ड्रग्ज पार्टीः नवाब मलिकांनी उघड केले काशीफ खानचा उल्लेख असलेले गोसावीचे व्हॉट्सअप चॅट

0
294
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः क्रूझ पार्टी प्रकरणी एकापाठोपाठ एक खुलासे करून खळबळ उडवून देणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज सकाळीच एक ट्विट करून खळबळ उडवून दिली आहे. क्रूझ पार्टी प्रकरणातील पंच साक्षीदार के. पी. गोसावी आणि खबऱ्या यांच्यात झालेले कथित व्हॉट्सअप चॅट शेअर केले आहे. एनसीबीचे मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे आणि काशीफ खान यांच्यातील संबंधावरही मलिक यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. काशीफ खानची चौकशी का करण्यात आली नाही? काशीफ खान आणि समीर दाऊद वानखेडे यांच्यात काय संबंध आहे? असे प्रश्न मलिक यांनी उपस्थित केले आहेत.

 के.पी. गोसावी आणि एका खबऱ्यामधील हे व्हॉट्सअप चॅट आहे. त्यात काशीफ खानचा उल्लेख आहे. काशीफ खानची चौकशी का केली नाही? काशीफ खान आणि समीर दाऊद वानखेडे यांचे काय संबंध आहेत?, असे प्रश्न नवाब मलिक यांनी या व्हॉट्सअप चॅटचा स्क्रीनशॉट शेअर करत विचारले आहेत.

चला उद्योजक बनाः राज्यात औद्योगिकदृष्ट्या अविकसित, विकसनशील भागांसाठी पीएसआय योजना, कसा घ्यायचा लाभ?

नवाब मलिक यांनी के.पी. गोसावीच्या व्हॉट्सअप चॅटचे आणखी तीन स्क्रीनशॉट्स शेअर केले आहेत. कॉर्डिलिया क्रूझवर पार्टीसाठी जाणाऱ्या लोकांना ट्रॅपमध्ये कसे अडकवायचे, याचे प्लॅनिंग कसे केले जात आहे, हेच के.पी. गोसावी आणि एका खबऱ्यातील व्हॉट्सअप चॅटमधून दिसते, असे नवाब मलिक यांनी म्हटले आहे. ही समीर दाऊद वानखेडे यांची प्रायव्हेट आर्मी असून त्यामुळे त्यांनी अनेक प्रश्नांची उत्तरे द्यायला हवीत, असेही मलिक यांनी म्हटले आहे.

नवाब मलिक यांनी शेअर केलेल्या या व्हॉट्सअप चॅटमुळे या प्रकरणाला वेगळे वळण मिळण्याची शक्यता आहे. क्रूझवर हजर असूनही एनसीबीने काशीफ खानला ताब्यात घेऊन चौकशी का केली नाही? क्रूझ पार्टीचा आयोजक असूनही काशीफ खानला का सोडून देण्यात आले? असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित केले जात आहेत.

क्रूझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणात अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानला अटक झाल्यानंतर नवाब मलिक यांनी या प्रकरणात एकापाठोपाठ एक खळबळजनक खुलासे केले आहेत. महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री अस्लम शेख यांनाही क्रूझ पार्टीसाठी निमंत्रित करण्यात आले होते. परंतु ते गेले नाहीत, असा खुलासाही मलिक यांनी केला होता. त्यावर अस्लम शेख यांनीही आपल्याला क्रूझ पार्टीसाठी निमंत्रित करण्यात आले होते, हे मान्य केले होते.

शाहरूख खानची मॅनेजर ददलानींना समन्सः दरम्यान, क्रूझ पार्टी प्रकरणाची चौकशी करण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांनी स्थापन केलेल्या एसआयटीने शाहरूख खानची मॅनेजर पूजा ददलानींना समन्स बजावले आहे. क्रूझ पार्टी प्रकरणी वसुलीचे आरोप झाल्यानंतर मुंबई पोलिसांचे विशेष तपास पथक चौकशी करत आहे. ददलानी यांना बजावलेले एसआयटीचे हे दुसरे समन्स आहे. त्यांना चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. एसआयटीने आतापर्यंत या प्रकरणी २० जणांचे जबाब नोंदवले आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा