ड्रग्ज पार्टी केसः काशीफ खान,व्हाइट दुबईला समीर वानखेडेंनी का वाचवले? मलिकांचा हल्लाबोल

0
44
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः ड्रग्ज पार्टी प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर आज पुन्हा नव्याने हल्लाबोल केला. फॅशन टीव्हीचा भारतातील प्रमुख काशीफ खान आणि आता नव्याने समोर आलेल्या व्हाइट दुबई अशा व्यक्तींवर कारवाई का झाली नाही? किंवा त्यांची चौकशी का झाली नाही? त्यांचे समीर वानखेडेंशी काही संबंध आहेत का? त्याला का वाचवले जात आहे? असे सवाल आज नवाब मलिक यांनी उपस्थित केले आहेत.

नवाब मलिक यांनी आज सकाळी ट्विट करून ड्रग्ज पार्टी प्रकरणातील पंच साक्षीदार के.पी. गोसावी आणि एका खबऱ्यातील व्हॉट्सअप चॅटचे स्क्रीनशॉट्स शेअर केले. त्यामुळे खळबळ उडाली असतानाच मलिकांनी शेअर केलेले व्हॉट्सअप चॅट के.पी. गोसावीचेच आहे कशावरून?, अशी शंका घेतली जाऊ लागल्यानंतर मलिकांनी के.पी. गोसावीचा मोबाइल नंबर स्पष्टपणे दिसत असलेला व्हॉट्सअप चॅटचे स्क्रीनशॉट्स शेअर केले आणि ज्यांना शंका आहे ते याबाबतची खातरजमा करू शकतात. केपी गोसावीचा मोबाईल नंबर खातरजमा करण्यासाठी स्पष्ट दिसत आहे. सध्या तो पुणे पोलिसांच्या कोठडीत आहे, असे नवाब मलिकांनी म्हटले आहे.

चला उद्योजक बनाः राज्यात औद्योगिकदृष्ट्या अविकसित, विकसनशील भागांसाठी पीएसआय योजना, कसा घ्यायचा लाभ?

व्हॉट्सअप चॅटचे हे स्क्रीनशॉट्स शेअर केल्यानंतर नवाब मलिकांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेऊन समीर वानखेडेंवर निशाणा साधला. समीर वानखेडे एनसीबीचे विभागीय संचालक असताना गोवाही त्यांच्या अखत्यारित येते. गोव्यात ड्रग्जचा धंदा चालतो, हे सगळ्या जगाला माहीत आहे. पण तिकडे कोणतीच कारवाई होत नाही. कारण काशीफ खानच्या माध्यमातून सगळे रॅकेट गोव्यात चालवले जाते. काशीफ खान आणि वानखेडेंच घनिष्ठ संबंध आहेत. म्हणून त्याच्यावर कारवाई होत नाही. तुम्ही काशीफ खानला चौकशीसाठी का बोलावले नाही?, हे मी एनसीबीच्या अधिकाऱ्यांना विचारू इच्छितो, असे नवाब मलिक म्हणाले.

ड्रग्ज पार्टी प्रकरणात आता व्हाइट दुबई हे नवीन नाव समोर आले आहे. त्याचा उल्लेख करत नवाब मलिक म्हणाले की, काशीफ खानसोबत आणखी एक नाव आहे, ते म्हणजे व्हाइट दुबई. हे त्याचे सांकेतिक नाव आहे. त्याच्याबाबतीतही माहिती देण्यात आली होती. त्याला अटक का झाली नाही? काशीफ खान आणि वानखेडे यांच्यात काय संबंध आहेत? याची माहिती एनसीबीने द्यावी, असे मलिक म्हणाले.

 काशीफ खानवर देशभरात वेगवेगळे गुन्हे आहेत. चार दिवसांपूर्वी त्याच्यावर फसवणुकीचा गुन्हाही दाखल झाला आहे. एका न्यायालयाने त्याला फरार घोषित केले आहे. इतके असताना त्याला का वाचवले जात आहे, याचे उत्तर आम्हाला या यंत्रणेकडून हवे आहे, असेही मलिक म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा