समीर वानखेडेविरोधात शाहरूख खानकडे खंडणी मागतिल्याची तक्रार, वकिलाची मुंबई पोलिसांत धाव

0
590
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणातील पंच साक्षीदार प्रभाकर साईलने प्रतिज्ञापत्रावर केलेल्या आरोपांमुळे आधीच अडचणीत आलेले एनसीबीचे मुंबई विभागाचे संचालक समीर वानखेडे यांच्याविरोधात मुंबई पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. चित्रपट अभिनेता शाहरूख खानकडे समीर वानखेडे यांनी खंडणी मागितल्याची तक्रार ऍड. सुधा द्विवेदी यांनी मुंबई पोलिसांत केली असून खंडणी मागितल्याच्या आरोपाखाली वानखेडे आणि अन्य व्यक्तींवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी तक्रार अर्जाद्वारे केली आहे.

 सुधा द्विवेदी यांनी मुंबईतील एमआरए मार्ग पोलिस ठाणे, मुंबई गुन्हे शाखेचे सहपोलिस आयुक्त मिलिंद भारंबे व लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे ही तक्रार दाखल केली आहे. ड्रग्ज पार्टी प्रकरणात आर्यन खानला सोडण्यासाठी समीर वानखेडे आणि अन्य पाच व्यक्तींनी अभिनेता शाहरूख खानकडे खंडणी मागितली. त्यामुळे वानखेडेंसह पाच व्यक्तींविरुद्ध एफआयआर दाखल करून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी द्विवेदी यांनी या तक्रार अर्जात केली आहे.

चला उद्योजक बनाः स्फूर्ती योजना देते पारंपरिक उद्योगांना ५ कोटींपर्यंतचा निधी, जाणून घ्या तपशील

सुधा द्विवेदी यांच्या तक्रार अर्जात किरण गोसावी, सॅम डिसुझा आणि प्रभाकर साईल यांची नावे आहे. खंडणी मागितल्याप्रकरणी या सर्वांविरोधात एफआयआर दाखल करण्यात यावा, अशी द्विवेदी यांची मागणी आहे. सुधा द्विवेदी यांची तक्रार प्राप्त झाली असल्याचा दुजोरा एका पोलिस अधिकाऱ्याने दिला आहे. तक्रार प्राप्त झाली असली तरी अद्याप एफआयआर दाखल करण्यात आला नसल्याचे या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

 ड्रग्ज पार्टी प्रकरणात अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानला सोडून देण्यासाठी वानखेडे आणि इतरांनी २५ कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा दावा या प्रकरणातील पंच साक्षीदार प्रभाकर साईलने केल्याच्या दुसऱ्याच दिवशी सुधा द्विवेदी यांनी ही तक्रार केली आहे. प्रभाकर साईल हा किरण गोसावी यांचा अंगरक्षक होता.

क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरण देशभर गाजत आहे. या प्रकरणात शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान याच्यासह आतापर्यंत २० जणांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई बोगस असल्याचा दावा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. समीर वानखेडे यांच्यावर मलिक यांनी विविध खळबळजनक आरोप केले आहेत. प्रभाकर साईलने केलेल्या आरोपांची एनसीबीमार्फत चौकशी सुरू असतानाच मुंबईत वानखेडेसह त्यांच्यासोबत असलेल्या सर्वांविरुद्ध पोलिसांकडे तक्रार करण्यात आल्याने पोलिस आता या प्रकरणी कोणती भूमिका घेतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा