब मलिक म्हणाले. ड्रग्ज पार्टी प्रकरणातील पंच साक्षीदार किरण गोसावीचा आर्यन खानसोबतचा सेल्फी व्हायरल झाला होता.

महाराष्ट्रात ड्रग्जचे मोठे रॅकेट सुरू आहे. या रॅकेटमधून अनेक लोकांना फसवले जात आहे. फसवणूक झालेल्या लोकांकडून मोठ्या प्रमाणावर खंडणी उकळण्यात येते. चांडाळ चौकडीच्या माध्यमातून हे सर्व ड्रग्ज रॅकेट सुरू असून एनसीबीचे संचालक समीर वानखेडे, अधिकारी व्ही.के. सिंग, आशिष रंजन आणि समीर वानखेडेचा ड्रायव्हर माने हे सर्व मिळून लोकांना ड्रग्जच्या खोट्या आरोपाखाली अडकवायचे आणि त्यानंतर ही चांडाळ चौकडी त्यांच्याकडून पैसे उकळायची, असा आरोपही मलिक यांनी केला आहे.

कार्डिलिया क्रूझ प्रकरणामध्ये त्या रात्री ११ जणांना पकडण्यात आले होते. मात्र समीर वानखेडे यांनी केवळ ८ जणांची नावेच समोर आणली. यानंतर भाजप नेते मोहीत कम्बोज यांच्या मेहुण्यासोबत अजून दोन जणांना सोडण्यात आल्याची बाब आम्ही समोर आणल्यानंतर ११ नव्हे तर १४ लोकांना त्यावेळी ताब्यात घेण्यात आल्याचे एनसीबीने सांगितले, असेही मलिक म्हणाले.

मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनाही निमंत्रणः ज्या कार्डिलिया क्रूझ पार्टी प्रकरणात शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानला अटक करण्यात आली होती, त्याच पार्टीमध्ये मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनाही आमंत्रित करण्यात आले होते, असा धक्कादायक खुलासाही नवाब मलिक यांनी या पत्रकार परिषदेत केला. या पार्टीचा आयोजक काशीफ खान यांनी अनेक वेळा अस्लम शख यांना फोन करून पार्टीमध्ये येण्याचा आग्रह धरला होता. मात्र अस्लम शेख पार्टीला गेले नाहीत. जर अस्लम शेख चुकून या पार्टीला गेले असते तर त्यांनाही या प्रकरणात गोवले गेले असते आणि ज्याप्रमाणे पंजाबमध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्ज पसरला आहे, त्याचप्रमाणे महाराष्ट्राला ड्रग्जचा विळखा बसल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केला गेला असता. ज्याप्रमाणे उडता पंजाब म्हटले जाते, त्याचप्रमाणे उडता महाराष्ट्र करण्याचे कटकारस्थान या पार्टीच्या माध्यमातून करण्यात येत आहे, असा आरोपही मलिक यांनी केला. या सर्व प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची मागणी आम्ही त्यामुळेच केली आहे, असे मलिक म्हणाले.

सुनील पाटील हा वानखेडेंच्या प्रायव्हेट आर्मीचा सदस्यः मोहीत कंम्बोज यांनी नाव घेतलेली सुनील पाटील ही व्यक्ती समीर वानखेडे यांच्या प्रायव्हेट आर्मीची सदस्य असल्याचा दावाही मलिक यांनी केला. सुनील पाटील यांच्यामार्फत आर्यन खानच्या अटकेची पूर्ण योजना आखून तिची अंमलबजावणी करण्यात आल्याचा आरोप मोहीत कंम्बोज यांनी केला होता. त्यावरही मलिक यांनी पलटवार केला. माझ्याकडे विजय पगारेही आले होते. त्यांनी ललित हॉटेलमधील काही गोष्टी मला सांगितल्या. मनीष भानुशाली, सॅम डिसुझा द ललित हॉटेलमध्ये मजा करायचे. वानखेडेंना वाटले की गोष्ट उद्या सांगितलीच जाणार आहे तर कंम्बोज यांच्या माध्यमातून आधीच सांगूयात. म्हणून काल पत्रकार परिषद घेण्यात आली, असेही मलिक म्हणाले.

सुनील पाटीलचे अमित शाहांसोबत व्हिडीओः सुनील पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता नाही. सुनील पाटीलचे अमित शाहांसोबत अनेक व्हिडीओ फिरत आहेत. गुजरातच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीच्या वेळेचेही फोटो आहेत. मनीष भानुशालीचे प्रधानमंत्र्यांपासून सर्वांसोबत फोटो आहेत. सुनील पाटील देखील फ्रॉड आहे. सुनील पाटील हाही वानखेडेंच्या प्रायव्हेट आर्मीचा खेळाडू आहे. ६ तारखेला माझ्या पत्रकार परिषदेनंतर सुनील पाटीलचा मला फोन आला होता. मी तुम्हाला पत्रकार परिषदेसंदर्भात अधिक माहिती देऊ इच्छितो, असे त्याने सांगितले. दुसऱ्या पत्रकार परिषदेनंतरही त्यांनी फोन केला. मी त्याला मुंबईत येऊन पोलिसांना सर्व सांगायला सांगितले. तो येणार होता, पण आला नाही, असेही मलिक म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा